आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 23-धूपं समर्पयामी-अंतिम भाग चार
कालच्या टीपेवरून एका गटात एक खोचक सूचना सुचवली गेली, “आपण म्हणताय त्याप्रमाणे अग्निहोत्र जर एवढे प्रभावी असेल तर सर्व हाॅस्पीटल्स, सूतिकागृहे, दवाखाने इ. मधे दररोज अग्निहोत्र केले तर डाॅक्टर, औषधे यांची काही गरजच उरणार नाही. अज्ञान दूर सारा, विज्ञान स्विकारा.” उगाच नको ते सांगत राहू नका, या अर्थी त्यांना सांगायचे होते. विज्ञानाच्या नावाखाली आज काही पुरूषाधम वेडेकर मंडळींना भारतीय शास्त्रांचा, त्यातील सूत्रांचा खरा अर्थ कधी कळलाच नाही, ज्यांना अज्ञान विज्ञान शब्द सुद्धा, शुद्ध स्वरूपात लिहिता येत नाही, अश्या “ज्ञानी” व्यक्ती केवळ विरोधाला विरोध म्हणून बोलत रहातात. पण असे बोलून आपण आपल्याच अज्ञानी जाती बांधवांचे नुकसान करून घेत आहोत, आणि आपले हसे करून घेत आहोत, हे पण यांच्या लक्षात येत नाही. असो. नुसता धूर काढत असतात झालं. तसा नुसताच धूर उदबत्यांमधून पण येतो.
उदबत्ती हे धूपन चिकित्सेतील शेवटचे टोक. ही पूर्ण चिकित्सा नाही आणि फायदे देखील पूर्ण नाहीत. तरी पण काही अंशी धूर तयार होतो, म्हणून विचार करायचा.
अगरबत्ती करायला बांबू वापरला जातो. भारतात बांबू कधीही जाळला जात नाही. तो शाकारणीसाठी, बांधकामासाठी किंवा तिरडी बांधण्यासाठी वापरला जातो. तिरडीवरचा बांबू आणि बांबूच्या कामट्या देखील सरणात जाणार नाही, याची काळजी घेतली जाते. बांबू जाळल्याने जो वायु तयार होतो, तो स्वास्थ्याला हानीकारकही आहे, असेही वाचनात आले होते. अश्या बांबूचा वापर अगरबत्ती करण्यासाठी केला जाणे चुकीचे आहे.
भारतीय परंपरेमधे केवळ धूप द्रव्य, हवन सामग्री एकत्र करून अग्नीवर अर्पण करायची पद्धत. या धूपद्रव्याला, बांबूच्या काड्यांचा आधार देणे भारतीय नाही, या बांबूच्या काड्यांना दुसरा समर्थ पर्याय निवडावा, असे मला वाटते. अन्य तज्ञांनी, आयुर्वेद वैद्यांनी वा अन्य वनस्पती शास्त्रज्ञांनी यावर आणखी प्रकाश टाकावा.
अगरबत्ती मधे जी सुगंधी द्रव्ये वापरली जातात, ती पूर्णपणे नैसर्गिक असावीत. पण आज ज्या उदबत्या मिळतात, त्यात कृत्रिम वास येणारी रसायने वापरली जातात, जे योग्य नाही. परिणामी त्यापासून तयार होणारी विभूती ही देखील औषधी ठरत नाही. उदबत्ती अथवा अगरबत्ती मधे मुख्यतः उद अथवा अगर हे दोन पदार्थ वापरलेले असतात. याऐवजी जर गाईचे शेण गोमूत्र आणि गाईचे तूप, धूप, गुग्गुळ आणि नैसर्गिक सुगंध असलेली तेल द्रव्ये वापरली गेली तर त्याचे औषधी गुणधर्म मिळतील, नाहीतर फायद्यापेक्षा तोटेच जास्ती होतील.
आता तर डाॅक्टर सुद्धा धुराची अॅलर्जी असं सुद्धा सांगायला लागलेत, देवळात जाऊ नका, धुराकडे नेऊ नका, त्यातील काही धूर औषधी आहेत, हे विसरून कसे चालेल ? नको ते धूर सोडायला सुरवात झाल्यावर हवे ते औषधी धूर सुद्धा बदनाम होऊ लागले आहेत.
जी गोष्ट अगरबत्तीची तीच कछुआ जलाओ मच्छर भगाओ ची ! मग कंपनी कोणती का असेना, त्यात वापरलेल्या रसायनांनी डासांपेक्षा, माणसांचाच जीव गुदमरून जातो. लहान मुलांना तर या डासांच्या काॅईल्स खूपच हानीकारक आहेत. जी गोष्ट काॅईल्सची तीच वाफ निर्माण करणाऱ्या डब्यांची, किंवा कागदाला चिकटवलेल्या विषारी द्रव्यांच्या ठिपक्यांची. एका झटक्यात, फटक्यात प्रतिकारशक्तीच गायब होऊन जाते.
सिगरेट ओढून स्वतःच्या छातीचा खोका करायचाच, शिवाय जो ओढत नाही, त्यालाही या विषारी धुराचा प्रसाद द्यायचा, डास मारण्यासाठी राॅकेल अर्धवट जाळून केला जाणारा विषारी धूर, गाड्यांमधे चुकीच्या प्रतीचे इंधन वापरून होणारा विषारी धूर, केमिकलचे कारंजे उडवणाऱ्या एमआयडीसीतील चिमण्यांमधील विषारी धूर, यामुळे होणारे प्रदूषण, याकडे कोणाचे लक्षच नाहीये.
विषारी धुरापासून होणारे हे “स्लो पाॅयझनिंग” आहे, हे कोणाच्या लक्षात येत नाहीये का ? धूपन चिकित्सा बदनाम करणाऱ्या आणि नुसता विषारी धूर ओकणाऱ्या या मंडळींपासून सावधान.
भारतीय पद्धतीप्रमाणे सर्व रुग्णालयामध्ये जर, सूर्योदय सूर्यास्त या वेळा पाळून अग्निहोत्र सुरू केले तर, रुग्णांची संख्या, आणि वाढते साथीचे रोग निश्चितच कमी होतील…….
म्हणून तर ही “रिस्क” कोणी घेत नाही ना ! एवढी मोठी सोन्याची कोंबडी देणारी मेडीकल इंडस्ट्री कोणाला नको आहे ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
16.06.2017
Leave a Reply