साधारण तीन एक वर्षांपूर्वी नानांच्या देहदाना च्या संकल्पात कुणी मदत करेल का? असं विचारणारी एक पोस्ट टाकली तेंव्हा Subhash Bakle या मित्राने त्यांचे मोठे बंधू प्रभाकरराव बाकळे हे नावं सुचवलं. आणि हा अवलिया माझ्या आयुष्यात प्रवेशकर्ता झाला. त्यांनी हवी ती मदत केली म्हणूनच नानांचा देहदाना चा संकल्प मी पूर्ण करू शकलो. हा माणूस देहदानाच्या कार्यात स्वतःला एक छोटा कार्यकर्ता समजून काम करत असे, हे मला नंतर समजले. नाना नंतर मी ही याच कार्यात सहभागी झालो.
धिप्पाड, गोरापान, वैराग्या सारखी शुभ्र दाढी, भला मोठा चष्मा, त्यातून दिसणारे भेदक डोळे, थेट आणि रोखून पाहत बोलणं असा हा अवलिया आपल्या E Maha Seva सेंटर वर key chair वर बसलेला असे. एका ठिकाणी बसून चौफेर करडी नजर ठेवून असे. भारतातल्या रेल्वेस्टेशन किंवा बसस्टँड वरच्या “चौकशी” खिडकीत बसलेल्या व्यक्तीला जसं, तुसडेपणाचं किंवा वस्कन बोलण्याचं ट्रेनिंग देऊन ट्रेंड केलेलं असतं तसं ट्रेनींग घेऊन आल्या सारखा हा अवलिया नवख्या माणसाला मग तो कितीही व्यवस्थित आणि भारीचे कपडे घातलेला असला तरी ट्रीट करत असे. त्या मुळे नवीन माणूस यांना बोलायचं शकतो टाळून तिथे काम करणाऱ्या मुलांकडेच चौकशी किंवा कामं करून घेत असत….. त्यात मी देखील एक होतो. मी देखील त्यांना वचकून असे. कामापूरत त्या सेंटर वर जायचं, काम आटोपून शक्य तितक्या लवकर निघायचं. सेंटर वर कामासाठी येणाऱ्या मुली किंवा स्त्रियांशी मात्र अत्यंत आदबीने बोलायचे. बाहेरून शिकायला येणाऱ्या मुलींना तर आधार वाटावा, इतपत सामंजस्याने बोलायचे.
नाना प्रकरणा नंतर मात्र हा अवलिया माझा चांगला मित्र झाला. अर्थात वयाने मोठे असल्यामुळे मी त्यांना आहोजाहो ओघाने बोलायचो. तर ते माझे मोठे मित्र झाले म्हणू हवं तर. ते मित्र झाल्यावरच मला समजलं की त्यांना विनोद कळतात आणि ते करतात देखील.
तर हा अवलिया, मध्यंतरी खूप आजारी असल्याचे समजलं म्हणून भेटायला गेलो तर हे आदले दिवशी हॉस्पिटल मधून अक्षरशः पळून आलेले. तब्बेत सिरीयस असतांना का निघून आलात? असं विचारलं तर म्हणे मला काहीही झालेलं नाही, हे डॉक्टर लोकं विनाकारण भीती दाखवतात. आणि ऍडमिट करतात. आता मला तर ऍडमिट करून घेतलं पण पुढच्या इलाजा साठी जबरदस्ती पुण्याला पाठवत आहेत म्हणू मी पळून आलो…
हतबल मुलगा आदित्य नाईलाजाने त्या हॉस्पिटल च bill paid करून आणि पळून येतांना या अवलीयाने तिथे सोडलेले चप्पल घेऊन आला. मी त्यांच्या कडून निघतांना मला म्हणाले, ” डावरे, एक गोष्ट सांगू का? मला न हाता पायात सलाईन, तोंडात नळ्या, नाकाला ऑक्सिजन असं मरायचंच नाहीयेय! मरायचंच तर चांगलं चालतं बोलतं असतांना अचानक मरून जायचं!” “असं धडधाकट मेलो तरच माझा देह मेडिकल च्या विदयार्थ्यांच्या कामी येईल न?” “आता मी हॉस्पिटलमध्ये कधीच जाणार नाही, गेलो तर थेट मेडिकल कॉलेजलाच. माझं देहदान झाल्यावरच” मी कोरडं हासून त्यांची परवानगी घेऊन निघालो.
काही दिवसांपूर्वी हा अवलिया, याने ज्या पद्धतीने ठरवलं होतं अगदी त्याच पद्धतीने “गेला”. त्यांचा देह त्यांचा मुलगा आदित्यने नांदेडच्या मेडिकल कॉलेजला “दान” केला. भेटायला घरी गेलो तेंव्हा त्यांच्या पश्चात घरातलं वातावरण “सुतकी” नव्हतं तर कारुण्य पण प्रसन्न होतं. यातच सगळं आलं.
तळ टीप :- त्यांचा उल्लेख “अवलिया” म्हणून करण्याचं अजून एक कारण म्हणजे या सदगृहस्थाचं FB ac सुद्धा Thanthanpal Parbhanikar या नावाने आहे. दुसरं म्हणजे, पोस्ट मधे केलेलं वर्णन आणि असलेला फोटो यात तफावत जाणवली असेल. तर या माणसाचा मृत्यू ज्या रात्री झाला त्या सकाळी त्यांनी घरी हजाम बोलावून गेल्या कित्येक वर्ष राखलेली दाढी, क्लीन शेव्ह करून घेतली. त्यांना समजलं असेल का हो? की आज रात्री आपल्याला “जायचं” आहे !!!
देहदानाचं त्यांनी सुरू केलेलं कार्य आदित्य पुढे चालू ठेवायचं म्हणतोय, म्हणजे नक्कीच त्यांना “मुक्ती” मिळालीय.
धन्यवाद विजू भाऊ…
— विनोद डावरे, परभणी.
9765 998 999
Leave a Reply