सर्व थरांतिल नारि-नरांना उघडें मंदिर आहे
विठुरायाच्या वारकर्यांना उघडें मंदिर आहे ।।
विठुराया ज्यांचा सांगाती
नाहीं त्यांना ज़ातीपाती
उच्च-नीच नाहीं, सार्यांना उघडें मंदिर आहे ।।
उभे पुजारी-सेवक-बडवे
कुणि न विठूच्या भक्तां अडवे
अष्टप्रहर, साती वारांना उघडें मंदिर आहे ।।
प्रपंच विसरुन केलिस वारी
अजुन थबकसी कां बाहेरी ?
कड्याकुलुप नाहीं दारांना, उघडें मंदिर आहे ।।
हातांमध्ये टाळ नसेना !
गळ्यात तुळशीमाळ नसेना !
ज्यांच्या हृदयीं विठू, तयांना उघडें मंदिर आहे ।।
अधिकारी, तैसे चपरासी
समान विठुच्या पायांपाशी
भाव मनींचा सच्चा, त्यांना उघडें मंदिर आहे ।।
दंभ,अहंकारा पळवाया,
सत्-चित्-आनंदा मिळवाया,
उघडा ज्ञानाच्या नयनांना, उघडें मंदिर आहे ।।
– – –
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply