सगळे कावळे एकाच आकाराचे कसे ?
हा प्रश्न एकदा मला पडला. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा विचारांची गाडी सूर्यास्तापाशी येऊन थांबली.
वो हुआ कुछ इस प्रकार…
एकदा समुद्रकिनारी फिरताना, पंधरा वीस कावळे काहीतरी “फिस्ट” चा आनंद मजेत घेत होते. जवळ जाऊन बघितले तर तो एक मेलेला कुत्रा होता. खूप घाणेरडा वास येत होता. बहुतेक तीन चार दिवसापूर्वी मेलेला असावा. किडे पण पडले होते. पण कावळ्यांसाठी ती दावतच होती. निरीक्षणाअंती असे दिसले, सर्वजण मजेत तो मेलेला, कुजलेला कुत्रा खात होते. म्हणजे अस्वच्छ, शिळे, नासलेले, कुजलेले खाऊ नये, हे पथ्य ते पाळत नव्हते. तरीही ते निरोगी दिसत होते. कारण त्यांचा नेहेमीचा आहार पण असलाच असतो. पण सगळे अगदी एकाच आकाराचे दिसत होते. एकही बारीक नाही, एकही जाड नाही.
असे का ? असे स्वतःलाच विचारले, तेव्हा असे लक्षात आले की, कावळे सूर्योदयापुर्वी उठतात, खायला सुरवात करतात, कोणत्याही प्रकारचे पथ्य न पाळता खातात. कोणताही विचार न करता खातात, खाऊन झाल्यावर सुद्धा विचार करत नाहीत, की मी हे का खाल्ले ? हे असे खाऊन सुद्धा सगळे पचवतात. आणि त्यांच्या अंगावर चरबीचा अंशही शिल्लक रहात नाही !
कसा राहील आणि कशाला त्या कावळ्यांचा आकार बदलेल? जर खाल्लेलं सर्व अन्न पचवायला पुरेसा वेळ दिला तर !
कावळ्यांची सूर्योदयाला काव काव सुरू होते ती अगदी सूर्यास्त होईपर्यंत ! मग कावळ्यांच्या पोटात कितीही कावळे ओरडले तरीही…
त्यानंतर खाव खाव अजिबात नाही. अपवादाला पण नाही.
हे सगळे कावळे असे का वागतात, असा प्रश्न स्वतःला विचारल्यावर लक्षात आले, की कावळ्यांच्या शाळेत फक्त त्याचीच सत्ता चालते. त्याचाच नियम सर्वत्र पाळला जातो. त्याच्या शब्दाबाहेर कोणीही जात नाही.
सगळे कावळे फक्त त्याचेच ऐकतात. फक्त कावळेच नाही तर चिमण्या, पोपट, कबूतर आणि सर्व पशुपक्षी हाच एकमेव वैश्विक नियम पाळतात, सुर्योदय ते सुर्यास्त खायचे आणि सुर्यास्त ते सुर्योदय खाल्लेलं पचवायचे !
त्यानेच सांगितले आहे ना, “अहं वैश्वानरो भूत्वां….. ” मीच तो जाठराग्नि आहे. तुम्ही चारही प्रकारचे अन्न खाल्लेत तरी ते पचवायचे काम माझे आहे.अन्न खाण्याची जबाबदारी तुमची आणि पचविण्याची चिंता तुम्ही करू नका, ती जबाबदारी पूर्णतः माझी. फक्त प्रत्येक वेळी एकच नियम पाळा, जो वैश्विक नियम मी आखून दिला आहे. तो म्हणजे सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत मनसोक्त खावे. आणि नंतर सुर्यास्त ते सुर्योदय या वेळी खाल्लेलं पचवायला वेळ द्यावा.
या सुर्यास्ताच्या वेळेला येऊन थांबल्यानंतर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर त्याने दिले……..
सगळे कावळे एकाच आकाराचे कसे ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
28.02.2017
Leave a Reply