कायओ?काय चाललंय!बसले का लॅपटॉप उघडून!रविवार आहे ना?तरी सुद्धा काम?बाहेर मस्त पाऊस पडतोय..छान वातावरण आहे..चल जावू कुठंतरी!नाहीतर फिरायला..सिनेमाला नाटकाला!स्वतःहून कधी म्हणायची इच्छा होत नाहीका हो तुम्हाला?म्हटलं आज उद्या कधीतरी स्वतःहून म्हणाल..चल जावू या ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाला!पण कसलं काय!आपल्या सोसायटीतल्या सगळ्या जावून पाहून सुद्धा आल्या!त्याचं कायये कामा शिवाय काहींचं सुचत नाही ना आम्हाला!एक सांगा!आपण दोघं शेवटचं बाहेर कधी गेलो आठवत का?घरातलं करा तुमचं बघा!राब राब राबा.. सुट्टीची वाट पाहत रविवार पर्यत थांबा!पण नाही..बायकोला समजून घ्यायचंच नाही म्हटल्यावर इलाजचं खुंटला..खरंय ना?
काय खरंय?काही म्हणालीस मला?एक अर्जंट ऑडिट रिपोर्ट पूर्ण करतोय!आजची डेड लाईन दिलीय!बोल!काहीतरी म्हणत होतीस तू?
काssही नाही!चालुद्या तुमचं!एकचं सांगते!कधीतरी स्वतःचा ऑडिट रिपोर्ट चेक करा जरा!गेल्या कित्येक दिवसांत बायकोसाठी किती वेळ दिलाय ह्याचा!लग्न झाल्यावर काय ते वर्षभर अवतीभोंवती पिंगा घातलात बस्स!पुढं काय?वर्ष होत नाही तोचं सासूबाईंना आजी होण्याचे डोहाळे लागले आणि संपलं सारं!पहिलं बाळंतपण आलं सुद्धा!प्रेग्रन्सीत तर सगळा आनंदिआनंद होता!सगळी सूत्र सासूबाईंनी स्वतः कडे घेतली!बेडरूम ऐवजी अक्षरशः बाहेर हॉलमध्ये झोपायला लावलं तुम्हाला!कायतर म्हणे बाळाची काळजी!बाळंत होईतो सासूबाई माझ्या सोबत बेडरूम मध्ये!एकदातरी विरोध केला का ओ तुम्ही?आई म्हणेल तसं!अहो!रुटीन चेकअपला सुद्धा आईसोबत?म्हणे त्याला काय कळतं?त्या नऊ महिन्यात एकदातरी आलात माझ्या सोबत? ए!माझी लिंक तोडू नकोस!प्लिज..आपण नंतर बोलूया का ह्या विषयावर?तोपर्यंत एक कप चहा आणशील मला? बस्स!तुम्ही सगळं नंतरच बोला!जरा आजूबाजूला बघत चला!इतर नवरे किती काळजी घेतात बायकांची!ती शेजारची जोडी पाहा!कितीही दमून आला तरी प्रेग्नेंट बायकोला न विसरता कंटाळता नवरा रोज फिरायला घेऊन जातो बागेत !इच्छा होईल ते खायला घालतो!सासू सासरे सगळे आहेत घरात पण चेकअपला सुटी टाकून घेऊन जातो स्वतः!तुमचं काय?सगळं मातोश्री भरोसे..
तुला काय वाटतं?हे सगळं हौस म्हणून करतोय मी?आणि दुसरं..तुला माहित नाहीये..माझ्या आधीची दोन भावंड काही कारणाने नाही जगू शकली!त्यामुळं लहानपणापासून अतीव काळजीपोटी आई खूप हळवी झालीय माझ्या बाबतीत !थोडी जास्तच काळजी घेते माझी..जॉब करून लेकाला घरातली ने आण..छोट्यामोठ्या इतर कामांमुळे त्रास धावपळ करायला लागू नये हा तिचा उद्देश!आपल्या बाळाच्या वेळीही तसंच काहीसं!याआधी जेकाही घडलं त्याची पुनःरावृत्ती नको म्हणून तिनं तुझी अधिकची काळजी घेतली तर बिघडलं कुठे?आणि तू सारखं म्हणतेस ना..कामात बिझी राहतो!वेळ देत नाही!बाहेर घेऊन जात नाही!सगळं कोणासाठी?अगं!लग्न झालं तेव्हा कुठं राहत होतो आपण?चाळीत!छोट्याशा खोलीत ना?तेव्हाच ठरवलं..बायकोला फार काळ नाही ठेवायचं इथं!प्रचंड मेहनत कष्ट वेळप्रसंगी ओटी करून..घर बुक करण्याइतपत पैसे जमवले..हप्ता भरणं आवाक्याबाहेर होतं!तरीही जिद्दीने होमलोन घेऊन हे घर घेतलं!वेळचेवेळी हप्ता जातो घराचा!खानपान.. तुमच्या आवडी निवडी..घरात काहीही कमी पडू नये साठी आटापिटा सुरूच असतो माझा!काय सांगू तुला..मित्रमंडळी ऑफिस मधले जोडीदार मजा करतात!औटिंगला जातात!वरचेवर पार्ट्या करतात..मी गेलो कधी?घर ते जॉब..नंतर थेट घर!मनात असूनही सगळयांपासून दूर राहिलो..राहतो..अगं!मित्र मंडळी वर्ष सहामहिन्यात मोबाईल बदलतात..किती वर्ष झालीत तोचं मोबाईल वापरतोय मी!फॅशन कपडेलत्ते कशाचा म्हणून आग्रह हव्यास नसतो कधी!एसी लोकल..मेट्रोला पैसे जास्त लागतात म्हणून त्याचं रोजच्या गच्च भरलेल्या ट्रेनमधून प्रवास करतो..कशासाठी कुणासाठी?हे हे सुट्टीच्या दिवशीही इतर फर्म्सचे जास्तीचं काम करतो ना!ते कोणासाठी?अगं!आपल्या इतर गरजा बरोबरच त्यातून मिळणाऱ्या ज्यादा पैशातून..तुला इलेक्ट्रिक टू व्हीलर घेऊन देण्यासाठी प्रयत्न चाललेत माझे!नेहमी म्हणतेस ना तू!आजूबाजूच्या इतर बायकां.. शाळेत मुलांना सोडायला..छोटीमोठी कामं करायला.. जॉबला..टू व्हीलरवर ऐटीत जातात म्हणून.. तुझी तीही इच्छा पूर्ण करायची जुळवाजूळव चालीय माझी!समजलं?आता यानंतर सुद्धा तुला वाटतं असेल माझं काहीतरी चुकतंय तर पुढे बोल!
नाही!नाही!यापुढे काहींचं बोलायचं नाही मला!मला जे बोलायचं होतं ते तुम्ही ऐकलं!तुमच्या मनात जेकाही चालंय ते समजलं !एक सांगू?हा सगळा प्रपंच फक्त तुम्हाला बोलतं करायचं होतं बस्स!गेल्या कित्येक दिवसांपासून पाहतेय म्यूट मोडवर आहात तुम्ही!सकाळी आठ साडेआठला टिफिन उचलायचा जॉबला बाहेर पडायचं..घरी येताकरता साडेसात आठ होणार!आल्यावर सुद्धा फारसं बोलायचं नाही चहापाणी जेवण झाल्यावर लॅपटॉप घेऊन कामाला बसायचं!मौन व्रत घेतल्यागत!कधी चिडचिड नाही!रागावणं नाही!ना जेवणा बद्दल तक्रार ना टिफिन बद्दल नाराजी!काय चालंय हे?शेवटी म्हटलं आम्हा बायकांजवळच्या परिणामकारक शस्त्राचा उपयोग करायचा!नवऱ्याला चिडून द्यायचं!चिडल्यावर मनातलं हमखास सारंकाही ओठावर येणार!अहो..पती महाशय!मला काहींचं कळत नाही अश्यातला भाग नाहीये!दरमहिन्याला सॅलरीतून घराचा मोठा हप्ता गेल्यावर घरात ओढाताण होते!पैशांची चंचण भासते..जाणवत मला!मान्य! कुटुंबासाठी हे सगळं करताय!पण त्यासाठी स्वतःभोवती एक प्रकारचा कोष तयार करून कुणाशी न बोलता..शेअर न करता त्रास सहन करीत राहायचं!याला काय अर्थ?आम्ही कुणीच नाही का तुमचे? म्हणतात ना पुरुष सहसा मन मोकळं करीत नाहीत!आतल्या आंत साठून ठेवतात!आम्ही बघाबर दोन चार अश्रू गाळून मोकळ्या होऊन जातो!आणि काय ओ!घराचं जावू देतं!आपलं हक्काचं घर झालं.. पण इतर बाबतीत मी..मुलांनी कधी हट्ट केलाय कशाचा? जे आहे त्यांत समाधानी आनंदी आहोत सगळे!हा!आजूबाजूला पाहून कधी म्हटलं असेल..अमुक पाहिजे म्हणून पण त्यासाठी कधी प्रेशर आणलं तुमच्यावर?जे आहे त्यातचं खुश आहोत ना?तुमच्यावर कधी कोणती बंधने लादली?जे आहे त्यात भागतंय ना कशाला अधिकचा ताण तणाव घेताय!काही गरज नाहीये जास्तीचं काम करायची!हसा बोला मित्रांबरोबर जात जा!सोडा एकट्यानं झुरण!
छान झालं!हा विषय निघाला!काय करू!सारखं वाटत राहतं!सुबत्ता असणारे इतर लोक आपल्या परिवारासाठी शंभर टक्के जेकाही करतात त्यापैकी दहा वीस टक्के तरी द्यावं आपण आपल्या कुटुंबाला!पण आर्थिक बळ आडवं येतं!कायमच त्या विचारात गर्तेत राहून चित्त थाऱ्यावर राहत नाही माझं!पण आज खूप बरं वाटलं!डोक्यावरचं ओझं कमी झाल्या सारखं!तू समजून घेतलंस मला!चल!तुला सिनेमा बघायचा ना?बाईपण भारी देवा!आत्ता तिकीट बुक करतो!संध्याकाळच्या शो ला जावू!तोपर्यंत हे काम हाता वेगळं करतो!एक मनातलं सांगू?तुम्ही बायकां जसं अनेक वेळा दीर्घ उसासा टाकून म्हणतात ना..हे बाईपण भारी रे देवा!कारणं भिन्न असू देत..संसारातील अनेक किचकट गणितं जुळवता जुळवता एखाद्या वळणावर आम्हा पुरुषांना सुद्धा कधी कधी आतल्या आंत म्हणावंसं वाटतं..हा पुरुष जन्म!हे पुरुषपण भारी देवा!पण ह्या वैवाहिक प्रवासात सहप्रवासी..जोडीदार जेव्हा चांगला समंजस.. आणि आपल्या साथीदाराला समजून घेणारा भेटतो ना तेव्हा हे वाटणारं भारीपण मोरपीसासारखं सुसह्य हलकं होतं!त्यातली तू एक!थँक्यू बायको!थँक्यू डियर!थँक्यू…
शेखर वैद्य.. नाशिक
09 ऑगस्ट 2023
Leave a Reply