सुरुवातीस राजिंदरसिंग बेदी यांनी पंजाबीत लेखन केले; पण नंतर ते उर्दूतून लिहू लागले. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९१५ रोजी झाला. त्यांच्या पंजाबीतील कथांचे हड्डीआँ ते फुल्ल (१९४२) व घर विच बजार विच (१९४४) हे दोन संग्रह होत. आपल्या कथालेखनाची सुरुवात त्यांनी प्रख्यात रशियन लेखक चेकॉव्ह याच्या लेखनाने प्रभावित होऊन केली होती. चेकॉव्हशिवाय त्यांनी टॉलस्टॉय, ब्रेट हार्ट, डी.एच्.लॉरेन्स आणि मोपासा यांच्या साहित्याचेही वाचन केले. ‘भोला’ ही कथा १९३६ मध्ये लिहून त्यांनी आपल्या उर्दू कथालेखनाची सुरुवात केली आणि दाना-व-दाम हा आपला पहिला कथासंग्रह १९३९ मध्ये प्रकाशित केला. या संग्रहामुळे त्यांना खूपच प्रसिध्दी मिळाली. या कथासंग्रहात अपार सहानुभूती आणि प्रखर वास्तवता यांचा प्रत्यय प्रकर्षाने येतो.
बेदी हे आपल्या कथांतून जीवनातील दुःखमय पैलूचे दर्शन घडवत असतानाही त्यातील सुखमय पैलूंचेही विस्मरण त्यांना होत नाही, हे त्यांच्या कथेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या दृष्टीने त्यांचे गर्म कोट हे आत्मवृत्त विशेष लक्षणीय म्हणावे लागेल. त्यांच्या कथालेखनाचे आणखी काही विशेष म्हणजे त्यांच्या कथातील सुरुवातीच्या काही वाक्यातच ते सबंध कथेच्या आशयाचे सार सूचकतेने गोठवत असत. कथांशिवाय बेदींनी काही नाटके व एकाकिंकाही लिहिल्या आहेत आणि त्याचे अनुक्रमे बेजान चीजे (१९४३) व सात खेल (१९४६) हे संग्रह प्रकाशित झाले आहेत. एक चादर मैली सी (१९६२) ही त्यांची लघुकांदबरी असून तिला १९६४ चा साहित्य अकादेमी पुरस्कार मिळाला. पंजाबमधील एका गावाच्या पार्श्वभूमीवर ती लिहिली असून तीत ‘राणू’ च्या वैवाहिक जीवनाचे उत्कृष्ठ चित्रण आहे. खूशवंतसिंग यांनी तिचा इंग्रजीत (आय टेक धिस वूमन – १९६७) अनुवादही केला आहे.
‘मिथुन’या कथेतही अशाच प्रकारचे सुंदर शैलीत वर्णन आहे. बेंदीनी ‘सिर्फ एक सिगरेट’ ह्या आणखी एका रमणीय कथेमध्ये पिढयांच्या तफावतीबाबत सुंदर चित्रण केले आहे. दाना-ष-दाम (१९३९) , गिऱ्हान (१९४२) , कोख जली (१९४९) अपने दुख मुझे दे दो (१९६५) , हाथ हमारे कलम हुए (१९७४) हे त्यांचे उल्लेखनीय उर्दू कथासंग्रह होत. मिर्झा गालिब (१९५४), देवदास (१९५६), मधुमती (१९५८), अनुराधा (१९६०) सत्यकाम (१९६९), मेरे सनम इ. गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या असून एक आघाडीचे पटकथा लेखक म्हणून त्यांनी मोठाच लौकिक संपादन केला. एक चादर मैली सी (१९७१), फागुन (१९७२) आणि आँखो देखी (१९७७) हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेत. दस्तक(१९७२) ह्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांची कथा, पटकथा, दिग्दर्शन व निर्मितीही त्यांचीच असून ह्या चित्रपटास तीन राष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत. १९७५ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मा.राजिंदरसिंग बेदी यांचे निधन १९८४ मध्ये झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. marathivishwakosh
Leave a Reply