प्रभाकर पणशीकर उर्फ पंत यांचे नाव उच्चारताच डोळयांसमोर अनेक व्यक्तिरेखा उभ्या राहतात. त्यांचा जन्म १४ मार्च १९३१ रोजी झाला. लखोबा लोखंडे, औरंगजेब, प्रो. विद्यानंद अशा कितीतरी भूमिका पंतांनी आपल्या अभिनय सामर्थ्याने अजरामर करून ठेवल्या आहेत. प्रल्हाद केशव अत्रेलिखित ‘तो मी नव्हेच’ ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे मा.प्रभाकर पणशीकर हे महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. ‘इथे ओशाळला मृत्यू’ ह्या संभाजीराजांच्या मृत्यूवरील आधारित नाटकातील औरंगजेबाची भूमिकादेखील पंतानी अजरामर केली. जवळजवळ ५० वर्षे मा.प्रभाकर पणशीकर यांनी रंगभूमीची इमाने-इतबारे सेवा केली. घरच्यांचा विरोध पत्करूनही पंत या क्षेत्रात उतरले होते. ‘हा तोंडाला रंग फासून घरच्यांच्या तोंडाला काळं फासतो’, असा घरच्यांनी आरोप करूनही पंतांचे चित्त विचलीत झाले नाही. सुरुवातीला मो. ग. रांगणेकर यांच्या ‘नाटयनिकेतन’ संस्थेत पंत पडेल ते काम करत राहिले. एखाद्या कलाकाराच्या गैरहजेरीत पंतांना त्या कलाकाराची भूमिका करणे भाग पडायचे. पण ह्या भूमिका अगदीच नगण्य होत्या आणि त्यामुळे त्या भूमिका करणारे प्रभाकर पणशीकर लोकांच्या लक्षात राहणे शक्यच नव्हते. तरीही पोटापाण्याकरता पंत पडेल ते काम करत राहिले. ‘राणीचा बाग’, ‘कुलवधू’ यांसारख्या नाटकांतून भूमिका केल्यावर मात्र पणशीकर नाटयनिकेतन मध्ये चांगलेच स्थिरावले. ‘तो मी नव्हेच’ हे आचार्य अत्रे लिखित नाटक जेव्हा नाटयनिकेतन संस्थेतर्फे करायचे ठरले. तेव्हा नाटकातील प्रमुख भूमिका करणारा नट हा संस्थेतला असावा म्हणजे तो आपल्या आवाक्यात राहील, अशा धोरणी भूमिकेतून पणशीकरांनीच ही भूमिका करावी असा रांगणेकरांनी हट्ट धरला. आचार्य अत्रेंना सुरुवातीला हा निर्णय मान्य नव्हता. पण रांगणेकरांच्या हट्टापुढे अत्रेंचे काही चालले नाही आणि ती भूमिका पणशीकरांना मिळाली. नंतर मात्र ‘तो मी नव्हेच’ मधला खलनायकी लखोबा लोखंडे पणशीकरांनी असा काही रंगवला की, लखोबा लोखंडे आणि पणशीकर यांचे घट्ट नातेच बनले. प्रभाकर पणशीकरांशिवाय ‘तो मी नव्हेच’ या नाटकाचा विचार करणे त्या काळीही कोणाला शक्य झाले नाही. ‘तो मी नव्हेच’चा फिरता रंगमंच ही पंतांची कल्पना. भूतकाळातील कोणतीही घटना ते इतक्या तपशिलवार सांगत की जणू त्या घटना कालपरवाच घडल्या असाव्यात. बरोबरीच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जाणारे अशी पंतांची ख्याती होती. नाटकांच्या निमित्ताने त्यांनी अख्खा महाराष्ट्र पालथा घातला होता. वसंत कानेटकरांचं ‘इथे ओशाळला मृत्यू’ हे नाटक त्यांनी संभाजीला न्याय मिळावा याकरता लिहिलं. पण प्रत्यक्षात जेव्हा ते रंगभूमीवर उभं राहिलं तेव्हा मात्र नाटकाचा पूर्ण प्रकाशझोत औरंगजेबाच्या भूमिकेतील पंतांवर स्थिरावला. संभाजीपेक्षाही त्या नाटकात औरंगजेब प्रभावी ठरू लागला. याविषयी त्यांना विचारताच ते म्हणत की, औरंगजेबाची भूमिका करताना त्या भूमिकेचा प्रत्येक पैलू समजून घेऊन तो लोकांसमोर यावा याकरता मी प्रयत्न केला होता. ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील प्रो. विद्यानंद मा.पणशीकरांनी खूपच सुंदर साकार केला होता. ज्या काळी नाटकांचे दौरे करणं आजच्याइतकी सुखाची बाब नव्हती तेव्हापासून आत्तापर्यंत पंतांनी ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचे तब्बल ११११ प्रयोग केले आहेत. प्रा. विद्यानंद याची मानसिक द्विधावस्था खूप चांगल्या प्रकारे सादर केली होती. तसेच ‘कटयार काळजात घुसली’च्या निमित्ताने संगीत नाटकाचं पुनरुज्जीवन हेही पंतांचं रंगभूमीला दिलेलं कॉन्ट्रीब्युशन.
‘तो मी नव्हेच’च्या अभूतपूर्व यशानंतर पणशीकरांनी मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर यांच्या साथीने ‘नाटयसंपदा’ ही नाटय संस्था स्थापन केली. ‘अश्रूंची झाली फुले’, ‘कटयार काळजात घुसली’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘थँक्यू मि. ग्लाड’, ‘मला काही सांगायचंय’ यांसारखी नाटकं त्यांनी नाटयसंपदा या आपल्या संस्थेद्वारे रंगभूमीवर आणली. ‘कट्यार काळजात घुसली’ हे संगीत नाटक नाट्यरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी आपली अभिनय प्रतिभा दाखवली. चार मराठी चित्रपट, चार मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका केल्या आणि रेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचने केली. त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे राज्य रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. मा.प्रभाकर पणशीकर यांचे १३ जानेवारी २०११ रोजी निधन झाले.
प्रभाकर पणशीकर यांची नाटके
मोहिनी, मदनाची मंजिरी, अमृत झाले जहराचे, सुवर्णतुला, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू. कट्यार काळजात घुसली, इथे ओशाळला मृत्यू, मला काही सांगायचंय, वीज म्हणाली धरतीला, संत तुकाराम, तो मी नव्हेच, विकत घेतला न्याय, महारामी पद्मिनी, लागी करेजवा कटार (हिंदी), होनाजी बाळा, बेईमान, प्रश्नक नाजूक आहे, तो राजहंस एक, त्या कातरवेळी, तीन लाखांची गोष्ट, थॅंक यू मि. ग्लाड, तुझी वाट वेगळी, राजसन्यास, भटाला दिली ओसरी, पुत्रकामेष्टी, मी मालक या देहाचा, निष्पाप, अवनु नानल्ला (कानडी-तो मी नव्हेच), जिथे गवतास भाले फुटतात, किमयागार, घर अण्णा देशपांडेंचं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट
Leave a Reply