कचरा हा होतच असतो. भाजी निवडली की त्यातून काही निरुपयोगी भाग निघतो, कारखान्यात एखादे उत्पादन घेतले की काही कचरा निर्माण होतो. दवाखान्यात बँडेज करायला गेलो की काही टाकाऊ भाग तयार होतो. शेतात पीक काढले की रोपे, झुडपे, ज्वारी-बाजरी-मका काढल्यावर उरणारी कणसांची बुरणुसे, छापखान्यात कागदाचा कचरा असा सगळीकडे कचरा निर्माण होतो.
आगगाडीतून जाताना आपण काही खातो, पितो त्याचे कप, कागद आपण खिडकीतून फेकून देतो. घरातला कचरा अनेकजण खिडकीतून रस्त्यावर फेकून देतात. त्यामुळे कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये आणि त्याचे नीट निर्मूलन व्हावे यासाठी समाज प्रबोधन करायची फार मोठी गरज आहे.
ह्या गोष्टी शाळेच्या अभ्यासक्रमात घालाव्यात असे म्हणणारे बरेच लोक आहेत. पण मला आठवते की, मी शाळेत असताना रस्त्यावर कचरा टाकला तर त्यातून अनेक रोगांची निष्पत्ती होते अशा आशयाचा एक धडा होता. आणि त्यामधून योग्य तो संदेश मुलांपर्यंत जात असे. पण असा संदेश एकेकदा देऊन पुरा पडत नाही हेच खरे. कारण या नाही त्या निमित्ताने या गोष्टी शाळेत शिकविल्या जातातच आणि तरीही लोक रस्त्यावर कचरा टाकतच राहतात, थुंकत राहतात, खिडकीतून कचरा टाकत राहतात.याचे काय दुष्परिणाम होतात ते सगळेजण वर्तमानपत्रातून वाचत राहतात.
सुरतमध्ये झालेला फ्लेगही सगळ्यांना माहित असतो तरी लोक शिकत नाहीत. हल्ली खूप लोक परदेशी जाऊन येत असतात पण तेथील स्वच्छता काही शिकून येत नाहीत. शेवटी शिक्षण आणि संस्कृती हे दोन वेगवेगळे भाग आहेत असेच म्हणावे लागेल. माणूस उच्च शिक्षित असला ! तरी तो सुसंस्कृत असेल असे नाही. पण तरीही एक मुद्दा शिल्लक राहतोच आणि तो म्हणजे समाजाला शिस्त कशी लावायची? त्यासाठी वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन यावरुन वारंवार प्रबोधन करायची गरज आहे. आणि शिवाय लोकांना दंड करुनही काही प्रमाणात या गोष्टी आटोक्यात आणता येतील.
Leave a Reply