भक्तमनीं कैवल्याची इथें गळाभेट रे
पंढरीत मोक्ष दावी पंढरिची वाट रे ।।
आस एक – पुण्यद पाहिन नदी चंद्रभागा
ध्यास एकमात्र – मोक्षद बघिन पांडुरंगा
एकमात्र भास – दिसतें रूपडें अवीट रे ।।
स्वप्नवत् जहालें – गेलो पंढरिनगरात मी
भारुन, कर जोडुन, ठाके विठूमंदिरात मी
मंत्रमुग्ध होउन पाही विठ्ठलपदिं वीट रे ।।
तेज आगळें विठूच्या सावळ्या मुखावरी
आगळीच नील-आभा गाभार्याला भरी
शब्दांच्या पलिकडला तो आगळाच थाट रे ।।
शांत होइ जीवन-नौका, लालसा पुरी मिटे
आलेखच आयुष्याचे वाटुं लागती थिटे
विषय-अवस सरुनी, उजळे ज्ञानदा पहाट रे ।।
विटेवरिल ध्यान सुंदर पाहुनि निजडोळां
भिडे भावना-हिंदोळा आनंदआभाळा
विश्वरूपदर्शन घडलें, मिळे मुक्तिपाठ रे ।।
दिव्य त्या क्षणानें माझा पालटला रंग
ओढ सोडुनी भोगाची, झालो नि:संग
जन्मजन्मिं, पांडुरंगा, मज असाच भेट रे ।।
– – –
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply