पंधरा पैशाच्या पोस्ट कार्ड वर 30 वर्षांपूर्वी दूर गावच्या लेकीला सणावाराचे आशीर्वाद लिहून तुमची अशा वेळी आठवण येते हो, पण असाल तिथे सुखी रहा,आनंदात सण साजरा करा आणि शुभाशीर्वाद असे मजकूर लिहिलेले असत. म्हणायला चार ओळीत पण व्यक्त खूप काही केलेले असे..रंग गंध स्पर्श नाद यांची सुंदर भावनिक गोफविण त्यात विणलेली असे..ज्यांना ते पत्र मिळे त्यांना घराच्या अंगणापासून स्वयंपाक घरापर्यंतचे सारे संदर्भ झरझर झरझर डोळ्यासमोर येत असत. .आणि वस्तूपेक्षा त्या पाठची भावना मनाला थेट भिडतअसे. .आप्त भेटीचा आनंद त्यातून लाभे…
दळण वळण आणि वाहतुकीच्या साधनांमध्ये झपाट्याने बदल झाले आणि आंतरराष्ट्रीय नियम पाळून कुरियर ची पार्सल जगाच्या कानाकोपऱ्यात हवी तेंव्हा पाठवण्याची सोय कुरियर कंपन्या सशुल्क करू लागल्या. अगदी तुमच्या घरी येऊन सुद्धा ही सेवा तुम्हाला मिळू लागली.. माझ्या लेकाला किंवा लेकीला फार आवडते हो चकली असे म्हणत डोळे टिपणारी घरची मंडळी आता ते प्रत्यक्ष पाठवण्यास सिद्ध झाली…तिकडे पार्सल मिळाले की इकडे समाधानाची स्मित लकेर आई वडिलांच्या चेहऱ्यावर उमटू लागली… बारा महिने राजाला काय रोजच दिवाळी!!त्यामुळे पूर्वी सारखे खाण्याचे अप्रूप देखील या पदार्थांमध्ये राहिले नसले तरीही नसानसात भिनलेले संदर्भ हटकून त्या त्या गोष्टींची आठवण हमखास करून देतातच..दिवाळी – म्हंटली की अभ्यंग स्नान, उटणे, नरकासुराचा वधआख्यान,फराळ,देवदर्शन, दिवाळी पहाटसंगीत. …असे..हे झाले कौटुंबिक पातळीवर आनंद.ते कुटुंबा पुरते मर्यादित असतातच.
पण असे अगदी हृदयस्थ आणि सच्च्या देश भक्तांना, सीमेवर गोठवणाऱ्या थंडीत पहारा देणाऱ्या सैनिकांना, जवानांना फराळ पाठवणारे पुण्याचे ‘चितळे बंधू मिठाई’ वाले गेली कित्येक वर्षे हे पवित्र काम प्रसिद्धीची हाव न बाळगता करत आहेत. त्यांचा उल्लेख केल्या शिवाय राहवत नाहीच.एरवी त्यांच्या पुणेरीपणावर कितीही जहरी टीका झाली तरी,त्यांचे काम त्यांच्याबद्दल बोलून जातेच.ही सद्भावना किती उच्च पातळीवर आहे ना!! हे पण कुरियर सेवें मुळेच शक्य झाले आहे.
अशा कुरियर सेवा, त्यांच्या यंत्रणेचे जाळे त्यातील वाहतूक आणि प्रत्यक्ष काम करणारे डिलिव्हरी बॉईज यांना शतशः धन्यवाद द्यायला हवेत आणि आवर्जून फराळाचा जिन्नस आणि भांड भर पाणी द्यायलाच हवे.. फक्त पैसा टाकून सगळ्या गोष्टी मिळत नसतात..कारण आपल्या सद्भावना पोहोचवणारे असंख्य अदृश्य हात, त्यासाठी रात्रंदिवस झटत असतात,त्यांचा ही सण बाजूला सारून..अशा हातांस कृतज्ञता…
सौ रश्मी भागवत
आम्ही साहित्यिक या फेसबुक गृप वरुन…
Leave a Reply