राहुल देव बर्मन याचं मूळ आडनाव देवबर्मन. त्यांचा जन्म २७ जून, १९३९ रोजी झाला.त्यांचे वडील संगीतकार सचिनदेव बर्मन हे त्रिपुरा संस्थानचे प्रिन्स. हे संगीतकार पिता-पुत्र मूळ राजघराण्यातून आलेले. पंचमच्या आई मीरादेवी या सुद्धा बंगालमधल्या एक संगीतकार. आणि सचिनदेव व मीरादेवी या सुरेल दांपत्याची सुंदर रचना म्हणजे राहुलदेव बर्मन… “वरमेको गुणी पुत्रो…‘ या पठडीतली…!
केवळ गीतकारांच्या शब्दांना फुलविण्यातच आर. डीं.नी कधी समाधान मानलं नाही. चित्रपटांना, त्यातील प्रसंगांना अधिक परिणामकारक करणारे पार्श्वासींगत देण्यात आर. डीं.चा हातखंडा होता.
त्यांना बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले जाते. पंचमवर लहानपणापासूनच सर्वसाधारण बंगाली घरात होतात तसे रवींद्र संगीताचे संस्कार होत होते. वयाच्या अकराव्या वर्षापासून तो माऊथ ऑर्गनवर सतत काही ना काही वाजवू लागला. त्याचं ते वाजवणं ऐकून एक दिवस दादामुनी म्हणजे अशोककुमार म्हणाले, “”अरे, ये तो पंचम सूर में बजाता है.‘‘ आणि मग दादा बर्मनांचा तो लाडका “तुबलू‘ पुढे “पंचम‘ या नावानंच ओळखला जाऊ लागला. निसर्गातल्या आविष्कारातील संगीत पंचम शोधू लागला. कडाडणारी वीज, वाऱ्याचा, लाटांचा आवाज.. रेल्वे इंजिनची शिटी.. गलबतांचे भोंगे… कुत्र्यांचं धापा टाकणं… आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वर… ताल… आणि लय शोधत पंचम मोठा झाला. सुरवातीला आपल्या वडिलांचा मुख्य सहायक म्हणून आणि नंतर स्वतंत्र संगीतकार आर. डी. बर्मन!
पंचमदाना स्वतंत्र संगीतकार म्हणून पहिली संधी निर्माता, अभिनेता मेहमूद यांनी दिली. चित्रपट होता “छोटे नवाब.‘ आपल्या अंगी असलेल्या सर्व क्षमतांची सिद्धता आरडींनी या एकाच चित्रपटात वेगवेगळ्या अशा आठ गाण्यांच्या पॅकेजमध्ये दाखवून दिली आहे. मुंबई ते तळोजा या प्रवासात स्टेअरिंगवर बोटे वाजवता वाजवता कंपोज केलेलं “घर आजा घिर आये बदरा सावरीया..‘ हे लतादिदींचं मालगुंजी रागात बांधलेलं गाणं म्हणजे पहिलीच निर्मिती आणि तीच “मास्टर पीस‘ असं विशेषण मिळवून गेली. या गाण्यात तबल्याचा ठेका आणि सतार व सारंगीला असलेला घुंगरांचा समन्वय.. ऐकून वाटणारही नाही, की हा कुणी नवा संगीतकार आहे म्हणून; कारण अमर्याद प्रयोगशीलता, नैसर्गिक आवाजांचा समावेश आणि र्हिदम सेक्श नमध्ये तालवाद्यांचा भरपूर पण सुसूत्र वापर यामुळे आरडींच्या रचना नित्यनवीन राहिल्या. पंचममध्ये एक खोडकर पोरगं सतत असायचं. तो त्याला विविध प्रयोग करण्यापासून कधी दूर ठेवत नव्हता. तबल्यावर हातोडी घासून एक विचित्र साऊंड क्रिएट करून पंचमदांनी तो एका विनोदी गाण्यात वापरला. अर्थात, हा प्रयोग होता आपला लाडका दोस्त मेहमूद याच्यासाठी आणि त्यानेच गायलेल्या गाण्यासाठी. मेहमूदबरोबर खास दक्षिण भारतीय आवाजातले हेल देत हे गाणं गायलंय आपल्या आशाताईंनी. मुत्तूकुडी कव्वाडी हडा.. (दो फूल) हे ते गाजलेलं गाणं.
पंचमदांनी इंडस्ट्रीला बरीच वाद्यं दिली.. जसं स्पॅनिश गिटार, मादल, फ्लेंजर इत्यादी. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा आणून वापरायचं आणि इतर संगीतकारांनी त्याचा वापर आपापल्या संगीतात नंतर करायचा असा पायंडाच त्या काळी पडून गेला होता. बेस गिटार हे असंच त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं वाद्य. भारतात बेस गिटारचा वापर असलेलं पहिलं गाणं पंचमदांनी बनवलं. १९७० ची तरुण पिढी धुंदावून सोडलेलं ते गाणं होतं, “गुलाबी आँखें जो तेरी देखी‘ (दि ट्रेन).
नेपाळी “मादल‘ हे असंच पंचमप्रिय वाद्य. ते प्रथम वापरलं त्यांनी आपल्या वडिलांच्या संगीत संयोजनाखाली म्हणजे “ज्वेलथीफ‘मधल्या “होटों पे ऐसी बात‘ या गाण्यात. या गाण्याचं संपूर्ण ऑर्केस्ट्रेशन पंचमचं. मादल काही काळ उपलब्ध झालं नव्हतं म्हणून या गाण्याचं रेकॉर्डिंगसुद्धा पंचमनं स्थगित केलं होतं.
याच मादलचा भरपूर वापर पंचमदांनी पुढं आपल्या बऱ्याच गाण्यांत केला. “अजनबी‘ चित्रपटातल्या “हम दोनों दो प्रेमी‘च्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान इंडस्ट्रीमधल्या वादकांचा संप होता; पण गाणं रेकॉर्ड करण्याची खुमखुमी आरडींना गप्प बसू देईना. त्यांनी मग आपले प्रमुख चार सहायक घेऊन गाणं पूर्ण केलं. नीट ऐकलं तर आपल्या लक्षात येईल, की या गाण्यात ऑर्केस्ट्रेशन नाहीच मुळी. स्वतःच्या संग्रहात रेकॉर्ड करून ठेवलेला रेल्वे इंजिनचा इफेक्टत, मादलचा सलग ताल, बासरी, शिटी आणि इंटरल्यूड म्युझिक म्हणून त्या चौघांचा कोरस, भूपेंद्रचा आलाप, आणि किशोर-लताचा मेन व्हॉईस.. बस् गाणं पूर्ण. मादल किती सुरेख वाजू शकतो, याची ही एक देखणी प्रचिती होती. मजरुह, गुलजार या प्रतिभावान गीतकारांच्या अनेक मुक्तछंदात्मक कवितांना आर. डीं.नी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि श्रवणीय संगीताने यशोचित न्याय दिला. ही गाणी आजही अगदी ताजी वाटतात. ती सहज ओठांवर येतात. पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. आपल्या १९६१ ते १९९४ दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये बर्मनने ३३१ चित्रपटांना संगीत दिले व स्वत: काही गाणी देखील म्हटली. किशोर कुमार व आशा भोसले हे त्याचे विशेष आवडीचे पार्श्वगायक होते. मा.आर.डी.बर्मन यांचे ४ जानेवारी १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply