संपदा जोगळेकर–कुलकर्णी अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका … तिची प्रतिभा छायाचित्रांतूनही जाणवते…
अभिनय, निवेदक, सूत्रसंचालिका, आयोजक, साहित्यिक, कथ्थक नृत्यांगणा, गायिका, दिग्दर्शिका, कार्यक्रमांसाठीच संशोधनपर लिखाण करणारी लेखिका अशा नानाविध रूपांतून सहज वावरणारी आणि प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारी हरहुन्नरी कलावती म्हणजे संपदा जोगळेकर-कुलकुर्णी. ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकाच्या पहिल्या संचात अंकुश चौधरी, संजय नार्केकर आणि भरत जाधक या कलावंतांसोबत संपदाने आपला विशेष ठसा उमटवला. ठाणे गौरव पुरस्कार, कलांगण पुरस्कार, अक्षरधारा पुरस्कार, अल्फा गौरव पुरस्कार अशा बड्या पुरस्कारांनी गौरवलेली संपदा जोगळेकर-कुलकुर्णी हे एक वेगळं गुणी व्यक्तिमत्त्व.
२००८ साली संपदा लिखित ‘गुंथी’ या लघु कादंबरीच्या बातमीच्या निमित्ताने मी आणि संपदा भेटलो होतो. यानंतर विविध वृत्तपत्रांसाठीच्या लेखांकनासाठी आमची भेट होत होती. यानंतर नाटकांच्या निमित्ताने, अनेक संस्थांच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आमची भेट होत होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात संपदाची वेगळी छाप असायची. या गाठीभेटी दरम्यान संपदातले विविध कलागुण समोर येत होते. संपदाने सौंदर्यशास्त्रातलं पदव्युत्तर शिक्षण मुंबई विद्यापीठातून घेऊन पुढे पुणे विद्यापीठातून पी.एचडी.चा तिचा अभ्यास सुरु आहे. कला सरगम या संस्थेच्या बालनाट्यातून तिने अभिनयाचा श्रीगणेशा केला. मग एकांकिका, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा यात तिने यशाची मोहोर उमटवली. कथ्थक गुरु डॉ. राजकुमार केतकर यांच्याकडे १८ वर्षे तर पुढे दोन वर्षे डॉ. मंजिरी देव यांच्याकडे तिने कथ्थकचे धडे गिरवले.
‘आईचं घर उन्हाचं’ या पहिल्या व्यावसायिक नाटकातून अभिनयाची सुरुवात केलेल्या संपदाने ‘घर तिघांचं हवं’, ‘ऑल दि बेस्ट’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘तुंबाडचे खोत’ अशा अनेक नाटकांतून अभिनय सादर करत आपल्या अभिनयानं रसिकमन जिंकलं. तर ‘प्रेम भेट’, ‘पाऊलखुणा’, ‘दामिनी’ अशा पंधराहून अधिक मालिकांतून ती घराघरात पोहोचली. ‘उदय’, ‘शर्यत’ अशा सिनेमांतून तिने रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. अभिनयाचं हे वेगळं क्षेत्र चोखाळत असतानाच ‘काचपाणी’ (कथासंग्रह), ‘बकुळ फुले’ (वैचारिक लेखसंग्रह), ‘गुंथी’ (लघु कादंबरी) यासाठीच तिने लिखाण केलं. अनेक कार्यक्रमांसाठी, मैफिलींसाठी सूत्रसंचालक, निवेदिका तसेच कार्यक्रमांसाठीच संशोधनपर लिखाणदेखील तिने एकीकडे सुरू ठेकलं होतं. गेल्या काही वर्षांत नाटकांत अभिनयासोबतच लिखाण आणि दिग्दर्शिकेच्या भूमिकेतूनही संपदाचा चेहरा पुढे आला.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या संपदाचं शूट अनेकदा करण्याची संधी मला मिळाली. संपदा नेहमीच फोटोतून समोर आली ती पारंपरिक वेशभूषेतून. मराठमोळ्या वेशभूषेतली, पारंपरिक पेहरावातली संपदा मी अनेकदा कॅमेराबद्ध केली होती. मात्र वैचारिक संपदाचं तिला शोभेल असं कॉर्पेरेट लूकमधलं शूट करण्याचं आम्ही ठरवलं. हा लूक तिच्यासाठी-फोटोच्या दृष्टीने नवा होता. हेच हेरून सुरुवातीला काही पारंपरिक वेशभूषेत तिचे फोटो टिपले. पंजाबी ड्रेसमध्ये संपदाचा हसरा, सोज्वळ चेहरा मी कॅमेराबद्ध केला. हे शूट आउटडोअर करण्यात आलं. यावेळी नैसर्गिक प्रकाशाचा उपयोग शूटसाठी झाल्याने हे फोटो अधिक खुलले. यानंतर संपदाचे काही फोटो तिला मिळालेल्या पुरस्कारांसोबत आम्ही टिपले. यावेळी ‘ऑल दी बेस्ट’ची ट्रॉफी हातात घेऊन करण्यात आलेल्या शूटच्यावेळी संपदाचा चेहरा अधिक हसरा वाटत होता. जणू त्यावेळच्या आठवणी एकदम दाटून आल्या असाव्यात. तेव्हाच्या तिच्या भूमिकेबद्दल आणि एकूणच नाटकाबद्दलच्या गमती जमती संपदा सांगत होती. यानंतर सिंगल लाईट सिस्टममध्ये संपदाचे इनडोअर शूट आम्ही केलं. या लाइट सिस्टममुळे प्रकाशावर नियंत्रण मिळवणं, विशिष्ट ठिकाणी प्रकाशझोत टाकणं, त्याची तीव्रता कमी जास्त करणं हे यामुळे शक्य झालं होतं.
साधारणपणे दोन-अडीच तासांच्या शूटनंतर आम्ही कोर्पेरेट शूटकडे वळलो. लाल रंगाचा टीशर्ट त्यावर परिधान केलेला राखाडी रंगाचा ब्लेझर आणि ट्राऊझरमध्ये संपदाचा कॉर्पेरेट लूक अधिक खुलून दिसत होता. यात वैचारिक संपदा दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. एरवी हसऱ्या चेहऱ्याशी, सहज संवाद साधणारी संपदा मला गंभीर चेहऱ्याची, वैचारिक हवी होती. हा लूक संपदाला सांगितल्यानंतर तिने तसे हावभाव केलेही. मात्र यावेळी तिचं स्मितहास्य काही केल्या संपदाला लपवता आले नाही. संपदा जशी आहे तसेच तिचे हावभाव तिच्या चेहऱ्यावर आणि अर्थातच फोटोत येत होते. या पेहरावात तीच पहिल्यांदाच शूट झालं होत. सुरूवातीला या लूकमध्ये थोडीशी अस्वस्थ असलेली संपदानंतर सहज वावरत होती… आणि त्यामुळेच मला तिचे वेगळे फोटो टिपणं शक्य झालं.
अनेक वर्षांच्या ओळखीतून मला संपदातले विविध अंगभूत गुण अनुभवता आले. संपदा विविध क्षेत्रामध्ये सहज जरी वावरत असली तरीही तिचा मूळ स्वभाव अभ्यासू आहे. कोणत्या क्षेत्रात किती रमायचं, कधी एखादा विषय सुरू करायचा आणि कधी तो संपवायचा याचा अभ्यास तिने चांगलाच केलेला असतो. सध्या नाटकांत रमलेली संपदा येत्या काही काळात विविध क्षेत्रातही तितकीच सहज वावरताना दिसेल, हे नक्की.
धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
Leave a Reply