नवीन लेखन...

कोकणातील गतकालीन कवी आणि लेखक

निसर्गाने मुक्तहस्ताने केलेला कोकण साहित्यरसांनी सुद्धा तितकाच बहरला. साहित्य विश्वात त्याचे सौंदर्य कायम अधोरेखित होत आले आहे. कोकणातील साहित्यिक आणि त्यांचे साहित्य यांचे वेगळेपण इथल्या मातीशी नाते सांगणारे आहे. इथल्या मातीतील शब्द रुपी मोत्यांची पखरण करीत हे साहित्य विश्वात बहुमान मिळवित आहेत. आपल्यासाठी हे अभिमानास्पद आहे.

कोकणात मराठी साहित्यिक आणि लेखकांची वैभवशाली परंपरा आहे. त्या परंपरेतील गतकालीन लेखक आणि कवींच्या स्मृती आणि साहित्य जपणे आवश्यक आहे. या लेखात कोकणातील लेखक आणि कवी यांच्या लेखनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेच्या क्षेत्रात आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत यांनी इंग्रजीतील स्वच्छंदवादी काव्यापासून प्रेरणा घेतली आणि परंपरागत कवितेचे स्वरूप बदलून समतेची, क्रांतीची, नव्या जगाची ‘तुतारी’  फुंकली. याच काळात रे. नारायण वामन टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक (स्मृतिचित्रे) यांनी ‘ख्रिस्तायन’ हे वृत्तबद्ध ख्रिस्तचरित्र लिहिले. कवी आनंद आणि माधव काटदरे यांच्या स्वछंदी शैलीच्या कवितांतून कोकणातील जनजीवन आणि निसर्ग प्रतिबिंबित झाला. कवी बाळकृष्ण अनंत भिडे यांनी ‘मराठी काव्याची उत्क्रांती व केशवसुत’ या लेखात वेगळा दृष्टिकोन मांडला. कवी वसंत रामकृष्ण वैद्य आणि आद्य मालवणी कवी विठ्ठल नेरुरकर यांनी कवितेबरोबर कथा, बालसाहित्य आणि नाटके लिहिली. आ. ना. पेडणेकर यांनी प्रेम आणि निसर्ग या विषयावरील कविता  लिहिल्या.

स्वातंत्र्योत्तर काळात मार्क्सवादी आणि गांधीवादी विंदा करंदीकर (ज्ञानपीठ पुरस्कार विजेते) हे प्रख्यात कवी, अनुवादक व समीक्षक म्हणून प्रख्यात होते. त्यांचे ‘स्वेदगंगा‘, ‘मृदगंध’, ‘धृपद’, ‘विरूपिका’ हे काव्यसंग्रह आणि काही बालगीतसंग्रह प्रसिद्ध आहेत.  साठोत्तरी काळात साहित्य अकादमी पुरस्कार विजेते स्वच्छंदतावादी मंगेश पाडगावकर (सलाम), मानवी जाणिवेचे संवेदनशील कवी आरती प्रभू (नक्षत्रांचे देणे, जोगवा), अस्तित्त्ववादी गुरुनाथ धुरी (ग्लोरिया), मानवतावादी सतीश काळसेकर (इंद्रियोपनिषद्), सौंदर्यवादी वसंत सावंत, विद्रोही कवी आ. सो. शेवरे (अंधारातला जागल्या), महानगरीय जाणिवांचे कवी तुलसी परब (हिल्लोळ), संवेदनशील कवी आणि लेखक बाळ राणे (दुर्दम्य) आणि वसंतराव आपटे (चांदणं), यांच्या कवितांनी लक्ष वेधले. ऐंशीच्या दशकात ‘दीर्घकविता’, ‘स्वीकार’, ‘चित्र’, ‘पुन्हा दीर्घ कविता’ हे कवितासंग्रह लिहिणाऱ्या कवयित्री रजनी परुळेकर यांच्या कवितांचा दृष्टिकोन मानवतावादी आहे. गझलकार बदीउज्जमां खावर आणि मधुसूदन नानिवडेकर यांचे गजलसंग्रह प्रसिद्ध आहेत. याच काळातील कवयित्री प्रतिभा आचरेकर यांनी ‘प्रतिभा’ आणि ‘स्पंदन’या  कवितासंग्रहातून सामाजिक समस्या, आणि स्त्री विषयक जाणीवा हे विषय हाताळले.

गद्यलेखनाच्या क्षेत्रात 19 व्या शतकाच्या प्रारंभी ‘दर्पणकार’ बाळशात्री जांभेकर यांनी अनेक ज्ञानवर्धक ग्रंथ लिहिले. त्यानंतर ‘महाराष्ट्र सारस्वतकार’ विनायक लक्षण भावे (मराठी ग्रंथसंग्रहालयाचे संस्थापक) यांनी महानुभाव वाङ्मयावर ग्रंथ लिहिला. ‘शिवचरित्र’ चे लेखक  कृ. अ. केळूसकर गुरुजींनी लिहिलेले बुद्धांचे चरित्र वाचून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धधर्माची प्रेरणा मिळाली होती. आंबेडकरवादी (दलित) साहित्याचे प्रेरणास्रोत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, आणि ‘प्रबुद्ध भारत’ या वृत्तपत्रातील लेखनातून त्यांचे चिंतन, अभ्यास, आणि सामाजिक दृष्टिकोन यांचे दर्शन घडले. विसाव्या शतकाच्या प्रारंभी ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेते जीवनवादी वि. स. खांडेकर (ययाती) यांनी त्यांच्या साहित्यात आर्थिक विषमता, ध्येयवादी व्यक्तिंचे वैफल्य, दलितांवर होणारा अन्याय, दांभिकता दाखवून सामाजिक आशय आणला. ‘श्यामची आई’ या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक साने गुरुजी यांनी बालकुमारांसाठी कथा, कादंबरी, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र,अनुवाद असे भरपूर लेखन केले. इतर लेखकांपैकी ‘बालसन्मित्र’ पाक्षिकाचे संपादक पा. ना. मिसाळ, ‘मार्क्सवादी लेखक आणि समीक्षक खंडेराव सुळे, आणि गणेश बाळकृष्ण ताम्हाणे (कोकणची पाउलवाट) यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. पुढील काळात ग. त्र्यं. माडखोलकरांनी कादंबऱ्या, एकांकिका, समीक्षा, आणि लघुकथा लिहिल्या. त्यांच्या कादंबऱ्यातून सशस्त्र क्रांतीबद्दलचे प्रेम आणि समाजवादाचा पुरस्कार आढळतो. जवळपास 1200 कथा आणि 50 कादंबऱ्या लिहिणारे शब्दप्रभू श्रीपाद काळे यांनी त्यांच्या साहित्यातून कोकणच्या निसर्गाचे आणि लोकजीवनाचे मार्मिक वर्णन केले. 1958 साली प्रसिद्ध झालेल्या  ‘कोकणी गं वस्ती’ या पहिल्या कथासंग्रहापासून आजवर सातत्याने लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी ‘माहिमची खाडी’ या कादंबरीद्वारे मुंबईतल्या झोपडपट्टीतील माणसांचे जीवन रेखाटले. त्यांच्या साहित्यात मानवी स्वभाव, मानवी जीवन आणि कोकणातील निसर्गाचे कुतूहल व्यक्त झाले.

स्वातंत्र्योत्तर काळातील समाजवादी लेखक ना. ग. गोरे यांचे ललितनिबंध, वैचारिक लेख, बालसाहित्य आणि कथासंग्रह  रेखीव मांडणी, स्पष्ट विचार आणि अभ्यासपूर्ण विवेचन यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी कालिदासाचे मेघदूत आणि पंडित नेहरूंच्या आत्मचरित्राचा अनुवाद केला. साहित्यिक मधुसूदन भावे यांनी कविता, गीते, कादंबरी, लेख, आत्मचरित्र आणि लोकनाट्ये लिहिली. ग्रामीण कथा व कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांनी कथा-कादंबऱ्यांमधून ग्रामीण जीवन, शेतकऱ्यांचं दुःख व व्यथा-वेदना समर्थपणे चित्रित केल्या. बाळकृष्ण प्रभुदेसाई, यांचा कथासंग्रह आणि दोन कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांची  दोन नाटके अप्रकाशित राहिली.

साठोत्तरी काळातील साहित्यिक चि. त्र्यं. खानोलकर (आरती प्रभू) यांनी नाटक, कादंबरी व कथेच्या क्षेत्रात कोकणातील दंतकथा व गूढता यांचा प्रभावी उपयोग केला. त्यांच्या साहित्यातून मानवी जीवनातील अतर्क्य आणि अदभूत यांचा शोध घेण्यामुळे त्यांचे वेगळेपण जाणवते. मं. वि. कोल्हटकर, वि. कृ. नेरूरकर यांच्या साहित्यात कोकणातील अज्ञाताच्या भीतीचे चित्रण  आहे. प्र. श्री. नेरूरकर यांनी कादंबरी, नाटक, बालसाहित्य, प्रवासवर्णन आणि चरित्रे साकारली आणि मालवणी बोलीतील साहित्यावर संशोधन केले. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले संसदपटू बॅ. नाथ पैं यांना मराठी कवीच्या काव्यपंक्ती मुखोद्गत असत. गं. बा. सरदार यांनी आपल्या ग्रंथांतून सामाजिक प्रबोधनाचे विचार मांडले.  चंद्रकांत खोत यांचे कवितासंग्रह, कादंबऱ्या (‘उभयान्वयी अव्यय’ आणि ‘बिंब-प्रतिबिंब’) प्रसिद्ध आहेत. पण खेदाची गोष्ट म्हणजे त्यांच्या लेखनावर अश्लीलतेचा शिक्का बसल्याने त्यांना मान्यता मिळाली नाही तसेच त्यांचे बालसाहित्यही दुर्लक्षित राहिले. सतीश काळसेकर यांचा ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ हा लेखसंग्रह (साहित्य अकादमी) आणि ‘इंद्रियोपनिषद’ कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. लोकप्रिय लेखक रत्नाकर मतकरी यांनी गूढकथा, भयकथा, नाटकं, आणि बालनाट्ये अशी शेकडो पुस्तकं लिहिली.

जयवंत दळवी यांनी देखील कथा, कादंबऱ्या, नाटके या साहित्यप्रकारात ‘चक्र’, ‘महानंदा’, ‘संध्याछाया’, ‘बॅरिस्टर’, ‘सूर्यास्त’ ‘पुरुष’, ‘सारे प्रवासी घडीचे’ अशी लोकप्रिय पुस्तके लिहिली. विवेकवादी समाजसुधारक हमीद दलवाई यांचे लेखन कोकणातील अन्य लेखकांपेक्षा वेगळे होते. त्यांच्या कथा (‘लाट’ कथासंग्रह) वास्तववादी जाणिवा व्यक्त करतात. साहित्यातून महानगरीय माणसाचे दु:ख मांडणाऱ्या ह. मो. मराठे यांच्या ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ आणि ‘काळेशार पाणी’ या कादंबऱ्या गाजल्या. माधव कोंडविलकर यांचे ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ या पुस्तकातून वाचकांना उपेक्षित जीवनविश्वाचा परिचय झाला. ग्रामीण संस्कृतीविषयी ‘बलुतेदार’,  ‘बखर सदाशिव वाशीकरची’ आणि ‘शब्दानुबंध’ ही पुस्तके लिहिणारे शंकर सखाराम यांची ‘सेझ’ कादंबरी मुंबई विद्यापीठाने ‘एमए’च्या अभ्यासक्रमात लावली.

आ. ना. पेडणेकर यांच्या लेखनात कोकणातील लोकजीवन आणि निसर्ग यांचे चित्रण आढळते. त्यांनी ‘शैलुक’, ‘मैत्र’, ‘वेडा’, इत्यादी कथासंग्रहातून सामाजिक विकृतींचा निषेध केला. श्री. ना. पेंडसे यांच्या लेखनातून प्रादेशिक जीवनासह मानवी जीवनाचे मर्म दिसते. त्यांच्या  ‘एल्गार’, ‘हद्दपार’, ‘गारंबीचा बापू’ आणि ‘तुंबाडचे खोत’ या कादंबऱ्या आणि नाटके प्रसिद्ध आहेत. विद्याधर भागवत हे ‘आरती’ मासिकाच्या संपादनाबरोबरच कविता, कथा, कादंबरी, नभोनाट्य, बालसाहित्य, साहित्य समीक्षा आणि चरित्रलेखन करीत असत. त्यांना बालकवी ठोंबरे यांच्यावरील ‘एैलतटावर – पैलतटावर’ कादंबरीसाठी पुरस्कार मिळाले.

डॉ. विद्याधर करंदीकर यांनी कवितासंग्रह, मालवणी एकांकिका तसेच केशवसुत आणि वीर सावरकर यांची चरित्रे लिहिली. प्रसिद्धीपासून दूर असणारे लुई फर्नांडिस यांच्या साध्या, सरळ शैलीतील कथांतून (‘कोऱ्या पानांची फडफड’) राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्य, ध्येयनिष्ठ आणि धर्मनिरपेक्षता व्यक्त झालेली आहे. अनंत वासुदेव मराठे हे व्यासंगी लेखक आणि ‘किरात’ साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांनी अनेक ऐतिहासिक, धार्मिक ग्रंथाचे संपादन केले होते. प्रख्यात ललित लेखक रविंद्र पिंगे यांनी अनेक 200 ललित लेख, 300 व्यक्तिचित्रे आणि कथा-कादंबऱ्या लिहिल्या. वि. स. सुखटणकर यांच्या साहित्याची प्रेरणा मानवी स्वभाव आणि जीवनातील नाट्य ही होती. सिंधुदुर्ग साहित्य संघाचे सक्रिय कार्यकर्ते हरिहर आठलेकर हे वाङ्मयीन कार्यकर्ता, आणि ललित लेखक म्हणून परिचित होते. शरद काळे यांचे ललित लेख, कथा व कविता सत्यकथा ‘आरती’ मसिकांमधून प्रसिद्ध झाल्या. या काळात ज्या स्त्री लेखिका पुरुषांच्या बरोबरीने साहित्याच्या क्षेत्रांत सक्रिय होत्या, त्यातील ‘विभावरी शिरुरकर’ या टोपण नावाने लिहिणाऱ्या मालतीबाई बेडेकर पूर्वाश्रमीच्या कोकणातील होत्या. त्यांच्या ‘कळ्यांचे निःश्वास’ कथासंग्रहात स्त्रियांचा भावनिक व्यथांचे दर्शन घडते.

कोकणात अनेक नाटककार झाले. गडकऱ्यांच्या प्रभावाने ल. मो. बांदेकर यांनी ‘आर्य चाणक्य’, ‘सेकंड लिअर’ अशी नाटके लिहिली. मामा वरेरकर यांनी ‘हाच मुलाचा बाप’, ‘संन्याशाचा संसार’, ‘सत्तेचे गुलाम’, ‘करीन ती पूर्व’ इत्यादी 37 नाटके लिहिली आणि त्यातून सामान्यांचे प्रश्न मांडले. मो. ग. रांगणेकर यांच्या ‘कुलवधु’ नाटकाला फार लोकप्रियता मिळाली. चि. त्र्यं. खानोलकर यांच्या ‘ एक शून्य बाजीराव, ‘अजब न्याय वर्तुळाचा’ या दर्जेदार नाटकांनी रंगभूमी गाजविली.

श्याम फडके यांनी एकांकिका, मुलांसाठी विनोदी नाटके आणि रसिकांसाठी नाट्यलेखन केले. श्री. ना. पेंडसे यांची महापूर’, ‘संभूसाच्या चाळीत’, ‘चक्रव्यूह’ ही नाटके लोकप्रिय झाली. ऐंशीच्या दशकात हौशी आणि व्यावसायिक नाटककार  प्र. ल. मयेकर यांची रूपकात्मक नाटके नाट्यस्पर्धांमध्ये गाजली. लोकप्रिय नाटककार ला. कृ. आयरे यांनी आपली नाटके कामगार रंगभूमीवर सादर केली. आत्माराम सावंत यांनी कामगार नाट्यस्पर्धांसाठी लेखन केले. याच काळात रमेश पवार, वामन तावडे, डॉ. अनिल बांदिवडेकर, तुलसी बेहरे, गंगाराम गवाणकर, मधुसूदन कालेलकर इत्यादींची नाटके प्रसिद्ध होती. प्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या ‘लोककथा 78’ आणि ‘आरण्यक’ या समांतर नाटकांना मानाचे स्थान मिळाले.

मराठी नाटकाच्या इतिहासात कोकणातील हिराबाई पेडणेकर या पहिल्या मराठी स्त्री नाटककार होत्या. परंतु त्यांना तो मान मिळाला नाही याचा खेद वाटतो. या संक्षिप्त लेखात कोकणातील साहित्यिक आणि त्यांचे साहित्य यांचे केवळ ओझरते दर्शन मिळण्याची शक्यता आहे. मात्र या लेखांतून कोकणचे साहित्यिक गतवैभव किती लक्षणीय आहे याचे प्रत्यंतर रसिकांना येईल असे वाटते.

-रमेश सावंत

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..