आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या ‘कल्याणी’ या पात्रामुळे अवघ्या महाराष्ट्रभर घराघरात पोहोचलेली गडकरींची पणती म्हणजे जुई गडकरी.
मराठी साहित्य आणि नाटय़सृष्टीत मोलाचं योगदान केलेल्या राम गणेश गडकरींची ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’ आणि ‘भावबंधन’ ही नाटकं, तर ‘वाग्वैजयंती’ हा काव्यसंग्रह आजही रसिकांवर गारुड घालत आहे. याच गडकरींचा मराठी धागा पुढे कायम राखत आपल्या अभिनयानं आणि मुख्यतः आपल्या ‘कल्याणी’ या पात्रामुळे अवघ्या महाराष्ट्रभर घराघरात पोहोचलेली गडकरींची पणती म्हणजे जुई गडकरी.
जुईचा चेहरा फोटोजेनिक आहे. जुईचे फोटोशूट करण्याचा योग अनेकदा आला. फोटोशूटपूर्वी आणि शूटदरम्यान जुईशी तिच्या अभिनयातल्या अनुभवांबद्दल आम्ही बोलतो. जुई अभिनय क्षेत्रात कशी आली याविषयी तिच्याशी गप्पा मारत असताना ती भरभरून बोलते. अनेक गोड – कटू अनुभव ती सांगते. सहायक दिग्दर्शकाच्या भूमिकेतून तिने या इंडस्ट्रीत प्रवेश केला खरा. मात्र पुढे तिने अभिनयात यावं यासाठी तिच्या सहकाऱयांनी आणि विशेषतः तिच्या आईने तिला प्रोत्साहन दिले. जुई या क्षेत्रात येण्यापूर्वी तिला मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राज्याध्यक्ष यांचं. गौतमजींनी योग्य वेळी आणि योग्य लोकांशी ओळख करून दिल्याने जुईचा प्रवास पुढे सुखकर झाल्याचं ती सांगते. ‘बाजीराव मस्तानी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुजविण सख्या रे’ या एकापाठोपाठ एक मालिकांतून जुईचा चेहरा दिसू लागला, तर पुढे ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील ‘कल्याणी’ हे पात्र महाराष्ट्रभर चांगलंच गाजलं. कलर्स मराठीवरील ‘सरस्वती’ या मालिकेतूनही जुईने रसिक मनावर मोहिनी घातली.
राम गणेश गडकरींचा इतिहास आणि जुईच्या त्याकाळी सुरू असलेल्या मालिका हे लक्षात घेऊन आम्ही जुईचं पारंपरिक वेशभूषेत फोटोशूट करायचं ठरवलं. यासाठी लाल रंगाची साडी आम्ही निवडली होती. पारंपरिक वेशभूषा, कपाळावर सजलेली चंद्रकोर टिकली, नाकात पिटुकली नथ, अंबाडय़ावर लगडलेला गजरा, दागिन्यांचा देखणा साज असा मराठमोळा शृंगार केलेल्या जुईचं मोहक रूप मी कॅमेराबद्ध करत होतो.
पोर्ट्रेट टिपताना त्या व्यक्तीची चांगली बाजू, डोळ्यातली चमक आणि चेहऱयावरचे भाव हे प्रत्येक वेळी महत्त्वाचं असतं. अनेकदा ही आपली बाजू कलाकारांना माहीत असते, तर काही वेळा व्यक्तीचा चेहरा बघताच क्षणी छायाचित्रकाराला त्या व्यक्तीच्या प्रिफरेबल साईडचा अंदाज येतो. जुईच्याही बाबतीत जुईची एक बाजू फोटोसाठी जास्त चांगली आहे. जुईचे फोटो टिपत असताना जुईच्या स्मितहास्यामुळे तिच्या गालावर हलकीशी खळी पडत असल्याचं मला ध्यानात आलं, तर तिच्या डोळ्यांजवळही दोन नैसर्गिक रेषा असल्याचं मला लक्षात आलं. हीच बाब हेरून जुईचा प्राधान्य असलेल्या बाजूने फोटो टिपायचे मी ठरवलं. जुईचे मोहक स्मितहास्य यावेळी मला कॅमेराबद्ध करता आलं.
जुईचे अनेकदा पारंपरिक वेशभूषेत छायाचित्र टिपल्यानंतर साधारण वर्षभराने तिचं एका मॉडर्न लूकमध्ये फोटोशूट करायचं आम्ही ठरवलं. तिचा हा लुक कुठे अनैसर्गिक वाटणार नाही ना, तसंच तिची प्रतिमा यातून वेगळी निर्माण नाही ना होणार याची काळजी आम्ही घेतली. पहिल्या शूटसाठी हिरव्या रंगाचा वन पीस तिने परिधान केला. या कॉस्च्यूमची गरज असलेली वेशभूषा आणि मेकअप आम्ही करून घेतला.
जुईला काही वेगळे कॉस्च्यूम दाखवले, त्यावरचा लूक सांगितला. काही फोटोंचे रेफरन्स दाखवले. जुईला शूट करायची इच्छा होती, परंतु तिची मानसिक तयारी नव्हती हे तिच्या देहबोलीतून समजत होतं. शूटला ती तयार होती, सांगेल तशी पोजेस देत होती, परंतु चेहऱयावर चिंतेचे भाव होते. जुईला यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही काही काळ शूट थांबवलं. कॅमेरा बाजूला ठेवून तिच्याशी बोलून, गप्पा मारून तिला थोडं फ्री करून आम्ही पुन्हा फोटोशूटला सुरुवात केली. नंतर आमच्या समोर आली ती बिनधास्त वावरणारी, मॉडर्न लूकमधली, नेहमीच्या चेहऱयापेक्षा वेगळी, ग्लॅमरस जुई. तिचे वेगवेगळ्या कॉस्च्यूममध्ये नंतर आम्ही शूट केलं. जुई हळूहळू अधिक खुलत गेली आणि मला तिचे हवे तसे फोटो मिळत गेले. जुईचे नंतर काही काळ्या रंगाच्या वन पीसमध्ये आम्ही फोटोशूट केले. या फोटोत ती अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस वाटत होती.
चौकटीत राहून आपला पिढीजात मराठी बाणा जपणारी जुई पारंपरिक वेशभूषेत सुंदर दिसतेच, परंतु आजच्या युगात स्वच्छंद वावरणारी मॉडर्न जुईदेखील कॅमेऱयात तितकीच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू शकते हे तिने सिद्ध केलंय. कलाकाराला त्याच्या चेहऱयावर रंग घेऊन वावरताना त्याच्या वैयक्तिक मतापेक्षा त्या रंगांना न्याय देण्यासाठी नेहमी धडपड करावी लागते. ही धडपड अनुभव आणि अभ्यासाच्याच जोरावर करता येऊ शकते हे जुईशी बोलताना, शूट करताना जाणवतं.
धनेश पाटील
Leave a Reply