थोर शास्त्रज्ञ डार्विनने या पृथ्वीतलावरचा पहिला ‘जीव’ पाण्यात निर्माण झाला असा सिद्धांत साधारणत: १५० वर्षांपूर्वी मांडला.. ‘सर्व्हायवल आॅफ द फिटेस्ट’ या डार्विनच्या तत्वावूसार त्या पाण्यातल्या पहिल्या सजीवापासून लाखो वर्षांपासून अनेक जीवजाती उत्क्रांत होत होत आजचा प्रगत मानव बनला व यापुढेही ही उत्क्रांती सुरूच राहाणार आहे..अर्थात एखादा छोटा बदल घडायलाही हजारो वर्षं लागतात..
डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत आता सर्वमान्य झाला आहे परंतू आपल्या पुराणातून हजारो वर्षांपुर्वी सांगितलेली आणि हिंदू जनमानसाचा अतिव विश्वास असणारी दशावताराची कहाणी डार्विनच्या तत्वाशी आश्चर्यकारकरीत्या मिळती-जुळती आहे.
पुराणातील भगवान विष्णूचे ‘दहा अवतार’ डार्विनचाच सिद्धांत मांडतात मात्र चमत्कार आणि कथेचा आधार घेऊन, तेही हजारो वर्षांपूर्वी..! गोव्याचे विद्यमान आमदार व कोंकणी-मराठीतील एक नामवंत कवी-गीतकार माझे मित्र श्री. विष्णू सुर्या वाघ यांचे या विषयावरील व्याख्यान मी काही वर्षांपूर्वी ऐकले होते, ते आता विस्तारीत स्वरुपात माझ्या शब्दांत आपल्यासमोर ठेवत आहे.
पुराणकर्त्यांची कल्पनाशक्ती आणि आधुनिक विज्ञानाची पुराव्यासहीत मांडण्याची सिद्धशक्ती यातील श्रेष्ठ कोण, या वादात न पडता आपणं दोघांमधल्या साम्याचा आस्वाद घेऊ..
‘आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म..’ ही दशावताराची आरती आपणांपैकी बहुतेकांना येत असेल. या आरतीमध्ये भगवान विष्णूचे ‘मत्स्य’ ते ‘कल्की’ अशा दहाही अवतारांचे कथारुपी वर्णन केले आहे..
भगवान विष्णूचा प्रथम ‘मत्स्य’ अवतार प्रथम मानला गेला आहे..’मत्स्यरुपी नारायण, सप्तही सागर धुडीसी..’ असं पहिल्या अवताराचं आरतीत वर्णन केलं आहे. पृथ्वीवरचा प्रथम सजीव पाण्यात निर्माण झाला हेच डार्विनही सांगतो..म्हणजे आपल्या पुराणांतून हजारो वर्षांपुर्वी सांगीतलेल्या कथा आणि दिड-दोनशे वर्षांपूर्वी आधुनिक विज्ञानाद्वारे सिद्ध झालेल्या बाबी या दोघांनध्ये आश्चर्यकारक समानता आहे..!
दशावतारातील दुसरा अवतार ‘कूर्म’ अवतार आहे..कूर्म म्हणजे ‘कासव’..डार्विन सांगतो जीव की एका अवस्थेतून पुढील प्रगत अवस्थेकडे उत्क्रांत होत असताना त्याच्यात परिस्थिती अनुरूप बदल घडत जातात.. कासवाचा विचार केला कि आपल्याला सहज लक्षात येईल की कासव हा प्राणी पाण्यात व जमीन अशा दोनीही जागी राहू शकतो..
मासा, कासव किंवा दशावतारात वर्णन केलेले दहाही अवतार ही केवळ प्रतिकं आहेत हे कृपया लक्षात घ्यावे…माशापासून कासव उत्क्रांत झाला याचा अर्थ एवढाच की पाण्यात राहणारे जीव अस्तित्वात असतानाच त्यांच्यापासून कासव व त्याच्यासारखे पाणी आणि जमीन अशा दोनही ठिकाणी सहज वावरू शकणारे अनेक उभयचर जीव उत्क्रांत झाले..
परमेश्वराचा पुढील अवतार ‘वराह’..म्हणजे डुक्कर! डुक्कर हा प्राणी जंगलात वावरणारा असतो..त्याकाळी निश्चितच पृथ्वीवर घनदाट जंगल होतं..जमीन दलदलीची..’दाढे धरूनी पृथ्वी नेता, वराह रुप घेसी..’ असे आरतीत म्हटले आहे आणि याचा अर्थ असा काढता येईल की त्याकाळी अस्तित्वात असलेल्या जमिनीवरील हिमयुगातील बर्फ वितळायला हळुहळु जमिन तयार व्हायला लागली होती..सहाजीकच जमिन दलदलीची होती..आता असे प्राणी अस्तित्वात यायला सुरुवात झाली ज्यांना पाणी मिश्रीत दलदलीची जमीन त्प्रिय होती ( डुकरांना चिखल आजही प्रिय आहे). अश्याप्रकारचे अनेक जीव तयार झाले..
पाण्यात राहाणारे, पाणी आणि जमिन अशा दोन्ही ठिकाणी वावरू शकणारे, आणि डुकरासारखे जंगली प्राणी निर्माण होऊन आता हजारो, लाखो वर्ष उलटली होती..सजीव पुढील पायरीकडे उत्क्रांत होत होता..
आणि पुढचा सजीव ‘नृसिंह’ अवतारात उत्क्रांत झाला..उत्क्रांतीने आणखी एक पाऊल पुढे टाकले…आता असे प्राणी निर्माण व्हायला सुरुवात झाली की ते प्राणी नव्हेत परंतु धड माणूसही नाहीत..नृसिंहाने ‘उंबरठ्यावर’ हिरण्यकशपुला ठार मारले ही कथा या दृष्टीने खूप महत्वाची आहे..चतुष्पाद जंगली प्रण्यांपासून द्विपाद प्राणी उत्क्रांत व्हायच्या ‘उंबरठ्यावर’ आता उत्क्रांती उभी होती याचे सांकेतीक दर्शन ही कथा देते..नृसिंह, हिरण्यकशपू ही नांवेदेखील खुप काही सुचवतात..हिरण्यकशपूमधील ‘हिरण्य’ या शब्दाचा अर्थ सोनं किंवा संपत्ती असा असला तरी ‘हिरण्य’ शब्द ‘अरण्य’च्या खुप जवळचा आहे आणि उर्वरीत ‘कशपू’ या शब्दातील शेवटचे दोन शब्द ‘पशू’ कडे निर्देश करणारे आहेत..हिरण्यकशपूचा नृसिंहाने उंबरठ्यावर केलेला वध हा संकेत आहे की अरण्यातील पशुंकडून उत्क्रांतीची वाटचाल मनुष्यरुपाकडे सुरु होत आहे..!!
पुन्हा हजारो वर्ष गेली आणि पुढे अवतरला ‘वामन’ अवतार..ज्याला मनुष्य म्हणता येईल असा हा प्राणी! वामन याचा शब्दशः अर्थ ‘बुटका’. मानववंश शास्त्र हेच सांगते की पृथ्वी वरचा प्रथम मनुष्य उंचीने बुटका म्हणजे जेमतेम ४-४.५ फुट उंची असलेला होता..’Homo Erectus’ हे त्याच शास्त्रीय नाव..या शब्दाचा अर्थ चार पायावर चालणारा प्राणी आता हळूहळू दोन पायावर उभे राहायला शिकला होता.. Homo म्हणजे माणूस आणि Erectus म्हणजे उभा असलेला असा त्याचा साधारण अर्थ..जंगलात राहाणारा,मेंदू आकाराने लहान असल्याने, शिकार करुन खाणं, गुहेत राहाणं असे सर्व व्यवहार आणि बुद्धीमत्ताही प्राण्याप्रमाणेच असणारा असणारा केवळ नांवाला ‘मनुष्य’ असा प्राणी आता जंगलात वावरू लागला होता..उत्क्रांतीचं कार्य गुमानपणे चालुच होतं.. प्राण्यांसारखे असलेले व्यवहारांनी संथ गतीने मनुष्याची अंधूक छटा दाखवायला सुरुवात केली..अशातच अनेक वर्षांचा कालावधी पार पडला..’भिक्षेस्थळे मागुनी बळीला पातला नेसी….वामनरूप धरोनी बळीच्या द्वारी तिष्ठसी..’..’ वामनाने बळीला पाताळात नेलं या आरतीतल्या शब्दांचा अर्थ, वामनाने बळीला जमिनीच्या खाली जाण्याचा म्हणजे जमिन नांगरण्याचा निर्देश केला, असाही घेता येतो..बळी म्हणजे शेतकरी आणि यातुनच पुढे शेतीचा शोध लागला आणि उत्क्राती पुढे सरकली..
आता ज्याला ख-या अर्थाने मनुष्य म्हणता येईल असा ‘परशुराम’ प्रगटला..! परशुरामाला अन्थ्रोपोलॉजीतील Neanderthal आणि Homo Sepian हि शास्त्रीय नावे लागू पडतील..परशुरामावर जंगल साफ करुन मनुष्यवस्ती व शेतीयोग्य जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आली. परशुरामाने शरीरावर धारण केलेली आयुधं याची साक्ष देतात..परशुरामाचा परशु जंगल तोडण्यासाठी आणि त्याचे धनुष्य जंगली श्वापदांपासून रक्षण करण्यासाठी धारण केले असे म्हणता येईल..परशुरामाने कोकण वसवलं याची सांगड आपल्याला इथे घालता येते..परशुराम उघडा दाखवतात, याचा अर्थ अद्याप वस्त्राचा शोध लागायचा होता असा होऊ शकतो…मनुष्य वस्ती स्थिरस्थावर झाली..माणुस ‘कल्चर्ड’ व्हयला सुरुवात झाली..आता गरज भासू लागली ती शेती, संपत्तीचे संरक्षण करण्याची..राज्यपद्धती हळुहळु आकार घेऊ लागली..
उत्क्रांतीने आणखी पुढे झेप घेतली..आणि ‘रामराज्याची’ संकल्पना साकारणारा ‘पूर्ण’ पुरुष ‘राम’ अवतारला..Homo Sepian Sepian हे शास्त्रीय नाव धारण करणारी मनुष्य जमात निर्माण झाली..या शास्त्रीय नावाचा अर्थ ‘ज्याला जाणीव असल्याची जाणीव आहे असा मनुष्य’..परशुरामासारखी जंगलापासून जमिन तयार करण्यासाठी रामाला आता परशुची गरज नव्हती..त्याने परशुचा त्याग केला आणि शत्रुनिःपातासाठी धनुष्य धारण केलं. सत्यवचनी रामासारखी प्रजा पृथ्वीतलावर सुखाने नांदू लागली..सत्ययुगाचा जन्म झाला..अशा अनेक वर्षांच्या कालावधीनंतर ‘सत्या’चे अपचन झाले आणि कोणत्याही परिस्थीतीत ‘सत्या’ला धरून राहावे या ‘रामनिती’ कडून मनुष्य परिस्थीतीनुरूप वागावे या ‘कृ़ष्णनिती’च्या दिशेने माणूस उत्क्रांत झाला..
यापुढच्या काळात उत्क्रांतीची शारिरीक दृष्य चिन्हे कमी होत गेली मात्र माणसाची बौधिक उत्क्रांती सुरूच राहिली..
रामावताराच्या नंतर व ‘कृष्ण’ अवताराच्या अगोदरच्या काळात मनुष्य पुन्हा प्राणी होण्याच्या दिशेने वाटचाल करत होता..युद्ध, असत्य, कुट-कपट याची चलती होती. मनुष्याला ख-या-खोट्याची जाणिव करून देण्याची गरज निर्माण झाली होती आणि ती करून देण्यासाठी ‘कृष्ण’ अवतरला..’देवकी वसुदेव बंदी मोचन त्वा केले..’ या आरतीतल्या ओळींचा अर्थ, अनागोंदी, अत्याचार या मुळे समस्त स्त्री-पुरुषांचं आयुष्य बंदीखान्यासारखं झाला होता..पृथ्वीवरचं आयुष्य ‘अंधकार’मय झालं होत..आणि अशा ‘अंधारात’ मध्यरात्री कृष्णाचा जन्म झाला असा याचा अर्थ हा असू शकतो..सत्याचा आग्रह न धरता परिस्थितीनुरूप वागावे हे कृष्णाने दाखवून दिले…कृष्णाने अर्जुनाचे सारथ्य केले या गोष्टीला खूप अर्थ आहे..सारथी म्हणजे चालक..वाहन चालवून इच्छित स्थळी नेणारा..कृष्णाने अंधकारात गाडल्या गेलेल्या मानव जातीला उजेडाचा रस्ता दाखवला असा याचा अर्थ काढता येईल..त्याचबरोबर असत्याचा नाश करायला प्रसंगी असत्याचे शास्त्र वापरायला हरकत नाही असेही कृष्ण सुचवतो.. जयद्रथाच्या वधाचा प्रसंग आपल्याला खूप काही सांगून जातो..
कृष्ण प्ृथ्वीतलावरच्या ‘लोकशाही’चा प्रणेता आहे. कृष्णाने आपल्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला व बाकीच्यानी आपल्या काठ्या आधारासाठी लावाव्यात असे सर्वांना आवाहन केलं ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहित आहे. ही घटना आपण एक चमत्कार म्हणून बघतो व सोडून देतो. परंतू ही कथा खुप मोठा आणि महत्वाचा संदेश देते. गोवर्धन पर्वत हे भुमीचं प्रतिक, तो उचलण्यासाठी कृष्णाची करमगळी व बाकीच्यानी लावलेल्या काठ्या असे सांगतात की या भुमीवर सर्व जनतेचा हक्क आहे, केवळ राजाचा नाही. सोकशाहीच् हे तत्व आहे, ते सर्वप्रथम कृष्णाने कृतीने दाखवलं.
या पुढची उत्क्रांती अर्थात अवतार होता बुद्धाचा..राम, कृष्ण यांच्या अवतारा नंतर माणसाची वृत्ती विरक्तीकडे झुकू लागली हा ‘बुद्ध’ या प्रतीकाचा अर्थ..मस्तकी मुकुट नको आणि हाती शस्त्रही नको..जगाला शांतीचा, त्यागाचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचा प्रसार सुरुवातीला खूप जोमाने झाला..पुढचे आपल्या सर्वाना माहिती असेलच…सध्या आपण जगतोय ते ‘कल्की’च्या दहाव्या अवताराच्या काळात…कल्कीचा अर्थ ‘कली ’..कलियुग म्हणतात ते हेच..माणसा-माणसातला विश्वास लयाला गेला आहे..आपापसात युद्ध, लढाया सुरु आहेत..मनुष्य संपत्तीच्या मागे धावत सुटला आहे..आणि पुन्हा एकदा मनुष्य पुढील उत्क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे, पुढील अवताराची वात पाहत आहे..उत्क्रांतीचे चक्र सुरूच आहे आणि सुरूच राहणार आहे..
वरील लेख हा एक कल्पनाविलास आहे..तरीही चार्ल्स डार्विनने मांडलेली उत्क्रांतीची थिअरी आणि आपला दशावतार यांतील साम्य ही कल्पना मनात भरून राहिली आणि ती कागदावर मांडल्याशिवाय मला राहवले नाही..ही कल्पना नसून कदाचित सत्यही असू शकेल कोणजाणे..!! तो विषय यातील अधिकारी व्यक्तींचा..तो पर्यंत आपण केवळ याचा आनंद घेऊ..!!
-गणेश साळुंखे
9321811091
फारच छान!
बऱ्याच वर्षांपासून माझेही मत हेच आहे, माझे मत संक्षिप्त रुपात आहे पण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण केले आहे सर.
एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ती वराह अवतराबद्द
वराह म्हणजे डुक्कर, ज्याला मान नाही. फक्त शीर आणि धड आहे. म्हणजे या स्वरूपातील जीवाला फक्त शीर आणि धड आहे पण मान अजून विकसित झाली नाही.
पुढील अवतार नृसिंह, अक्राळ विक्राळ, शीर प्राण्याचे पण शरीर माणसाचे, हा जीव स्वतःच्या हाताच्या नखाने जीवाला मारतो, म्हणजे अजूनही हा जीव इतर प्राण्यांप्रमाणे शिकार करून जगत आहे. हत्यारं अजूनही वापरत नाही
नवनाथ शेलार
8454040607
नितीनजी,
खूप विचारप्रवर्तक असा लेख..
माझेही दशावतारांबद्दल असेच विचार आहेत.
प्राचीन हिंदु संस्कृतीबद्दल असे काही लिहिले की त्यावर टीका करण्याकडे कल दिसून येतो. हजारो वर्षांपूर्वी एखादे (वैज्ञानिक) सत्य अगदी आजच्या काळाप्रमाणेच मांडले जायला हवे होते असा अट्टाहास नसावा. ते प्रतिकात्मक रूपात मांडले गेले असेल तर काय बिघडले?
इथे वामनावतारा बद्दल मी एक वेगळा विचार केला आहे. प्राणीसृष्टीत मत्स्य, उभयचर, सस्तन वर्गाखेरीज कीटक हा एक खूप मोठा वर्ग आहे. कीटक हे आकाराने खूप लहान असतात. तसेच ते जमीन, हवा (आकाश) , जमिनीखाली तसेच अगदी माणसांच्या अंगावरही आढळतात. वामन हा देखील उंचीने खुजा आहे. पण त्याने दोन पावलात पृथ्वी, आकाश व्यापले व शेवटी तिसरे पाऊल बलीच्या डोक्यावर ठेवले व त्याल पाताळात पाठवले. हा वामन कीटकांचे तर प्रतिकात्मक रूप नसेल ना? शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात. कीटक शेतकऱ्याचे शत्रु तसेच मित्रही असतात. वामनाने बळीला पाताळात (द. अमेरिका) पाठवले खरे पण त्याचे नुकसान केलेले नाही. असो..
या कथांमधुन जे काही सांगायचे असेल त्याचा आपण अंदाजच बांधु शकतो..
तरी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगाल का , की जर आपल्या सर्वांना डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत माहितच नसता किंवा डार्विनने तो मांडलाच नसता तर या दशावताराच्या कथा ऐकून/ वाचून उत्क्रांतीचे सत्य आपल्याला उमगले असते का? आधुनिक युगात कोणत्याही भारतीय विद्वानाने या कथा माहित असूनही प्राणीसृष्टीच्या उत्क्रांतीचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून शोध घेतला नाही. त्यामुळे उत्क्रांतीवादाचे पूर्ण श्रेय पाश्चात्य जगातून आलेल्या चार्ल्स डार्विन यालाच द्यावे लागते ते उगीच नाही. बरोबर ना?
छान लेखासाठी धन्यवाद!
– मंदार
जलचर, अुभयचर, भूमिचर असे प्राणी अुत्क्रांत झाल्यानंतर, नरसिंह अवतार हा, प्राण्यापासून माणूस हे संक्रमण दर्शवितो. मारुती, हा माकडापासून मानव होण्याची संक्रमणावस्था दर्शवितो. नरसिंह अवतारापूर्वी हवेत अुडणार्या पक्ष्यांचं प्रतीक म्हणून गरुडावतार असण्याची आवश्यकता होती. कृष्णावतार हा नववा अवतार समजतात तर कल्की हा दहावा अवतार कलीयुग संपल्यानंतर होणार आहे असं समजतात. कलियुग ४ लाख ३२ हजार पृथ्वीवर्षांचं कल्पिलं आहे. त्याची फक्त ५५०० वर्षच झाली आहेत.
सुमारे ७० लाख वर्षांपूर्वी माकडांपासून माणूस झाला…अुत्क्रांती थांबलेली नाही. पुढच्या १ कोटी वर्षांनंतर जो प्राणी अुत्क्रांत होअील तो कल्की असं स्पष्टीकरण मी देतो.
मनोजजी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..!