काही वेळा विमा पॉलिसीचे हप्ते भरायचे राहून जातात किवा आर्थिक अडचणींमुळे ते भरता येत नाहीत. अशा वेळी पॉलिसी लॅप्स होते. लॅप्स झाल्यानंतरच्या कालावधीत विमाधारकास काही झाल्यास पॉलिसीचे फायदे मिळू शकत नाहीत. म्हणून पॉलिसी लॅप्स होऊ देऊ नये. अर्थात लॅप्स झाल्यानंतरही पॉलिसी पुन्हा सुरू करणे शक्य असते. मात्र, अशा वेळी विमा कंपनीचे काही निकष पूर्ण करावे लागतात.
विमा घेताना संबंधित विमा प्रतिनिधी आपल्याला न कळणार्या भाषेत बरेच काही समजावून सांगत असतो. एन्डोमेंट, कव्हर, रायडर्स, बोनस, रिटर्न्स अशा तांत्रिक शब्दांमध्ये आपल्याला विमा योजनांची माहिती देऊन त्यापैकी कोणती विमायोजना आपल्यासाठी सर्वात योग्य आहे हे परोपरीने पटवून देत असतो. विम्याची गरज आपल्याला आधीच पटलेली असते; परंतु विमा एजंटाच्या बोलण्याने आपल्या गोंधळात भर पडते. शेवटी आपण एखादी पॉलिसी घेऊन मोकळे होतो. बरेचदा ही पॉलिसी घेताना त्याच्या रिटर्न्सचा विचार होतो; परंतु हे हप्ते आपण भरू शकू की नाही याचा विचार होत नाही. काहीवेळा आपल्याकडे पैसे असतात म्हणूनही आपण पॉलिसी घेतो. त्यावेळीही त्या पॉलिसीचे पुढील हप्ते भरता येतील की नाही याचा विचार केला जात नाही. अशा कोणत्याही कारणामुळे पॉलिसीचे हप्ते थकू शकतात. यामुळे पॉलिसी लॅप्स होते. म्हणजे पुढील हप्ते न भरल्याने आपले विमा संरक्षण रद्द होते. असे होणे धोकादायक असते कारण ज्या कारणासाठी विमा उतरवलेला असतो तो हेतूच साध्य होत नाही. त्यासाठी पॉलिसी लॅप्स का झाली झाली याचा विचार करून ती पुन्हा सुरू करता येईल का हे पाहायला हवे. पॉलिसी लॅप्स होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. काही वेळा केवळ आळसामुळे प्रिमियम भरणे लांबते. काही वेळा विम्याचे महत्त्व लक्षात घेतले जात नाही. काही वेळा आर्थिक पेचप्रसंगांमुळे विम्याचे हप्ते भरणे अशक्य होते.
विम्याचे हप्ते नियमितपणे भरले गेल्यास पॉलिसी आणि विम्याचे संरक्षण कायम राहते. या कालावधीत आपल्याला काही झाल्यास पॉलिसीच्या प्रकारानुसार आपल्याला किवा लाभधारकाला या संरक्षणाचा फायदा मिळतो; परंतु काही कारणामुळे हप्ते भरण्यास थांबवल्यास विमा कंपनी आपले संरक्षण काढून घेते आणि अशा वेळी आपल्याला काही झाल्यास लाभधारकाला कोणतीही मदत मिळत नाही. अशा परिस्थितीत पॉलिसी लॅप्स झाल्याचे समजावे. पॉलिसी लॅप्स होण्यापूर्वी आपल्याला हप्ते भरण्यास पुरेसा कालावधी दिला जातो. हा कालावधी साधारणतः एक महिन्याचा असू शकतो. म्हणजे मुदत उलटून गेल्यानंतरही आपण हप्ता भरू शकतो. आपल्याला हप्ता भरण्यास विलंब झाल्यास विमा कंपनी आपल्याला रिमाईंडर नोटीस पाठवून हप्ता भरण्याची आठवण करून देते. आपण दर महिन्याला हप्ता भरत असू तर मुदत उलटून गेल्यानंतर १५ दिवसांच्या आत हप्ता भरता येतो आणि तिमाही, सहामाही किवा वार्षिक हप्ता असेल तर ३० दिवसांचा कालावधी असतो. या कालावधीतही हप्ता भरणे शक्य न झाल्यास पॉलिसी लॅप्स होते. पॉलिसी लॅप्स झाल्याची माहितीही विमा कंपनीकडून एका नोटिसीद्वारे विमाधारकाला कळवली जाते.
पॉलिसी लॅप्स झाल्यानंतरही ती पुन्हा सुरू करता येऊ शकते. टर्म, व्होल लाईफ, एन्डोमेंट अशा जवळ-जवळ सर्व पारंपरिक विमा योजना लॅप्स झाल्यानंतरही पुन्हा सुरू करता येतात; परंतु त्यासाठी विमा कंपन्यांनी घालून दिलेले निकष पूर्ण करायला हवेत. अशी लॅप्स झालेली पॉलिसी कधीही सुरू करता येऊ शकते; परंतु त्यासाठीचे निकष पॉलिसी लॅप्स होऊन किती वेळ झाला आहे यावर अवलंबून असतात. विमा कायद्यानुसार पॉलिसी सुरू होऊन तीन वर्षांनंतर लॅप्स झाली तर विमाधारकाला ती पुन्हा सुरू करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी मिळतो. एलआयसीसारख्या काही विमा कंपन्या खास योजनांद्वारे लॅप्स झाल्यानंतर पाच वर्षांपर्यंत पॉलिसी पुन्हा सुरू करण्यास अनुमती देतात. पॉलिसी लॅप्स झाल्यानंतर सहा महिन्यांमध्ये पुन्हा सुरू केल्यास नेहमीसारखा हप्ता भरून सुरू करता येते. अशा वेळी झालेल्या उशिराबद्दल थोडे व्याज भरावे लागते एवढेच. परंतु सहा महिने उलटून गेल्यानंतर पॉलिसी पुन्हा सुरू करायची असल्यास आपल्याला हप्त्याच्या रकमेबरोबरच दंड आणि व्याजही भरावे लागू शकते.
पॉलिसी पुन्हा सुरू करताना विमा कंपनी काही अटी घालू शकते किवा पुन्हा सुरू करण्याची आपली विनंती नाकारूही शकते. काही वेळा विमाधारकाला वैद्यकीय चाचणी करून घ्यावी लागते. पॉलिसी लॅप्स झाल्यानंतर विमाधारकाला एखादी व्याधी जडली असल्यास त्या व्याधीला संरक्षण मिळू नये म्हणून वैद्यकीय चाचणी केली जाते. पॉलिसी पुन्हा सुरू झाल्यानंतर आधीचे सर्व फायदे विमाधारकाला लागू होतात; परंतु पॉलिसी पुन्हा सुरू झाल्यानंतर वर्षभरातच विमाधारकाने आत्महत्या केल्यास कंपनी क्लेम नाकारू शकते. तसेच दोन वर्षांमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कंपनी क्लेम मान्य करण्यापूर्वी त्यासंदर्भात चौकशीही करू शकते.
पॉलिसी लॅप्स झाल्यानंतरही काही प्रसंगी विमाधारकाला क्लेम करता येतो. पॉलिसी घेतल्यानंतर पहिल्या तीन वर्षांमध्येच लॅप्स झाली असेल आणि त्या काळात विमाधारकाला काही झाले तर आपण केलेला क्लेम विमा कंपनी अमान्य करते. फार तर आपण भरलेले हप्ते लाभधारकाला परत मिळू शकतात. परंतु तेही कंपनीच्या इच्छेवर अवलंबून असते. तीन वर्षांनंतर पॉलिसी लॅप्स झाली आणि या कालावधीत विमाधारकाला काही झाले तर सध्याच्या विमाविषयक नियमांनुसार लाभधारकांना पॉलिसीचे फायदे मिळू शकतात; परंतु अशा वेळी विमा कंपनी संरक्षणाची पूर्ण रक्कम न देता एका समीकरणानुसार येणारी रक्कम लाभधारकाला देते. या समीकरणामध्ये भरलेल्या हप्त्यांची संख्या आणि राहिलेल्या हप्त्यांच्या संख्येचा विचार केला जातो. या सर्व गोष्टींची माहिती मिळूनही आर्थिक पेचप्रसंग उद्भवलयावर विम्याचे हप्ते भरणे शक्य होत नाही. अशा वेळी विमा कंपनी सोबतचा आपला करार आणि त्यातील अटींमध्ये बदल करता येतात. त्यानुसार आपल्याला मिळणार्या संरक्षणात कपात केली की हप्त्याच्या रकमेतही आपोआप कपात होते. असे केल्यास पॉलिसी लॅप्स न होता आपले संरक्षण अबाधित राहते. आपल्यावर काही कुटुंबिय अवलंबून असल्यास जीवन विमा आर्थिक तरतुदींसाठी अत्यावश्यक ठरतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पॉलिसी लॅप्स होऊ देऊ नये अन्यथा आपल्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना आर्थिक ताण-तणावांना सामोरे जावे लागू शकते.
— महेश धर्माधिकारी
सर, माझी स्टार हेल्थ optima policy होती.25 जानेवारी 2023 पैसे भरण्याची लास्ट तारीख होती. मी वेळेत ऑनलाईन पैसे भरले नाहीत. कंपनीने मला 26 तारखेला पॉलिसी laps झाली म्हणून सांगितलं. माझे दोन वर्षाचे benefit मिळणार नाहीत असे सांगितलं. कृपया ती मा झी पॉलिसी सुरू होण्यासाठी मदत करावी ही विनंती.