आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग दोन
ज्यांना रात्रीचं काम करण्याची मजबुरी असेल त्यांनी काय करावं ? रात्रीच्या जागरणाच्या निम्मे वेऴ जेवणापूर्वी दिवसा झोपावे. आपलं जेवढं काम असतं, जसं काम असतं, त्यामानाने पुरेशी झोप घेतलीच पाहिजे.
शांत झोपेमधे शरीरातील सर्व अवयवांना विश्रांती मिळत असते. अधिक जोमाने काम करण्यासाठी ही विश्रांती उपयोगी होते. दिवसभर काम करून जी उर्जा संपून जाते, ती मिळवण्यासाठी रात्र उपयोगी होते.
नाईट शिफ्टमधे काम करत असलेल्या कामगारांना कोणत्याही रोगाची लागण लवकर होते. परिणामी त्यांना अनेक रोगांना सामोरे जावे लागते. विशेषतः चालक, वाॅचमन या वर्गामधे पचन हमखास बिघडलेले असते. पचन बिघडले की, वात वाढतो, पित्त वाढते, तयार झालेल्या अन्नरसाचे शोषण आणि पुढे शरीराचे पोषण होत नाही, पोट सुटत जाते, दिवसा जास्ती झोप घेतल्याने सूर्याच्या शक्तीचा योग्य वापर शरीराला करून घेता येत नाही, घाम कमी येतो, आमनिर्मिती जास्त होते, चरबी वाढते, प्रतिकारशक्ती कमी होते. रोग होतात. अशा रात्रपाळी मंडळींनी आपल्या जेवणामधे थोड्याश्या पाचक, गरम स्वभावाच्या पदार्थांचा वापर करायला हवा. जसे काळी मिरी, जिरे, आले, लसूण, सुंठ, धने. रात्रीच्या वेळी काम करताना वारंवार घेतला जाणारा चहा कमी करून त्याऐवजी सुंठ, मिरी, तुळस, खडीसाखर किंवा गुळ, धने, वापरून केलेला कषाय दुधाशिवाय घ्यावा. रात्रीचे काम आणि रात्रीचे जेवण यामधे देखील तीन तासाचे अंतर असावे. म्हणजेच सायंकाळी सहा सातच्या आत जेवून नंतर आठ नऊ वाजता कामासाठी जावे. मधे खूप भुक लागली तरच खावे, त्यामधील खाणे हे सुद्धा राजगिरा लाडू, चिक्की, फुलवलेले पोहे, लाह्या, पाॅपकाॅर्न असेच हलकेफुलके असावे. फळे, दूध, ज्युस असे पचायला जड होईल असा आहार रात्री नको.
रात्रपाळी कामगारांमधे वात जास्ती प्रमाणात वाढत असतो. म्हणून या कामगारांनी झोपण्यापूर्वी कानात, तळपायाला, डोळ्यांना, डोक्यावर आणि बेंबीमधे थोडे तेल लावावेच. कोकणात तेल म्हणजे खोबरेल, घाटमाथ्यावर शेंगतेल, बाकी सर्व प्रदेशात तिथे उपलब्ध होणारे स्थानिक तेलबीयांचे तेल. नाहीतर सदाबहार तीळतेल.
पहाटे जेव्हा कामावरून परत येणे होईल तेव्हा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या नेहेमीच्या कामापेक्षा वेगळा व्यायाम करावा. जर रात्रौ कष्टाचे काम झालेले असेल तर सकाळी व्यायाम देखील हलका फुलका करावा, जसे प्राणायाम, नमन मुद्रा, ओंकार, कपालभाती, काही योगासने आणि सूर्यनमस्कार !
आणि ज्यांचे रात्रीचे काम केवळ लिखापटीचे किंवा कंप्युटर वर फक्त टाकटुक करायचे असेल त्यांनी मात्र या व्यायामाबरोबरच घाम आणणारे एरोबिक्स, दंड, जोर, बैठका, दोरीच्या उड्या, असे वेगवान व्यायाम करावेत. ज्यामुळे श्वासाची गती वाढेल आणि संपूर्ण शरीरातील रक्तसंचार गतीमान होईल.
स्नान करावे, नाश्त्याला पोटभर काहीतरी असावे. आहारामधे दही घेतले तरी चालते. ( पण आवडत असेल तरच आणि पचत असेल तरच नाहीतर नियम म्हणून नको ! ) त्यातील वात वाढवणारे पाणी काढून टाकावे, आणि चांगले फेसून थोडी साखर घालून सात आठ चमचे दही जेवताना खायला काहीच हरकत नाही.
आणि सूर्याच्या प्रकाशात हवेशीर जागी झोपावे. थोडक्यात एसी नकोच. सूर्याचे थेट किरण अंगावर पडले की उर्जा तयार होते. कोई मिल गया मधला “जादू” आठवतोय ना, तस्से !
मध्यंतर हवे असल्यास मधेच उठून पुनः छोटी हलकी कामे, व्यवहारातील आवश्यक कामे करून, पुनः थोडी झोप घेऊन सायंकाळी सहा वाजता उठून पूर्ण जेवण घेऊनच कामासाठी निघावे.
सूर्य असणे आणि सूर्य नसणे या दोन गोष्टी खूप काही बदल शरीरात आणि मनात घडवून जातात.
एक सूत्र नक्कीच लक्षात ठेवावे, ते म्हणजे झोपायचे कसे आणि केव्हा ! जेवणानंतर लगेच झोप घेतल्याने चरबी वाढते, जाडी वाढते, कफाचे आजार, मधुमेह वाढतात, हे आपण यापूर्वी पाहिले आहेच. म्हणून एक युक्ती करावी. जेवणानंतर झोपण्याऐवजी जेवणापूर्वी झोप पूर्ण करावी आणि नंतर उठून जेवून पुनः कामाला लागावे.
ही युक्ती, आरोग्य नियमातील ही पळवाट फक्त रात्रपाळी करणाऱ्या मजबूर प्राण्यांसाठीच. इतरांना किंवा त्याच्या नातेवाईकांना नाही. !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
17.05.2017
Leave a Reply