भिंत ओलेती मनाची
तुझ्या आठवणी झिरपलेल्या,
धुळीत थेंब टपोरे , देती आठव
ओल्या बटा तुझ्या झटकलेल्या,
तुझ्या हास्याची जाळी काढी
नक्षी त्या छताला,
प्रतिबिंब तुझे झळकते
जेव्हा पाहतो स्वतःला,
किती भकास उदास
तुझ्याविना घर मनाचे गं
जन्म देण्यास आतूर
जडावलेले गर्भ घनाचे गं,
झाली जीर्ण वास्तू मनाची
तुझे येणे होत नाही,
अवकळा येते त्या घरास
जिथे स्त्रीचे पाऊल फिरत नाही,
किती किती वाटते तुला लेखणीत बांधावेसे
पुन्हा नव्याने तुला जुने काही सांगावेसे
कित्तीदा भास झाला तू येऊन गेल्याचा
मनाचा उघडा दरवाजा पुरावा होता तू गेल्याचा,
आत्मा कधीचा पाण्यात ठेऊन बसलेला ,
उंबरठ्यावर एक तांब्या उपडा हीं घातलेला
कधी वळत नाहीत तुझी पावले इथवर
प्रतिक्षा हीं किती काळाची न कुठंवर
वास्तू कोसळण्याआधी जमेल का ग तुला येणे
बांधू नव्याने घर , रचू पुन्हा नवे गाणे
साद देतो हि अंतिम अन प्रतिक्षाहीं थकलेली,
अक्षरे बोलावती तूज , विरहात माखलेली..
— अँडव्होकेट ऐश्वर्या वैजापूरकर
(नावासहित share करावी)