रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातील प्रवास अतिशय सुखावह असला, डब्यांची देखभाल नीट ठेवणं हे रेल्वेसाठी महा-डोकेदुखीचं काम आहे. आज भारतीय रेल्वेचे ६ ते ७ हजार वातानुकूलित डबे रोज रेल्वेमार्गांवरून धावत असतात. त्यांतील थंडावा कायम राखण्यासाठी (सी.एफ.सी.१२) हा वायू वापरला जातो, परंतु या वायूच्या वापरामुळे हवेतील ओझोनचं प्रमाण कमी होतं व ते पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. या दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक एच.एफ.सी.आर. १३४९ हा गॅस वापरावा लागेल व तो वापरण्याकरता वातानुकूलित डब्यांच्या रचनेमध्ये बरेच बदल करावे लागतील. वर्षाला ४७००० किलो गॅसची गरज लागेल. परंतु यामुळे जागतिक हवेचं वाढणारं तापमान खाली आणण्यास मदत होईल. या दृष्टीने आता नवीन वातानुकूलित डब्यांची बांधणी सुरू झाली आहे.
आज भारतातील खेड्यांत शेकडो हातमागांवर कापड तयार होतं. ते तयार होत असताना पर्यावरणावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. पर्यावरणाचं रक्षण करण्याच्या हेतूने व एक सामाजिक बांधिलकी म्हणून रेल्वे बोर्ड अशा छोट्या औद्योगिक समूहांकडून खूप मोठ्या प्रमाणावर कापड खरेदी करतं, ज्याचा उपयोग वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. यातून खेड्यातील लोकांना उद्योगही मिळतो व पर्यावरणही सांभाळलं जातं.
विजेचा वापर कमी करण्यासाठी रेल्वे आपल्या वसाहतींकरता सी.एफ.एल. बल्बज् वापरून १० टक्के वीज बचत करीत आहे. तसंच पवनचक्क्या आणि सौरऊर्जेचा वापर विद्युतनिर्मितीसाठी करून छोट्या स्टेशनांवरील दिवे त्या विजेवर चालविले जातात. पुढील टप्प्यावर गाडीच्या डब्यांतील दिवेही सौर ऊर्जेवर चालविण्याची योजना आहे.
येत्या काही वर्षांत बायोडिझेलवर चालणारी ‘ग्रीन ट्रेन’ सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पर्यावरण संतुलन सांभाळले जाईल. हे रेल्वे अधिकाऱ्यांचं स्वप्न आहे, जे प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांची पावलं वेगानं पडत आहेत.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply