कचरा आणि खरकटे आपल्या घराबाहेर फेकले की आपले घर स्वच्छ होते असा, बऱ्याच नागरिकांचा (गैर) समज झालेला आहे. त्यामुळे होते काय की, उंदीर, घुशी, कावळे, कुत्रे, मांजरी वगैरेंना तो आयताच मिळतो आणि त्यांची प्रजा वाढते. त्रस्त होतात… नागरिक. रोगराईला सामोरे जातात…नागरिक.
या समस्येवर उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने उंदीर मारणारे कर्मचारी नेमले. काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात बातमी आली की, एका प्राणीप्रेमी संस्थेने असे सुचविले की उंदरांना मारू नका फक्त पिंजऱ्यात पकडा. उंदरांना पिंजऱ्यात पकडून पुढे त्यांचे काय करा याविषयी मात्र, या संस्थेने मौन पाळले आहे.
वातानुकुलीत कार्यालयात बसून या संस्थांचे कार्यकर्ते, अशासारखे फतवे नेहमीच काढीत असतात. हे लोक न्यायालयात जावून कुत्र्यांना पकडू नका, त्यांना विष देवू नका, अशा तऱ्हेचे आदेश मिळवितात. या संस्था कुत्र्याचे पांजरपोळ का चालवीत नाहीत? या संस्था, उंदरांना पिंजऱ्यात पकडून, त्यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्याची यंत्रणा का राबवीत नाही? भटक्या प्राण्यांची आणि उंदरांची देखभाल करण्याची जबाबदारी या संस्थांनीच स्वीकारावी. दुसऱ्यांना उपदेश करण्याची आणि उठसूठ न्यायालयात जाण्याची सवय सोडावी. आपले प्राणीप्रेम खरे आहे हे सिद्ध करून दाखवावे.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply