सर्वपित्री अमावस्या करण्यामागचं कारण
पूर्वजांनी प्रत्येक सणाला एक विशेष महत्त्व दिलं आहे. हा पंधरवडा हा काहीसा अशुभ मानला जात असला तरी यामागे चांगलं आणि खरंच हितकारक कारण दडलं आहे. वर्षभरात माणसाच्या हातून अनेक चांगली-वाईट कर्म घडत असतात.
या चांगल्या-वाईट कामाच्या कचाटयातून सुटण्याकरता पूर्वजांचं निमित्त करून दान-धर्म केला जातो. काही संताच्या अभंगात आपल्याला सहज स्पष्टपणे दिसून येते की, अन्नदानासारखे चांगले दान या भूतलावर नाही कारण अन्नदान केलं तर भोजन करणा-या व्यक्तीचा आत्मा तृप्त होतो आणि हे अन्न ग्रहण करणारे इतर या अन्नदानामुळे सुखी, समाधानी असतात.
असे केल्याने सगळ्या पापांचा अंत झाला, असे मानलं जातं. बहुतेक हीच गोष्ट लक्षात घेऊन आपल्या पूर्वजांनी आपला विचार करत त्यांच्या आठवणींच्या निमित्ताने आपल्या पदरी पुण्य पडावे, यासाठी या पितृपक्षात श्राद्ध करण्याचा घाट घातलेला दिसतो.
सर्वपित्री अमावस्येमधील तिथी आणि त्याचं महत्त्व
सर्वपित्री अमावस्या भाद्रपद पौर्णिमेला सुरू होते आणि भाद्रपद अमावस्येला संपते यामध्ये १५ दिवस आहेत. या पंधरा दिवसांत १५ तिथी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं साज-या केल्या जातात. भाद्रपद पौर्णिमेला पौर्णिमा श्राद्ध किंवा प्रतिपदा श्राद्ध म्हणतात.
जी व्यक्ती प्रतिपदेला किंवा पौर्णिमेला जगाचा निरोप घेते, अशा व्यक्तीच्या स्मृतीत या दिवशी अन्नदान केल्यास त्याची फलप्राप्ती होते असा समज आहे. प्रतिपदेनंतर द्वितिया, आणि तृतीया श्राद्धाचे दिवस येतात. या तिथी वर ज्याचं निधन झालं आहे अशा लोकांना द्वितिया आणि तृतीया दिवशी श्राद्ध आणि तर्पण केल्यास ते फलित होते.
चतुर्थी आणि पंचमी श्राद्धाला एक विशेष महत्त्व आहे. कारण याच श्राद्धाला ‘भरणीश्राद्ध’ देखील म्हणतात. या श्राद्धामध्ये जे अविवाहित लोक मृत्यू पावले आहेत किंवा ज्यांना जगण्याची इच्छा असताना देखील काही आजारांच्या कारणामुळे त्यांना जग सोडावं लागलं ज्याच्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत अशा तरुण किंवा वृद्ध व्यक्तीच्या स्मरणार्थ हे पिंडदान केलं जातं, ज्यावेळेस आपल्याला मृताची तारीख किंवा तिथी माहीत नसते त्यावेळेस बहुतांश लोक भरणी नक्षत्रावर श्राद्ध करताना दिसतात.
खरं तर चतुर्थी आणि पंचमीच्या श्राद्धाला भरणी नक्षत्र असल्यामुळे या श्राद्धाला ‘भरणीश्राद्ध’ ही म्हटलं जातं. या दिवशी घातलेलं श्राद्ध गयेमध्ये श्राद्ध केल्याप्रमाणे आहे. पंचमी श्राद्धानंतर षष्ठी आणि सप्तमीला लोकांच्या मृत्यूप्रमाणे श्राद्ध घातलं जातं यासाठी विशेष महत्त्व नाही, पण जर कोणी षष्ठी आणि सप्तमीला निधन पावला असेल तर यासाठी हे दिवस उत्तम आहेत.
अष्टमीला कमी प्रमाणात श्राद्ध घातली जातात कारण अष्टमीला पुराणकाळापासूनच एक विशेष महत्त्व आहे. अष्टमीला शुभ तिथी मानली जाते यामुळे कमी प्रमाणात श्राद्ध या दिवशी पाहायला मिळतात आणि अष्टमीला निधन पावलेल्या व्यक्तीना जर या दिवशी पिंडदान केले तर त्यांना मोक्षाची गती मिळते.
या श्राद्धाच्या दिवसात नवमी तिथीला वेगळचं महत्त्व आहे. कारण या तिथीलाच ‘अविधा नवमी’ म्हणतात. अविधा नवमी नावातच अर्थ सांगून जाते. लग्नानंतर ज्या व्यक्तीची पत्नी किंवा पती निधन पावतो, अशा व्यक्तीच्या आठवणीसाठी अविधा नवमीचा घाट घातलेला दिसतो. ज्या व्यक्तीच्या आईचे, पत्नीचे किंवा इतर सदस्याचे निधन नवमीला झाले असल्यास हा अविधा नवमी श्राद्ध करावं लागतं.
आईसाठी घातलेल्या या श्राद्धाला ‘मातृश्राद्ध’ असं नामाभिधान प्राप्त झालं आहे. यानंतर येणा-या दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथीवर मृत झालेल्या लोकांसाठी हे दिवस राखून ठेवलेले दिसतात. त्रयोदशी श्राद्धाला वेगळचं महत्त्व आहे कारण मरणानंतर तेरा दिवसांनी मनुष्याचा मरणोत्तर प्रवास सुरू होतो आणि यामूळेच या तिथीला एक वेगळं नाव देण्यात आलं आहे. ते म्हणजे ‘काकबली’.
कारण मृत्यूनंतर पिंडाला ते-याव्या दिवशी कावळा शिवला तर मृत झालेल्या व्यक्तीला सद्गती मिळाली असं समजलं जातं. त्यामुळे त्रयोदशीला श्राद्ध घातल्यावर ज्याच्या पिंडाला कावळा शिवेल त्याला मोक्ष मिळतोच, असा पूर्वापार चालत आलेला समज आहे. त्यामुळे या दिवशीच्या श्राद्धाला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.
या श्राद्धाला ‘मघाश्राद्ध’ देखील म्हटलं जातं. कारण या दिवशी मघा नक्षत्र चंद्र लग्नात असते आणि मघा नक्षत्रामुळे याला ‘मघाश्राद्ध’ म्हणून संबोधलं जातं. यानंतर चर्तुदशीला येणा-या तिथीला ‘चतुर्दशी श्राद्ध’ किंवा ‘चौदस श्राद्ध’ म्हणून ओळखलं जातं. या श्राद्धामध्ये ज्या लोकांचा पाण्यात बुडून किंवा अग्नीचा सामना करताना किंवा अपघाती मृत्यू झाला असेल किंवा ज्याने स्वत: आत्महत्या केली असेल. किंवा एखाद्या वैर भावनेतून कोणा व्यक्तीचा खूण किंवा हत्या झाली असेल अशा व्यक्तीसाठी हा तिथी राखून ठेवलेला दिसतो.
यामध्ये जर कोणी चतुर्दशीला मृत झाले असेल तर त्याचं ही श्राद्ध करता येतं. यानंतर येणारी तिथी म्हणजे अमावस्या या तिथीला ‘सर्वपित्री अमावस्या’ म्हटलं जातं. या तिथीवर अनेक जणांची श्राद्ध केली जातात.
कारण काही कारणास्तव तिथिगत श्राद्ध घालता येत नसतं तर काही वेळेस तिथीच्या नक्षत्राचा चंद्रप्रवेश श्राद्धासाठी उत्तम नसतो तर काही जणांना पूर्वजांची मृत्यू तिथी माहीत नसते तर काही जण कौटुंबिक सुखासाठी प्रथमच श्राद्धाचा घाट घालताना दिसतात, यासाठी हा दिवस उत्तम मानला आहे. या दिवशी श्राद्ध घातले असता, ते पूर्वजांपर्यंत पोहोचतं असा जनमानसाचा समज आहे. या तिथीला ‘मोक्षतिथी श्राद्ध’ही म्हटलं जातं आणि यामुळेच या दिवशी श्राद्ध केले असता पूर्वजांना मोक्ष गती मिळते.
Leave a Reply