महाराष्ट्राला वारकरी सांप्रदाय ही खूप मोठी अध्यात्मिक देणगी लाभलेली आहे.त्यातील वारी हा अविभाज्य भाग. दर आषाढ- कार्तिक महिन्यात असंख्य दिंड्या निघतात. पताका खांद्यावर घेऊन , टाळ आणि मृदंगाच्या गजरात ह्या दिंड्या पंढरीकडे आगेकुच करतात. हरिनामाचा घोष होतो. उत्साही वातावरण असते. मजूर, शेतकरी, व्यावसायिक सर्वच स्तरातील माणसं वारीत सहभागी होतात.आनंदाचे डोही, आनंद तरंग ची अनुभुति घेत.मुलांसाठी हा औत्सुक्याचा विषय. आमच्या लहानपणी अनेक दिंड्या, पालखी आमच्या गाव परिसरातून जायच्या.पैठणचे शांतीब्रम्ह संत एकनाथांची पालखी पंढरपूरला जाते. ती गावापासून दोन कि.मी. अंतरावरून. पोरांना दुपारी शाळेला सुट्टी असायची. मायबापाच्या मागं टुमणं लावायचं. चारदोन रूपये मिळावयाचे. तेही ‘लेकरू देवाच्या पाया पडाया जातय’ म्हणत द्यायचे. बरेच अंतरावर नाथांची पालखी थांबलेली असे.फूगेवाले, स्टेशनरीवाले , शिट्टी विकणारे मुलांना आकर्षित करत असत. रंगीबेरंगी फूगे पाहिले की मग कोणता घ्यायचा यावर खल व्हायचा.काही आत्राब पोर्ह लहान लेकरांचे फूगेवाले फोडण्यासाठी टपलेली. फूगा वार्यानं लांब गेला अथवा फुटला त् पोर्ह मोठ्यानं भोकाड पसरायचे. मोठ्यानं , भेसूर आवाज काढणारे भोंगे विकायला यायचे. तो घेऊन कुणाच्यातरी जवळ जाऊन गपकन् वाजवायच. ते दचकायच्. मग आनंद.मोकळा हशा. लहान थोर सगळे च या उत्साहात सहभागी होत.कपाळी बुक्का लावत.उभा गंध लावणारेही भेटत. त्यांच्याकडून गंध लावून घेण्याचं नवखेपण होतं. नेमकी एकादशीच्या दिवशी ही पालखी बंडावर यायची. भाविक मग भूईमुगाच्या शेंगा आलेल्या वारकर्यांना वाटायचे. पोर्ह लटकेच वारकरी बनून समोर शेंगा घेण्यासाठी हात पसरायचे.’ आम्हाला द्या.आम्हाला द्या.’ म्हणायचे. ओरडायचे.गर्दी झाली की वाटणारे शेंगा उधळून द्यायचे. मग वेचायला मजा यायची. नांगरची रानं तुडवायची.पण शेंगा वेचायच्याच. गावचं भजनीमंडळ पालखीला वाटं लावायचं. सोबत मुस्लिम बांधवांचा बँड असायचा. एकता आणि सहिष्णूता ओतप्रोत भरलेली. पालखी मुक्कामी गावाच्या दिशेने प्रस्थान करी. मनाला हुरहूर लागे.
दिंड्या परत कधी येतात. याची वाट पहायची. भगवानगडाची दिंडी पंढरीवरून परत येताना गावातून जायची. दिंडीचं स्वागत खूप आदराने होई. भिमसिंह महाराजांचे दर्शन घेणे. पादुकांचे दर्शन. गावात दवंडी व्हायची. प्रत्येक घरच्या दहा भाकरी दहा रूपये आणि दाळ. गावात मग ढक्कू ( अनेक दाळींची एकत्र फोडणीची भाजी) बनवला जाई.त्याची चव पंचतारांकितमध्ये सुद्धा मिळणार नाही अशी.तुळशीच्या माळा. पिपाण्या, खुळखूळे, पिना,ट्रक अशा खेळण्यात मुलं रमत.हट्ट करीत. मोबाईलच्या दुनियेत तो अध्यात्मिक सहवास असलेला आनंद काही औरच.
© विठ्ठल जाधव
शिरूरकासार ( बीड)
सकाळ मध्ये प्रकाशित लेख
Leave a Reply