(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०२१६ नारायण गणेश तथा राजाभाऊ देवधर ह्यांनी लिहिलेला हा लेख)
पेण मधला गणेशमूर्ती तयार करण्याचा व्यवसाय आता चांगला प्रतिष्ठा पावलाय. गणपतीची उत्तम मूर्ती कुठली तर पेणचीच अशी पेणची ख्याती झाली आहे. भारताच्या नकाशावरील बारीक टिंबाएवढं पेण गाव आषाढ महिना संपून श्रावण उजाडला की एकदम प्रकाशझोतात येतं. चर्चेचा विषय बनतं. फोटोग्राफर्स, आकाशवाणीवरील मंडळी, मुलाखतकार, टी.व्ही. चं युनिट, महाराष्ट्रातील दूरदूरचे व्यापारी सर्वजण पेणकडे धाव घेऊ लागतात. गावातील मुख्य रस्त्यांच्या कडेलाच नव्हे तर गल्लीबोळातूनही त्यांना गणपतीचे कारखाने दिसू लागतात. नागपंचमी जवळ आली की जशी बत्तीस शिराळ्याची आठवण होते, तशीच गणपती जवळ आले की सर्वांना पेणची आठवण होऊ विषय लागते. हे महत्त्व पेणलाच का आलं? अन्य गावांना कां नाही? हा कुतूहलाचा होतो. आश्चर्य वाटेल पण या कुतूहलापोटीच एका एम.ए. झालेल्या शिक्षिकेने पी.एच. डी.च्या प्रबंधासाठी ‘पेणचा गणपती व्यवसाय’ हा विषय घेतला होता.
महाराष्ट्रातील लोक प्रायः गणपतीपूजक आहेत. जसे बंगालमध्ये लोक कालीपूजक आहेत, गुजराथी बांधव किंवा उत्तरप्रदेशीय मंडळी कृष्णपूजक आहेत त्याप्रमाणे. एकेक प्रांतांत एकेका देवतेचं माहात्म्य असतं. म्हणून अष्टविनायकांची आठही स्थाने महाराष्ट्रातच आहेत. फार पूर्वीपासून महाराष्ट्रात गणेशपूजा अस्तित्वात आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशी तळ्याकाठची किंवा नदीकाठची माती आणून हाताने जमेल तशी गणेशमूर्ती तयार करायची, ओल्या मूर्तीचीच प्राणप्रतिष्ठा करायची, हळदकुंकू, अबीर, फुले आणि पत्री वाहून तिची समंत्रक पूजा करायची व दुसरे दिवशी तिचं विसर्जन करायचं. ही प्रथा घरोघर चालू असे. ज्यांना स्वतःच्या हाताने ओबडधोबडसुद्धा मूर्ती बनवता येत नसे ते बऱ्यापैकी मूर्ती करणाऱ्यांकडून करवून घेत असावेत. अशाच बऱ्यापैकी मूर्ती करणाऱ्यांत त्या वेळचे एक गृहस्थ श्री. भिकाजीपंत देवधर ह्यांचे नाव नजरेसमोर येते. १८६० सालचे सुमारास तळ कोकणांत जन्माला आलेले श्री. भिकाजीपंत हे उपजीविकेचे साधन मिळविण्याकरता म्हणून १८७६चे सुमारास पेणला आले व येथेच स्थायिक झाले. कोणी भिडे म्हणून एक पगडबंद त्या काळांत पेणला पागोटी बांधण्याचा व्यवसाय करीत असत. त्यांचे जवळच भिकाजीपंत देवधर हे मूर्ती करायला शिकले. त्यांच्या हाताला काही दैवी स्पर्श असावा. कारण सर्वसाधारण मूर्तीपेक्षा त्यांनी बनविलेल्या मूर्ती अधिक सुबक होऊ लागल्या. त्यामुळे त्या विकत घेण्याची लोकांची प्रवृत्ती वाढली. उपजीविकेचे हेही एक छोटेसे साधन ठरले.
श्री. भिकाजीपंत ह्यांच्या कोकणांतील समवयस्क मित्रांनी पोटासाठी मुंबई गाठली होती. हॉटेल किंवा खाणावळ चालविणे यासारखे व्यवसाय ते करीत. त्यांना भेटण्यासाठी अधूनमधून भिकाजीपंत मुंबईस जात असत. अशाच एका भेटीत त्यांची गाठ परब किंवा पवार अशा कोणातरी गृहस्थांशी पडली. सदर गृहस्थ एका युरोपियन कंपनीत नोकरीस होते. तेथे प्लॅ स्टर ऑफ पॅरिस पासून छताच्या सजावटीचे काम केले जात असे. परब ह्यांचेकडून श्री. भिकाजीपंत यांनी प्लॅस्टरच्या उपयोगाची व त्यापासून संचे (मोल्ड) तयार करण्याची जुजबी माहिती मिळविली व तिच्या आधारावर त्यांनी पेणला आल्यावर गणपतीचे संचे बनवून पाहिले. ते चांगले काम देऊ लागले. त्यांना जणू सोन्याची खाणच हाती आली असं वाटलं. हाताने मूर्ती बनविण्याचे कष्ट वाचले. उत्पादनही वाढले. प्लॅस्टरचे मोल्ड तयार केल्यामुळे शे-दोनशे मूर्ती अधिक तयार झाल्या तरी त्या खपवायच्या कुठे? हा प्रश्न निर्माण होतांच गणेशमूर्तींनी मुंबई गाठली तर विक्रीही जास्त होईल व गावांतील किंमतीच्या मानाने तेथे वाढीव किंमत मिळेल, चार जास्त पैसे गाठीला बांधता येतील असा हिशोबी विचार त्यांनी केला. विचार झाला पण मूर्ती मातीच्या, माती ठिसूळ, फूटतूट न होता मुंबईपर्यंत मूर्ती सुरक्षित पोचायच्या कशा असा प्रश्न उभा राहिला. पण त्यांतूनही मार्ग निघाला. पेणपासून मैल दोन मैल अंतरावर अंतोरा नावाचे एक छोटे बंदर आहे. त्या बंदराला मुंबईहून निघालेले मालाने भरलेले मचवे लागत. ते खाली होऊन बैलगाडीने माल कोकणाकडे रवाना होताच रिकामे मचवे मुंबईस परत जात. ह्याच मचव्याने गणपतींना लागणारी भावनगरी पांढरी माती मुंबईहून पेणला येत असे. ह्या मचव्यांतून गणपती मूर्ती मुंबईस रवाना केल्यास मूर्तीना यत्किंचितही धक्का न पोचतां त्या मुंबईस सुखरूप पोचतील हे ध्यानी आले आणि त्या दृष्टीने प्रयोग सुरू झाला. अर्थात त्यांतही कमी अडचणी नव्हत्या. गणेशचतुर्थीच्या अगोदरचे ४/८ दिवस म्हणजे पावसाचे दिवस. केव्हा कसा पाऊस कोसळेल याचा नेम नाही. त्या काळात हल्ली सारखे प्लॅस्टिक कापड उपलब्ध नव्हते. म्हणून केळीच्या पानांनी पेट्या आच्छादून घ्याव्या लागत. नंतर पेट्या हमालांच्या डोक्यावरून अंतोरा बंदरांत उभ्या असलेल्या मचव्यावर चढविल्या की मग मूर्तीचा सागर प्रवास सुरू व्हायचा. मचवा भाऊच्या धक्क्याला लागला की घोडागाडीतून पेट्या इष्ट स्थळी पोचत्या व्हायच्या. श्री. भिकाजीपंतांनी विक्रीसाठी मूर्ती मुंबईला न्यायला सुरुवात केली तेव्हा आपल्या मित्रांच्याच जागेत ते मूर्तीची विक्री करीत. कालांतराने मूर्तीचा व्यापार वाढला तेव्हा दादर, लालबाग, गुलालवाडी इत्यादि ठिकाणी गणपतींचा बाजार सुरू झाला.
भिकाजीपंत देवधरांचा कारखाना सुरू झाला तेव्हा त्यांचे समकालीन कारखानदार कोणी नसतीलच असे नाही. परंतु श्री त्यांच्या पुढील पिढ्या ह्या व्यवसायात न उतरल्यामुळे त्यांची नावे अज्ञातच राहिली आहेत. भिकाजीपंतांच्या हयातीतच -गावांत लोंढे, त्यानंतर रहाळकर यांचे कारखाने सुरू झाले. भिकाजीपंतांचे पुत्र श्री. गणेश भिकाजी उर्फ बाबूराव देवधर – ह्यांनी वडिलांच्या पश्चात व्यवसाय चालू ठेवला. त्यांचे समकालीन कोणी बाळू चितारी म्हणून होते. ते गणपतीशिवाय इतर वेळांत प्लॅस्टरच्या देवादिकांच्या सुबक प्रतिमा तयार करीत. बाबुराव देवधरही तशा प्रतिमा तयार करीत असत. त्यामुळे की काय बाबुराव देवधरांनी मुंबईस दुकान थाटण्याचे बंद केले. त्यांचे अकाली निधन झाल्यामुळे पुढील पिढीला चरितार्थासाठी तोच व्यवसाय करावा लागला. तो भरभराटीला आल्यानंतर भिकाजीपंतांची चौथी पिढीही या व्यवसायात नाव कमावून आहे. हे वंश सातत्य व व्यवसाय सातत्यही या धंद्याच्या भरभराटीला कारणीभूत आहे.
श्री. चिटू नाईक म्हणून एक गृहस्थ पेणला रहात असत. त्यांचाही गणपतीचा कारखाना होता असे सांगतात. पण तो भिकाजीपंत देवधरांच्या निधनानंतर सुरू झाला असावा. कारण चिटू नाईकांचा मोठा गणपती स्वतः भिकाजीपंतच घरी करीत असत. त्याच चिटू नाईकांचे वंशज की नातेवाईक नक्की माहीत नाही पण बांदिवडेकर म्हणून एक कुटुंब पेणेत होतं. त्यांच्या कारखान्यांत तयार होणाऱ्या मूर्तीची फार वाखाणणी होत असे. त्यांचे मातीकाम सुबक व रंगकाम आकर्षक असे. त्याच कुळांतील श्री. गजाननराव बांडिवडेकर हे मोठे शिल्पकार म्हणून नावजले गेले. त्यांचे मोठे बंधू श्री. पांडुरंगराव त्यांच्या निधनानंतर गजाननराव व त्यांचे धाकटे बंधू श्री. संभाजीराव ह्यांनी कारखाना मुंबईस हलवला. कै. बाबूराव देवधर ह्यांच्या कारखान्यांतील कारागिरांनी हळूहळू आपले स्वतःचे कारखाने उभे केले. तरीसुद्धा अडचणीच्या वेळी एकमेकांना मदत करण्याची त्यावेळच्या लोकांची वृत्ती होती. श्री. बाबुराव देवधरांनी त्यांना गणपतीचे संचे करून द्यावे तर त्या मंडळींनी पूर्वीचे ऋण स्मरून अडचणीच्या काळांत बाबुराव देवधरांना साहाय्य करून त्यांचे अपुरे राहिलेले काम पुरे करून द्यावे असे चाले.
मुंबई मार्केट उपलब्ध झाल्यावर पेणला कारखान्यांची संख्या वाढू लागली. सुरुवातीला ब्राह्मण, क्वचित कुंभार समाजातील मंडळीच या व्यवसायात असत. तो आता समाजातील सर्व जातीची मंडळी या धंद्यात पडू लागली. ह्या धंद्याचं स्वरूप काहीसं कौटुंबिक असल्यामुळे कित्येक ठिकाणी घरातील मुली, सुनाही पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या व त्यात त्यांनी प्रावीण्यही मिळविले. अलीकडच्या काळात ज्यांनी आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला त्यात बळीराम पवार, प्रदीप हजारे, जयवंत गुरव, राजाभाऊ गुरव, बिवलकर, सुरावकर, माधव फाटक, साळवी, समेळ, वडके, डेरे, साष्टे, कुंभार आळीतील जोशी, भोईर वगैरे नावे प्रामुख्याने आहेत. देवधर तर पूर्वीपासून आहेतच. स्पर्धेमुळे आणि परंपरा असल्यामुळे मूर्ती सुबक व रेखीव करण्याकडे जास्त लक्ष दिलं जाऊ लागलं. त्यामुळे मुंबईच्या बाजारात त्यांचं नाव झालं. आता वाहतुकीची व्यवस्थाही सुलभ झाली होती. मचव्याने वाहतूक करायचा खटाटोप करण्याची आता आवश्यकता राहिली नव्हती. एके वर्षी मचवा बुडून पूजन होण्यापूर्वीच मूर्तीचं समुद्रात विसर्जन झालं होतं. आता बऱ्यापैकी रस्ते झालेले असल्यामुळे व ट्रक सर्व्हिस सुरू झाली असल्यामुळे ट्रकने मूर्ती पाठविण्याची सोय झाली. दादर, लालबाग, गुलालवाडी हे भाग विक्रीकेन्द्र झाले. हळूहळू मागणीपेक्षा पुरवठा जास्त असं व्यस्त प्रमाण होऊ लागलं. धंदा जुगार ठरू लागला. कुणाचा धंदा बरा तर कुणाचा वाईट असे होऊ लागले. गणेशचतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी रिकाम्या पेट्या घेऊन येणाऱ्या ट्रककडे सगळ्या गावकऱ्यांचं लक्ष असायचं. एखाद्या ट्रकमधून रिकाम्या पेट्या उतरतांना जड पेटी काळजीने उतरतांना आढळली की लोक तर्क करीत की, यंदा पेट्या परत आल्या याचा अर्थ धंदा चांगला झाला नाही. ह्याचवेळी धंदा चांगला किंवा वाईट होण्याविषयी एक आडाखा तयार झाला होता तो असा की गणेश चतुर्थीच्या ५-६ दिवस अगोदर पगाराची तारीख येत असेल व विक्रीच्या दिवशी पाऊस असेल तर बाजार चांगला होईल. कारण खिशांत पैसे खुळखुळत असतात व पावसामुळे सतरा ठिकाणी गिऱ्हाईक हिंडत बसत नाही व किंमतीबद्दल घासाघीस करीत नाही.
ह्या सर्व परिस्थितीमुळे साधारपणे १९५१-५२ सालचे सुमारास अनिश्चिततेमुळे ह्या धंद्याचे भविष्य अंधारात चाचपडायला लागले होते.
त्याच सुमारास धंद्याला एक नवीन कलाटणी मिळाली. कै. भिकाजीपंत देवधरांच्या तिसऱ्या पिढीने गणपती मूर्ती विक्रीचे तारू पुण्याकडे वळविले. पेणचे गणपती पुण्याला जाऊ लागेपर्यंत पुण्याच्या ग्राहकांचा विशेष आकर्षक व जास्त किंमतीच्या मूर्ती खरेदी करण्याकडे कल नव्हता. तोपर्यंत मागच्या बाजूने पोकळ असलेले, ओबडधोबड, फारशी रंगरंगोटी नसलेले कुंभारी गणपतीच लोक खरेदी करीत. पण आता पेणच्या आकर्षक मूर्ती पाहिल्यानंतर पुण्याच्या ग्राहकांची दृष्टी त्या मूर्तीकडे वळली. मुंबईसारखे दुकान न टाकता येथील व्यापाऱ्यांना थोडे कमिशन देऊन रोख किमतीने पेणच्या गणेश मूर्तीकारांनी विशेषतः देवधर बंधूंनी माल द्यायला सुरूवात केली. पुढे पुढे केवळ पुणेच नव्हे तर नाशिक, सोलापूर, नगर, धुळे, जळगाव, मराठवाडा इथपर्यंतचे व्यापारी पेणला येऊन मूर्ती खरेदी करू लागले. मुंबईचे व्यापारीही त्यात सामील झाले. देवधर ह्यांचं नाव या क्षेत्रात प्रसिद्ध असल्यामुळे सर्व व्यापारी प्रथम देवधरांकडेच येत. पण देवधरांच्याही काही मर्यादा होत्या. शिवाय गणेशमूर्तीबरोबरच इतर देव-देवतांच्या मूर्ती, पुतळे वगैरे ते करीत असल्यामुळे पावसाळ्यातील तीन महिन्यापुरतेच गणेशमूर्ती तयार करायचं त्यांनी निश्चित केलं होतं. त्यामुळे आलेल्या व्यापाऱ्यांना त्यांनी आपण होऊन इतरांकडे पाठवायला सुरूवात केली. त्यामुळे सगळ्याच कारखानदारांना मुंबईच्या मानाने थोडा कमी लाभाचा पण निश्चित स्वरूपाचा धंदा मिळू लागला. बँकांकडून सहज कर्ज मिळत गेल्यामुळे भांडवलाचाही प्रश्न सुटला.
पण आता ह्यापुढे पेणला कारखाने वाढतील असे वाटत नाही. कारण व्यापाऱ्यांतही स्पर्धा सुरू झाली आहे. एखाद्या ठिकाणी पूर्वी व्यापाऱ्याचे एकच दुकान असे, तेथे आता दहा दहा दुकाने दिसू लागली आहेत. तसेच अनेक ठिकाणी तेथील लोकांनी गणपतीचे कारखाने सुरू केले आहेत. काही जणांचे म्हणणे असे की लोकसंख्या वाढते आहे. एका घराची चार-चार घरे होत आहेत. त्यामुळे मूर्तीच्या मागणीत वाढ होईल. परिणामतः कारखान्यांची संख्या वाढत राहील. परंतु असं होईल असे मला वाटत नाही. कुटुंबांतील माणसे दूरवर गेली तरी ती स्वतंत्रपणे मूर्ती आणीत नाहीत. पूजा मोठ्या घरीच होते. सर्वजण तिथेच एकत्र जमतात. त्यामुळे मूर्तीची मागणी वाढेल असे दिसत नाही.
या धंद्याचे भवितव्य काय असा प्रश्न काहीजण विचारतात. त्याचं उत्तर असं आहे की जोपर्यंत माणसाच्या अंतःकरणात श्रद्धा आहे आणि विज्ञानाची कितीही प्रगती झाली तरी ती नाहीशी होणार नाही. तोपर्यंत लोक गणेशाला पूजणारच. विज्ञानाने शरीराला आराम देणारी साधने निर्माण करून ऐहिक सुख मिळविता येतं. पण अनेक आघातांनी माणसाचं मन हळवं बनलेलं असतं. तिथे विज्ञान काही करू शकत नाही. संकटकाळी माणसाला कशाचा तरी आधार हवा असतो. त्यासाठी अनेक देवतांच्या ठिकाणी माणसाने ईश्वर रूप कल्पिलेले आहे. त्यांतील गणेश हे एक श्रेष्ठ ईश्वररूप आहे. त्याची उपासना करून पूजाअर्चा करून मनाला समाधान प्राप्त करून घेणं, देवावर सगळा भार टाकून निश्चिंत होणं, काळजीतून मुक्त होणं ही मानसिक गरज असते. शिवाय माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे.
गणेशचतुर्थीच्या गणपती पूजनाच्या निमित्ताने कुटुंबातील दूरदूर गेलेले घटक एकत्र येतात, मोकळेपणाने राहतात, सुखदुःखाच्या गोष्टी करतात, मिष्टान्न भोजन होते. जुन्या मित्रांच्या, परिचितांच्या गाठीभेटी होतात व दोन दिवस मजेत घालवून वर्षभर पुरेल असे समाधानाचं पाथेय बरोबर घेऊन जातात. घरी गणपती आला की लहान मुलांच्या आनंदाला सीमा राहत नाही.
गणेशपूजन हे जरी धार्मिक कार्य असलं तरी त्यांत कर्मकाण्ड नाही. त्यामुळे लोक त्याचा कंटाळाही करीत नाहीत. शिवाय पूर्वीच्या मानाने लोकांजवळ आर्थिक अनुकूलताही आहे. त्यामुळे गणेशपूजनाच्या प्रथेत खंड पडणारी नाही व व्यवसायावर कसलाही विपरीत परिणाम होणार नाही याबद्दल खात्री वाटते.
‘पेणचा गणपती व्यवसाय’ हाच लेखाचा विषय असल्यामुळे अन्य ठिकाणच्या गणपती व्यवसायाबद्दल लिहिलं नाही. परंतु पेणपासून खाली सागरपट्टीच्या सर्व शहरांतून व गावांतून गणपती मूर्तीकार पसरलेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यांत अगदी लहान गावांतसुद्धा गणपतींचे कारखाने चालतात. खुद्द रत्नागिरी, मालवण, दाभोळ, वेंगुर्ले ही गावे गणपती मूर्तीसाठी मुंबईत स्थायिक झाले आहेत व उत्तम मूर्तीकार म्हणून नाव कमवून आहेत. पण ही गावे मुंबईपासून फार दूर अंतरावर असल्या कारणाने व्यापारासाठी त्यांना मुंबईचा उपयोग करून घेता आला नाही. त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतापासून ती दूर राहिली. पेणसारखी प्रसिद्धी त्यांच्या वाट्याला येऊ शकली नाही. मात्र या सागर किनाऱ्यावरील गावांप्रमाणे घाटावरील एकही गाव गणेश मूर्तीकरिता प्रसिद्ध नाही. असं का हा संशोधनाचाच विषय आहे.
-नारायण गणेश तथा राजाभाऊ देवधर, पेण
(व्यास क्रिएशन्सच्या प्रतिभा दिपोत्सव २०२१६ ह्या श्री गणपती विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply