रेल्वे व्यवस्थापनात स्टेशनमास्तर हे एक महत्त्वाचं आणि जबाबदार पद असतं. मुख्य स्टेशनावरून प्रवासीगाड्या सुटतात किंवा तिथे थांबून पुढील प्रवासाला निघतात; या संपूर्ण काळात स्टेशनवर जे काही घडतं त्या सर्व घटनाक्रमांची संपूर्ण जबाबदारी तेथील सर्वेसर्वा-अधिकारपदावर असलेल्या स्टेशनमास्तरची असते. त्याला अनेक विभागांतील कर्मचाऱ्यांचं परस्पर संलग्न असणारं काम एकाच वेळी व्यवस्थित नियंत्रित करावं लागतं आणि त्यासाठी त्याला डोळ्यांत तेल घालून मिनिटा-मिनिटाकडे लक्ष पुरवावं लागतं. त्यात कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचा आकडा जास्त असेल तर मग तारेवरची कसरतच असते.
कोणतीही अडचण आल्यास ताबडतोब घ्यावे लागणारे निर्णय आणि तत्परता ह्या दोन मुख्य गोष्टी स्टेशनमास्तरकडे असाव्याच लागतात. सर्व जण खूश राहतील असे समतोल निर्णय घेणंदेखील गरजेचं असतं.
गाडी सुटण्याच्या ठरलेल्या वेळेआधी ती निदान अर्धा तास अगोदर यार्डातून निघून प्लॅटफॉर्मला लावावी लागते. सर्व आरक्षण याद्या (ज्यांवर प्रवाशाचे नाव, कोच नंबर व सीट नंबर दिला जातो) प्रत्येक डब्याला योग्य ठिकाणी व्यवस्थित चिकटवाव्या लागतात. त्यात एखादी जरी चूक झाली, तर होणारा प्रवाशांचा संताप, रोष सांभाळावा लागतो. त्या याद्यांच्या अनेक प्रती काढल्या जातात. उदाहरणार्थ, टी.सी. जवळ एक प्रत, बोर्डावर लावण्यासाठी वेगळी प्रत, ऑफिसला रेकॉर्डसाठी प्रत; आणि हे सर्व काम तत्काळ करावं लागतं.
अन्य सरकारी खात्यांमध्ये सहा-सात महिने कागद हलत नाही, तशी दिरंगाई इथे चालत नाही. काही वेळा जुन्या त-हेची बोगी लागली तर प्रवाशांच्या तक्रारींना तोंड द्यावं लागतं. एखादा व्ही.आय.पी. गाडीनं जाणार असेल, तर मग धांदलच असते. अतिमहत्त्वाच्या गाड्यांच्या प्रत्येक डब्याची सुरक्षातपासणी वेळेत संपवावी लागते.
स्टेशनवर गाडीचा दहा मिनिटांचा थांबा असेल, तर त्या स्टेशनमास्तरना प्रत्येक डब्याची चाकं, स्प्रिंग तपासून घेणं, बॅटरी बॉक्स, व्हॅक्युम ब्रेक पाईप्स, कपलींग्ज, वायरिंग हे सर्व नीट असल्याची खात्री करून घेण्याचं काम लवकरात लवकर उरकावं लागतं. गाडीला पाण्याचा योग्य त-हेने पुरवठा केला असल्याची खातरजमा करून घ्यावी लागते. हे सर्व करत असताना एकीकडे घड्याळाकडे सतत लक्ष द्यावं लागतं. ही सर्व व्यवस्था तपासून, कशाचा अभाव असेल त्याचा पुरवठा करून गाडी ठरलेल्या वेळी स्टेशनबाहेर काढावीच लागते; कारण, पाठोपाठ येणाऱ्या गाड्या ओळीने रांगेत उभ्याच असतात. बऱ्याच स्टेशनांतील प्लॅटफॉर्मसची संख्या पन्नास वर्षांपूर्वी जितकी होती तितकीच आजही आहे, परंतु गाड्यांची संख्या भरमसाट वाढलेली आहे; त्यामुळे तत्परता हा अतिमहत्त्वाचा भाग ठरतो. रोज सर्व गाड्या बिनबोभाटपणे स्टेशनाबाहेर जात-येत असतात. या सर्वांच्या पाठीमागील यंत्रणेचा मुख्य हिरो असतो तो तेथील स्टेशनमास्तर!
-डॉ. अविनाश वैद्य
(Photo : Internet)
Leave a Reply