आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 20-धूपं समर्पयामी-भाग एक
षोडशोपचार पूजेमधील पुढील उपचार आहे, धूप दाखवणे. देवासाठी धूप दाखवणे. निर्गुण रूपातल्या ईश्वराला सगुण रूपातील मूर्तीमधे स्थापन करून त्या देवत्वाला धूप दाखवणे. असा हा उपचार !
वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः।
आघ्रेयः सर्व देवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
असा मंत्र म्हणत धूप दाखवायचा आहे.
उत्तम वनस्पतीच्या उत्तम रसापासून निर्माण झालेला, सुगंधी द्रव्यांमध्ये उत्तम गंध असलेला, सर्व देव देवतांना ज्याचा गंध आवडतो असा धूप मी तुला अर्पण करतो, त्याचा तू स्विकार कर, अशी प्रार्थना करायला सांगितलेली आहे.
या सुगंधी धुपातून तयार होणाऱ्या धुराच्या वासाने वातावरणातील अनिष्ट आणि अदृश्य शक्ती नष्ट होतात. वातावरण सुगंधीत व्हावे, प्रसन्न व्हावे, याकरीता देवाच्या नावे हा धूप सर्व घरामधे पसरवला जातो.
आजच्या भाषेत सर्व घर “फ्युमिगेट” केले जाते. फ्युमिगेशन ही प्रक्रिया आजही ऑपरेशन थिएटर निर्जंतुकीकरणामधे जगभरात वापरली जाते. जे न देखे रवि ते देखे कविच्या स्टाईल मधे जिथे कोणतेही स्थूल द्रव्य अथवा द्रव द्रव्य पोचू शकत नाही, अशा लपलेल्या ठिकाणी हे सूक्ष्म वायुरूप औषध त्वरीत पोचते आणि तेथील छुपलेल्या सूक्ष्म आणि स्थूल दोन्ही जीवजंतुंना बाहेर काढते. देवाला धूप का दाखवायचा ? या प्रश्नाचे हे आहे एका वाक्यातले उत्तर.
खरंच आहे. साधे घर साफ करायचे असेल तर प्रथम केर काढला जातो. स्थूल रूपातील म्हणजे डोळ्यांना सहज दिसतात असे पाल, उंदीर, असे मोठे जीव आणि ढेकूण, किडे, डास, चिलटे, कोळी, मुंगी, वाळवी, असे घरात लपलेले उपद्रवी छोटे छोटे किटक बाहेर काढले जातात. ( आपले रहाते घर, ज्याला मी ‘माझे माझे’ म्हणत असतो, पण या माझ्याशिवाय कितीतरी जण या माझ्या निवासस्थानात रहात असतात, हे सांगताना, अनेक प्रकारच्या किड्यांचे वर्णन समर्थांनी दासबोधामधे केलेले आहे.)
तर असे हे छोटे मोठे किटक केरसुणीने घराबाहेर काढता येतात. पण जमीनीखाली, किंवा फरशीवर चिकटलेले काही जीवजंतु केरसुणीने काढता येत नाहीत, यासाठी गोमूत्र कालवलेल्या शेणाने सारवून घेणे, पाण्यात विभूती, गोमूत्र टाकून सर्व काचा दरवाजे, तावदाने पुसुन घेणे, शेणखळा किंवा सडा टाकणे, अगदी आजही फिनेल, डेटाॅल, सॅव्हेलाॅन, हार्पिक, लायझाॅल इ.इ. द्रव द्रव्य म्हणजेच सॅनिटायझर वापरून उरलेले, चिकटून राहिलेले जंतु धुवुन टाकले जातात. घराची, जमिनीची जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी आपण करीत असतो. यासाठी घन, द्रव पदार्थ वापरत असतो. परंतु एवढ्या उपायांनी पूर्ण घर स्वच्छ शुद्ध होत नाही. छत आणि जमिन यांच्यामधेही काही भाग शिल्लक असतो, जिथे शुद्धी करणारे घन अथवा द्रव पदार्थ पोचू शकत नाहीत. इथे धूर उपयोगी होतो.
भिंतीना पडलेल्या सूक्ष्म भेगा, कपाटांच्या मागे, बेडच्या खाली, उशी, बेडशीट, गाद्यांच्या मधे, कौलारू घरात कौलांच्या मधे लपलेले सापासारखे स्थूल जीव, किंवा फ्रीजच्या मागे, टीव्हीच्या मागे, स्पीकर बाॅक्सच्या मागे, पुस्तकाच्या कपाटातील कसर, केरसुणीने पण जाणार नाही किंवा तिथे सॅनिटायझर पण वापरता येणार नाही. अशा सर्व ठिकाणी धूपं समर्पयामी.
जिथे इतर कोणतेही घन अथवा द्रव द्रव्य पोचू शकणार नाही, अशा ठिकाणी जंतुनाशक म्हणून वायुरूप द्रव्य सहज पोचते आणि जंतुनाशनाचे काम करते.
आले का काही लक्षात ? कोणत्या देवासाठी धूप घालायचा आहे तो !
खरं तर हा धूप देवासाठी नाहीच आहे, तो आहे दानवांसाठी ! पण “मिडीयाला” कसे सांगणार ? देवाला आवडतो म्हणून देवासाठी आम्ही धूप जाळतो, असं सांगितले की सगळेच खुश !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.06.2017
Leave a Reply