आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग 17 – पुष्प पाचवे
वेगवेगळी फुले उमलली
रचूनी त्यांचे झेले.
बुके शब्दाला प्रतिशब्द म्हणजे झेले असे लक्षात येते. परडी देवासाठी, गजरा घरातल्या देवीसाठी आणि झेला इतर माणसासाठी !
देवासाठी फुले काय पाने काय एकच !
भगवंत सांगताहेत,
पुष्पं पत्रं फलम् तोयम्, मला काहीही चालेल. फक्त भक्तीभावाने अर्पण करा. हे देवासाठी ठीक आहे. पण फुलांऐवजी पानाचा गजरा सौ. देवीसाठी ठीक राहील का ? तिथे पुष्पार्थे अक्षताम् समर्पयामी म्हणून कसं चालेल ? माणसासाठी मात्र तेथे पाहिजे जातीचे !
पानावरून आठवले. देवाला जशी फुले वाहातात, तशी पाने देखील अगदी मंत्र म्हणून वाहिली जातात. याला पत्री वाहणे म्हणतात. याचे मंत्रदेखील किती आरोग्य पूरक आहेत पहा,
एकदंताय नमः अर्क पत्रम समर्पयामी ।
गजकर्णाय नमः तुलसीपत्रम समर्पयामी ।
लंबोदराय नमःबदरीपत्रम समर्पयामी ।
नावे गणेशाचीच. पण गर्भित अर्थ वैद्यांसाठी आहेत.
दंतांसंबंधी काही व्याधी असतील तर रूईचे पान किंवा पान जाळून त्याची राख मंजनामधे वापरण्यासाठी सूचक आहे का ?
गजकर्ण या रोगासाठी किंवा कर्णासंबंधी व्याधीकरीता तुलसीपत्र.
ज्याचे उदर लंब आहे अश्यासाठी खरखरीत बदरीचे पान. हे आरोग्य सूचक नव्हेत काय ?
पानेदेखील तोडायची नाही, खुडायची. पत्री गोळा करण्याच्या निमित्ताने आवारामधे कोणती झाडे कुठे आहेत, ते वर्षातून एकदा तरी कळते. आयुर्वेद किंवा आरोग्याची ओळख ही अशी शाळेत जाण्यापूर्वीपासूनच होती.
विष्णुसाठी तुळस प्रिय आहे, गणेशाला दुर्वा, तर शंकराला बेल. बेल नसला तर प्रतिद्रव्य म्हणून निर्गुंडी, मारूतीला रूई, नंदीला आघाडा, अशी पत्रांची योजना कुणी का केली असेल, का केली असेल ?
शेयशायी विष्णुंचा निवास सागरात आहे, पाण्यात आहे. सतत पाण्याशी संबंधीत आजारापासून सुटका होण्यासाठी पाणी लगेचच शोषून घेणारी तुळस हा त्याचा “अॅण्टीडोट” म्हणून सांगितले गेले असेल का ? रक्तबीज राक्षसाला गिळल्यानंतर, गणेशजींच्या मनाचा, तनाचा दाह कमी करणारी दुर्वा, हे पित्तज व्याधींचे प्रतिक समजता येईल का ?
कृपानिधी भोलेनाथ शंकर तर असलं तर सूत नाहीतर भूतराज ! कधी समाधी तर कधी समाधी भंग होऊन तांडव सुरू होईल ते सांगता येत नाही, अशा क्षणात रक्तदाब वाढणाऱ्या व्यक्तींसाठी बेलाची उपाय योजना असेल का ? नंदी म्हणजे बैल. पशूंचा प्रतिनिधी. जसे माणसासाठी गुळवेल, तसे आघाडा हे पशुचिकित्सेमधील एक प्रमुख औषध आहे.
देवतांसाठी ज्या फुलापानांची योजना केली आहे, त्याचा हेतु काय असेल ?
कधीतरी आयुर्वेदाभिमुख होऊन, वेगळी नजर वापरून, अध्यात्मामधील आरोग्याच्या छुप्या अर्थाचा शोध घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा.
आपल्या संस्कृतीच्या या पाउलखुणा आहेत. त्या तश्याच जपायला हव्यात, नाहीतर एक दिवस जर्मनीतून एखादा प्रतिमॅक्समुल्लर धोतर नेसून यायचा आणि षोडशोपचार पूजा सांगणारा पुरोहित व्हायचा !
— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
10.06.2017
Leave a Reply