आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी ही कविता शाळेत असताना बाईंनी शिकवली होती पुढे वरच्या वर्गात गेल्या वर प्रेम स्वरुप आई वाच्यल्यसिंधू आई अशी आणखीन एक कविता शिकवली होती आणि त्या वेळी सगळ्यांना रडायला आले होते. पण एकओळ कायम लक्षात राहील अशी आहे. मी खूप वेळा जपनाम लिहिले होते आणि त्या वह्या मोठ्या मुलीकडे देत होते. आणि आज सकाळी तिचा एक मेसेज व फोटो आला होता की तुझी जपनामाची वही मी माझ्या शाळेत एक सरस्वतीची मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे तेव्हा तिथेच ती वही पण जशी आपण वास्तुशांतीला वास्तू पुरुषाची प्रतिमेचे करतो तसेच. आणि लिहिले होते की तुझ्या जपनामाच्या पायावर माझी शाळा उभी राहिली आहे त्यामुळे मुलांना रोजच श्री रामाचा आशीर्वाद मिळणार आहेत. आणि आठवले ते रामायण. एवढा मोठा समुद्र पार करणे आवश्यक होते पण शक्य नव्हते म्हणून श्री राम असे म्हणत एकेक वानरसैनिक ती शीळा पाण्यात टाकत असत. आणि या भक्तीने एक मोठा सेतू तयार करून ते रावणाच्या राज्यात जाऊन विजय मिळवून आले होते. खर तर जड वस्तू कधीच पाण्यावर तरंगत नाही मग एवढ्या शीळा कश्या काय तंरगल्या? अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दोन मुली पदरात घर चालवणे अवघड होते पण लेक हरली नाही उलट चार मुलांना घरात जमवून शिकवणी घेत घेत प्रचंड मेहनत व जिद्दीने आयुष्यातील बरीच वर्षे गेली. आणि आता एक अद्यावत परिपूर्ण सोयीची खूप मोठी शाळा ग्रामीण भागात बांधली आहे…..
पहिलं मूल जेव्हा पहिल्यांदा आई हा शब्द उच्चारला की काय आणि किती वाटतं हे शब्दात व्यक्त करता येत नाही. आणि पुढे चालून घरात दोन तीन भावंड जन्माला आली की आई आईचा गजर सुरू होतो. कधी कधी कामात असताना. कुणाशी तरी बोलताना. वाचताना वा लिहितात वगैरे वेळी आई आई करत आली की राग येतो काय रे आई आई करता सारखे. तुमची कामे तुम्हाला करता येत नाहीत का? मी किती दिवस पुरणार आहे. थोड्या वेळाने वाईट वाटते. आता मुलगी सासरी गेली की चैन पडत नाही. पूर्वी पत्र यायची. प्रिय सौ आईस. आणि शेवटी तुझीच… आणि आईच्या हृदयात कालवाकालव होते. आणि आता तर फोन वर हॅलो आई असा आवाज ऐकला की डोळ्यासमोर लेक उभी राहते आणि डोळ्यातून पाणी येतं….. पण मुलगा लग्न झाले की आई हा शब्द विसरून जातो की काय कुणास ठाऊक. प्रेमाच पाणी पुढेच वाहणार आणि तरीही हे माहित असूनही किमान एकदा तरी त्याच्या तोंडून आई हे ऐकायला जीव आतूर झालेला असतोच. आणि आई ही कविता आता समजते. पशुपक्ष्यांच्या आईच्या मायेची उदाहरणे दिली होती कवितेत ती आठवली. आणि ज्या एका ओळीत मी अडकले होते ती ओळ आहे.
घे जन्म तूही फिरुनी येईन मीही पोटी. खोटी ठरो न देवा ही एक आस मोठी असे काही तरी होते. लेकी च्या शाळेतील ही विद्यार्थी सेना रोज सरस्वतीच्या पाया पडतील तेव्हा राम नामाची वही त्यांना नक्कीच यश देणार हे मात्र खरं आहे……
म्हणूनच मी आता त्या ओळीत बदल केला आहे तो असा..
घे जन्म तू फिरोनी अनु माझ्याच पोटी.
खोटी ठरो न देवा ही एक आस मोठी..
जय श्री राम.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply