। पिंडी ते ब्रह्मांडी।
मनुष्य देहाची रचना भगवंताने इतकी विचारपूर्वक केली आहे की, प्रत्येक सणावारांचा आणि प्रत्येक शास्त्राचा संबंध मानवी शरीराशी पाहायला मिळतो. सर्वपित्री अमावस्येचा मानवी शरीराशी संबंध लावायचाच म्हणाल तर एक संबंध लावता येईल तो म्हणजे आपल्या छातीच्या बरगडयामध्ये असणा-या हृदयाचा.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, याचा सर्वपित्री अमावस्येशी काय संबंध, पण फार बारकाईनं निरीक्षण केलं तर आपल्याला ही कळेल की, चौदा बरगडयामध्ये एक हृदय देवाने ठेवलं आहे. खरं तर या चौदा बरगडया आणि हृदयाचं एकत्र मोजमाप आणि सर्वपित्री अमावस्येच्या कथेचा संबंध पाहिला तर फार जवळचाच आहे.
कारण हृदयानं निवृत्ती घेतली तर माणसाला मरणाला सामोरं जावं लागतं आणि सर्वपित्री अमावस्येचा विधी केला नाही तर काही वंशपरंपरागत संकटाना तोंड द्यावे लागतं, असा काही तर्क लावता येतो. पण सर्वपित्री अमावस्या केलीच पाहिजे असे शास्त्रात कुठेच पाहायला मिळत नाही, असे नाही. सर्वपित्री श्राद्ध करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
श्राद्ध का केले जाते?
गरुड पुराणाच्या मते, एखादी व्यक्ती गत:प्राण झाली की, त्याचे यमलोकाकडे प्रयाण सुरू होते. व्यक्तीचा देहांत झाल्यावर १३ दिवसांनी त्याचं प्रस्थान यमलोकाकडे होतं असा समज आहे. त्या तेरा दिवसांनंतर शास्त्रशुद्ध विधी केल्या जातात आणि या १३ दिवसानंतर यमलोकी जाण्यासाठी आत्मा सज्ज असतो आणि यमलोकाकडे पोहाचायला किमान १७ दिवस लागतात.
यमलोकी पोहोचल्यानंतर यमपुरीतील न्यायालयात हजेरी लावण्यासाठी यमलोकाच्या माध्यमातूनच प्रवास करावा लागतो. आणि या प्रवासासाठी या आत्म्याला ११ महिने लागतात. या ११ महिन्यांत त्याला अन्न, पाणी मिळत नसल्यामुळे हा विधी केला जातो असे मत आहे. यामुळेच मृत्यूनंतर एक वर्षाच्या आत हा विधी करणं महत्त्वाचं असतं.
महाभारतातील आख्यायिका
महाभारतातील कर्ण आपल्या सर्वाना माहीत असेलच, कर्णासारखा दाता आणि दानशूर व्यक्ती पृथ्वीवर पुन्हा जन्माला येणार नाही, कर्णाच्या दानशूरपणाच्या कथा- कहाण्या आपण लहानपणापासूनच ऐकत आहोत. महाभारताच्या रणांगणावर लढत असतानादेखील मरता मरता एका वृद्ध ब्राह्मणाला आपला सोन्याचा दात त्यानं दान केला होता अशी कथा आपण ऐकली असेलच.
महाभारताच्या रणांगणावर लढत असताना कर्णाला गतप्राण व्हावे लागले आणि जेव्हा तो गतप्राण झाला तेव्हा त्यांच्या आत्म्याचे प्रस्थान स्वर्गाकडे झाले. यानंतर दानशूर कर्ण इंद्रासमोर उभा होता. तेव्हा इंद्राने त्याला अन्न म्हणून सोने खायला दिले. यावर कर्ण म्हणाला, ‘‘इंद्रदेव तुम्ही माझी थट्टा करत आहात का? मी भुकेनं व्याकुळ झालो असताना तुम्ही सोने का थाळीत वाढत आहात.’’
यावर इंद्र म्हणाले की, ‘‘कर्णा आयुष्यभर गरज पडलेल्या प्रत्येकाला तू मदत केलीस. कधीही तुझ्या दारातून कुणीही रित्या हातानं गेलं नाही. पण आयुष्यभर तू धनाचेचं दान केलेस आणि तुझ्या पूर्वजांच्या स्मृतीत कधीही अन्नदान केलं नाहीस, त्यामुळेच मी तुला हे सोनं खायला घालतो आहे.’’ या प्रसंगाने कर्णाचे डोळे उघडले आणि त्याने इंद्राकडे अन्नदान करण्यासाठी मुदत मागितली.
यावर इंद्राने त्याला सांगितले की, सूर्य जेव्हा तूळ राशी सोडून वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि पूर्णचंद्र भुतलावर दिसेल अशा वेळेस हे अन्नदान केलेस तर ते पूर्णत्वास जाईल. त्याचप्रकारे इंद्राने कर्णाला पंधरा दिवस पृथ्वीवर पाठवलं आणि या पंधरा दिवसांत त्यानं पूर्वजांसाठी अन्नदान केलं. यामुळे कर्णासोबत त्यांच्या मागील तीन पिढय़ांना मृत्यूउत्तर गती मिळाली, यामुळेच सर्वपित्री अमावस्येचा पंधरावडा राखून ठेवल्याचे दिसून येते.
Leave a Reply