आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 4
कशासाठी हे अन्न मी सेवणार , हा संकल्प “आत” कळतो आणि तशी तयारी सुरू होते.
देवपूजेमध्ये सोळा उपचार केले जातात.
आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान-अभिषेक, वस्त्र-अलंकार, उपवस्त्र-यज्ञोपवित, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार आणि मंत्रपुष्प.
सोळा उपचार कोणते ते माहिती असावेत म्हणून ही पूरक माहिती दिली.
या उपचारांचा मुख्य उद्देश देवाची आपल्यावर कृपा व्हावी असा आहे. असा भाव, अशी श्रद्धा मनात ठेवावी.
मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव,
देव अशानी पावायचा नाऽही रं
देव बाजारचा भाजीपाला न्हाई रं !
देवाला आमंत्रण देऊन बोलवावे. आपण एखाद्या पाहुण्यांना कसे एखाद्या कार्यक्रमाला बोलावतो, तसे बोलवावे. उगाच का कोणी कारणाशिवाय येतो ?
कारण सांगितल्या शिवाय, न सांगता येतो, त्याला आपल्याकडे “अतिथी” म्हटलं आहे, म्हणजे ज्याची येण्याची (आणि जाण्याची सुद्धा ) तिथी निश्चित नाही तो ! देव हा अतिथी नाही. आपल्या शरीरात तो गर्भावस्थेपासूनच स्थापन झालेला आहे. पण आपण त्याच्याशी एवढे “युजर्स फ्रेंडली” होतो, की आपल्याला त्याची किंमतच कळत नाही, किंवा त्याचे तेवढे महत्त्वच वाटत नाही.
अर्जुनाला कृष्ण सखाच वाटत होता. पण कृष्ण हे भगवंत आहेत, याची जाणीव विराट रूप दर्शन झाल्यावर झाली.
श्वास आला काय गेला काय, त्याचे महत्त्वच कळत नाही, जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, तेव्हा या प्राणाचे महत्त्व समजते.
पूजा करण्याच्या निमित्ताने,
“हे परमात्म्या, तुझाच अंश असलेला हा आत्मा तुला भेटीला बोलवित आहे. (लग्न झालेल्या मुलीला, बरेच दिवसांनी आई भेटल्यावर जसा आनंद होईल, तशी अनुभुति यावेळी यावी.) तू आणि मी वेगळे नाहीत, मी माझे कर्तव्य करण्यासाठी, तुझ्याच आज्ञेने, या पृथ्वीलोकात आलो आहे. या पृथ्वीतलावरील रज तम गुणांमुळे माझे सत्त्व कमी होत आहे, तुझ्या भेटीमुळे माझे सत्त्व मला परत वाढवता येणार आहे, म्हणून तू मला भेटायला ये !”
असा भाव या आवाहनामधे असावा. तर आपल्याला आवश्यक असलेला सत्व गुण ( शक्ती, उर्जा, अग्नि, एनर्जी) घेऊन “तो” येईल.
माझ्यासाठी अमुक वस्तु घेऊन ये, असा निरोप दिल्याशिवाय, काय हवंय ते सांगितल्याशिवाय, नेमकी ती वस्तू कशी आणणार ना ? तसंच आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
29.05.2017
Leave a Reply