आज शोधत काहीतरी होतो, ते अजूनतरी सापडलेले नाहीए. शोध सुरु आहे. पण बरंच काही सापडलं -जे विसरलं गेलं होतं आणि कोठेतरी मनाच्या कोपऱ्यात पडलं होतं –
१) कुसुमाग्रजांची ३ पत्रे ( आठवणीत एकच होतं)
२) हृदयनाथांची २ पत्रे (आठवणीत एकच होतं)
३) कवयित्री संजीवनी मराठे यांचे पत्र
४) “केसरी” च्या इंदुताई टिळक यांचे पत्र
५) डॉ वि म कुळकर्णी यांचे पत्र
६) प. पू . पांडुरंग शास्त्री आठवले यांच्यावतीने माझ्या पत्नीच्या प्रस्तावाला( तिला प. पू .दादांचे चरित्र लिहायचे होते- राहून गेले) होकारार्थी आलेले परवानगी पत्र
७) कवयित्री इंदिराबाई संतांचे पत्र
८) यदुनाथ थत्ते यांचे पत्र
९) कविता-रती वाले प्रा. पुरुषोत्तम पाटील यांचे पत्र
१०) सुधीर मोघेंचे पत्र
११) प्राचार्य लीलाताई पाटील (ना.सी. फडकेंच्या कर्तृत्ववान कन्या) यांचे प्रशंसा पत्र
काही जीर्ण-शीर्ण पण तग धरून राहिलेली , काही बऱ्या अवस्थेत ! एकेकाळी आमच्या उभयतांच्या प्रकाशित साहित्याच्या कात्रणांचे अल्बम मी केले होते, पण नंतर संख्या वाढत गेल्याने तो नाद सोडून दिला आणि ते सरळ फाईलबद्ध करायला सुरुवात केलीय.
आता अशा “संचित ” पत्रांचे अल्बम करावे म्हणतोय, नाहीतरी आपण फोटोंचे अल्बम करतोच. शेवटी स्मृतींचे CONSERVATION महत्वाचे ! मेंदूची हार्डडिस्क आताशा “स्लो” झालीय. तिची खूप स्पेस व्यापलीय आणि कमी उरलीय. संगणकासारखा तोही अलीकडे धमकी देतो- ” स्पेस सरत आलीय. जुनं डिलीट करा ( आणि अर्थातच नवं स्मृतिकोशात वाढवू नका), कारण येथे नवीन GB स्पेस- विकत घेण्याची इच्छा असली तरीही सोय नाही.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply