काल रात्रीच भूपेंद्र सिंग यांच्या जाण्याची बातमी वाचली. इतकं आगंतुक आणि न सांगता -सवरता जाणं वाटलं की खूप वेळ मी अस्वस्थ होतो. नुक्तीच त्यांच्या आणि सुवर्णा माटेगावकरांच्या “बिती ना बिताई ” वर मी पोस्ट लिहिली होती.
हा तसा हमरस्त्यावरचा हमखास गायक नव्हता. गझल आणि गुलज़ार यांच्या दर्जेदार गल्लीबोळातून हिंडणारा देखणा,रुबाबदार आणि “रुहानी “आवाज असलेला हा गृहस्थ! फारशा मैफिली/लाईव्ह शोज न करणारा, स्वतःमध्ये खोलवर रमलेला, सतत न दिसणारा हा गायक !
खूप वर्षांपूर्वी त्याचा एक शो पुण्यात होता एवढेच आता आठवते आणि परगावी असल्याने माझा तो शो हुकला हेही ! नंतर नाहीच.
२००९ साली रायपूरला आमच्या कॉलनीत (अशोकरत्न) एक ऑर्क्रेस्ट्रा होता आणि सायंकाळी सरावासाठी वाद्य तापविणे सुरु होते. मी गॅलरीत गेलो कारण तेव्हा “होंठोपे ऐसी बात ” ची सुरावट वाजत होती.
गीत सुरु होण्यापूर्वी प्रदीर्घ वाद्यमेळातून वातावरणनिर्मिती करणारी माझी दोन आवडती गाणी म्हणजे “होंठोपे ऐसी बात” आणि “जाने कहाँ गए वो दिन “!
शेजारी उभे असलेले काळेले सर म्हणाले-
” तुम्हांला माहीत आहे- यांत भूपेंद्रची तान आहे ते?”
मी चमकलोच. या सद्गृहस्थाला मी गुलज़ारमुळे १९७० नंतर ओळखत होतो, पण “ज्वेल थीफ “सारख्या तुलनेने पुरातन चित्रपटाच्याही वेळी भूपेंद्रचा स्वर होता?
माझ्या आश्चर्याला उत्तर म्हणून काळेले सरांनी मला नवा धक्का दिला- ” अहो, हकीकत या १९६४ च्या युद्धपटातही त्याचा आवाज होता.”
५० हून अधिक वर्षे जिवंत असलेला हा आवाज काल निमाला.
आज पेपरमध्ये कळले -त्यांचे वय ८२ होते आणि जाण्यापूर्वी कॅन्सर+ कोरोना या घातक कॉम्बोमुळे ते दवाखान्यात उपचार घेत होते. म्हणजे हे जाणं आगंतुक नव्हतं.
गुलज़ार नामक माणसाने जे एक सुश्राव्य संघटन बांधले होते,त्या पंगतीमधील आणखी एकजण आपले अन्नोदक संपवून गेला. आर्डी /लता/ मुकेश/किशोर सारे आधीच गेलेत. आता गुलज़ारच्या रचनांना कोण सुरबद्ध करणार आणि कोण गाणार? कधीचाच स्थितप्रज्ञ झालेला गुलज़ार आता म्हणेल-
” कारवाँ गुजर गया, गुबार देखते रहे!”
पण प्रत्येक “जाण्या “बरोबर आपले एकेक कप्पे रिते होत जातात, त्याचे काय?
स्थितप्रज्ञ अवस्थेचेही टवके उडू शकतात.
“दिल ढुंढता हैं ” अशी भग्न शोधाशोध सुरु होते तळघरात!
गदिमा गेल्यावर आमच्या वालचंदच्या मॅगझिनमध्ये #प्रा.विजयदिवाण सरांनी त्यांच्यावर श्रद्धांजलीपर लेख लिहिला होता- ” कोन्यात झोपली सतार ” या शीर्षकाचा!
त्यावेळी त्यांनी लिहिले होते- “हा जोगिया म्हणजे उठून गेलेल्या मैफिलीचे विषण्ण करणारे चित्रीकरण आहे.”
गुलज़ार महोदयांची मैफिल काल अशीच विषण्ण झाली.
आम्ही मात्र सईद राहीजी यांच्या शब्दांमधून भूपेंद्रने दिलेल्या आश्वासनावर विसंबून आहोत-
“शम्मा जलाये रखना हये जब तक की मैं न आऊ
खुद को बचाये रखना हये जब तक की मैं न आऊ
ज़िंदा दिलो से दुनिया, ज़िंदा सदा रही हैं
महफ़िल सजाये रखना, जब तक की मैं न आऊ
ये वक़्त इन्तिहाँ है सब्र ओ करार दिल का
आंसू छुपाये रखना हये जब तक की मैं न आऊ
हम तुम मिलेंगे ऐसे जैसे जुदा नहीं थे
सांसे बचाये रखना हये जब तक की मैं न आऊ!”
आजकाल प्रत्येक “जाणं ” (माझ्यासाठी) सारखंच असते भूपेंद्रजी !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply