“पिंजरा ” लागला होता भुसावळच्या “पांडुरंग” टॉकीज मध्ये, तेव्हा आमच्यासारख्या मुलांनी असले तमाशापट बघावे की नाही, यावर न भूतो न भविष्यति विचारमंथन झाले. रोज टांग्यातून लाऊड स्पीकरवर जाहिरात, सोबत आकर्षणासाठी रंगीत जाहिरात चिठ्ठयांचे वाटप त्यामुळे उत्सुकता फारकाळ दाबता आली नाही. सहकुटुंब जायचे असा तह झाला आणि तरीही अनेक आठवडे गर्दीमुळे तिकीट मिळाले नाही. शेवटी एक संध्याकाळ उगवली आणि आम्ही आत शिरलो.
नृत्यांगना आणि शिक्षक यांच्यातील द्वंद्व भावलं. पहिल्या गाण्यापासून चित्रपट चढला आणि लावण्यांनी तर गुंगवून ठेवलं. शेवटच्या सुधीर फडकेंच्या गाण्याने सगळी वाताहत जाणत्या स्वरात भिडली. बऱ्यापैकी बटबटीत आणि त्याकाळाला अनुसरून असलेला हा तमाशापट ! भुसावळला त्याकाळी आमच्या गल्लीत रात्रभर तमाशाचा फड असायचा आणि “पिंजरा” कानी पडत राहायचा.
डॉ. लागूंसारखा बलदंड अभिनेता या चित्रपटाने दिला. त्यांनी पूर्ण ताकदीनिशी आपले पात्र रंगविले. संध्याचे करियर उताराला लागले होते, ते पुन्हा या चित्रपटामुळे थोडेसे गतिमान झाले.
एक आदर्शवादी शिक्षक, जो त्याकाळात प्रौढ शिक्षणाचे वर्ग घ्यायचा, ज्याच्यामुळे गांव “आदर्श खेडे “म्हणून सन्मानित होते,प्रवाहपतित होतो. नर्तकीच्या कह्यात सापडत जातो आणि परिस्थितीचा प्रवाह मागचा रस्ता बंद करतो.
खेड्यातील राजकारण , एक खून , गांवोगांवी हिंडणारा नृत्यांगनेचा जथा सारं खिळवून टाकणारं ! सलग उताराला लागून अंतिमतः स्खलन झालेला शिक्षक केव्हातरी “मास्तर” बनून फरफटत जातो.
“तिला”ही आपली चूक कळते पण तोवर प्रवाहाची गती अनावर झाली असते. दोघेही आपापल्या पिंजऱ्यात कैद !
खेबूडकरांच्या शब्दांचे राम कदमांनी सोनं केलंय आणि उषा मंगेशकर लावणी गायनात प्रथम स्थानी पोहोचल्या त्या “पिंजरा” मुळे ! त्याकाळातील सर्व बॅंडवाल्यांना हमखास “पिंजरा” मधील गाणी वाजवायची फर्माईश व्हायची. लता दीदींनी लावणी हा गायनप्रकार (त्यातल्या त्यात बैठकीची लावणी) बहुधा पहिल्यांदाच ट्राय केला असावा.
लावण्यांमधील व्हरायटी त्यानंतर फक्त ” एक होता विदुषक ” मध्ये आनंद मोडकांनी बहाल केली.
स्खलनात स्थिरावलेला कलावंत निळूभाऊंनी बहरदारपणे उभा केला. ” पिंजरा” च्या पोस्टर वर स्थानही नसलेले, फार कमी स्क्रीन स्पेस असलेले हे पात्र- कधी पाणवठ्यावर लुगडी धुणारे, कधी नर्तकीच्या मागील झिलकरी आणि कधी हुडुत केल्यावर कुत्र्याच्या शेजारी पंगतीला बसून डॉ. ना हसत हसत गावकुसाबाहेरचे जीवन जगणं शिकवणारे निळूभाऊ फक्त आणि फक्त सलामाचे धनी होतात.
“प्रवाहपतित” च्या आधीची पायरी “स्खलनशीलता” आणि नंतरची ” अधःपतन ” !
लागूंच्या नंतरच्या पायरीवर असलेले निळूभाऊ नकळत त्यांचे वाटाडे होतात आणि बघताबघता एकेठिकाणी अभिनयात लागूंवरही मात करतात. अभिनयाची मराठीतील ही दोन घराणी – लागू मेथॉडिकल ऍक्टर ( त्यांचे शिष्य विक्रम गोखले आणि अमीर खान) तर निळूभाऊ उत्स्फूर्त कलावंत, त्यांत पुन्हा राष्ट्र सेवादल आणि वगनाट्याची पार्श्वभूमी ! “पिंजरा” ही दोघांची पहिली खडाखडी असली तरीही “सामना’, ” सिंहासन ” मध्ये त्यांच्यात डावे -उजवे करणे अवघड होते.
उच्चकोटीचा अभिनयानंद त्यांनी लुटला आणि आपल्यावर उधळला.
प्रत्येक भेटीत डॉक्टरांच्या डोळ्यांत अंजन घालणारे हे विदुषकी पात्र, पण त्यांचा आवाका स्तिमित करणारा आहे याची ओळख करून देणारं आहे. जागतिक रंगभूमीवर आणि पडद्यावर हा पहिला मराठी माणूस शोभून दिसेन.
इस्लामपूरला झालेल्या भेटीत मी त्यांच्या “पिंजरा” मधील भाष्यकाराची तारीफ केली तेव्हा नेहेमीचं सहज हसून त्यांनी बोलायचे टाळले होते. रंगरूप, चेहरेपट्टी काहीही हाती नसताना या कलावंताने सगळीकडे स्वतःची नोंद घ्यायला लावली. टिपिकल भूमिकांमध्ये त्यांच्यासाठीही साचे तयार केले गेले पण संधी साधून त्यांनी त्यातून सहज पळ काढला.
एकीकडे “दो आँखे ” मधून उच्च दर्जाचे प्रबोधन करणारे शांतारामबापू “पिंजरा” मध्ये तमाशाची गोडी लावून गेले. पांढऱ्या पडद्यावर “मास्टरी ” असणारा हा मराठी माणूस, ” पिंजरा “च्या हिंदीकरणात मात्र साफ फसला.
आजकाल शिक्षक अनेक मार्गांनी प्रवाह पतित होताना दिसतात. “पिंजरा” मध्ये – माणूस गेला तरी चालेल , पण त्याचे आदर्श टिकायला हवेत या ध्यासापायी लागू स्वतःला बळी देताना दिसले. ही रूढार्थाने प्रेमकथा किंवा सूडकथाही नव्हती. इथे ठळक दिसली नियती शरणता ,परिस्थितीच्या रेट्याने प्रवाहपतित झालेले आदर्श !
किमान शिक्षकांचे तरी असे व्हायला नको , नाहीतर समाजाने कोणाकडे आशेने पाहावे?
बापूंचा हा ५० वर्षांपूर्वीचा इशारा आज प्रकर्षाने ध्यानी येतोय.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply