अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मध्ये मोहन वर्दे यांनी लिहिलेला हा लेख
आज माझे वय जवळजवळ ८३ आहे.त्यामुळे माझ्या बालपणीची पहिली तीन-चार वर्षे सोडली पाहिजेत. तेव्हाच काही आठवणं शक्यच नाही. तर एकूण ८० वर्षातल्या काही ठळक आठवणी. मी लेखक नाही तेव्हा मला मुद्देसूद वगैरे लिहायची सवय नाही.
माझ्या बालपणीचा काळ १९४० ते १९४८ हा होता. आम्ही एकूण पाच भावंडे होतो. मला दोन मोठे भाऊ व दोन मोठ्या बहिणी. मी शेंडेफळ. माझा सर्वांत मोठा भाऊ माझ्यापेक्षा तीसएक वर्षांनी तरी मोठा असेल.
घरची फारशी श्रीमंती नसली तरी आईवडिलांनी आम्हाला कधी काही कमी पडू दिले नाही. त्यातील एक सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जी मला सतत प्रखरपणे जाणवते ती अशी की शिवाजी पार्क येथे माझ्या वडिलांनी घर बांधले. आज आम्ही स्वत:च्या घरात राहतो.
आमच्या घरासमोर मोठं शिवाजी पार्कचे मैदान. त्यामुळे मला लहानपणापासूनच उघड्यावर फिरायला, खेळायला जाण्याची सवय. माझा मोठा भाऊ सर्व खेळात अग्रेसर असल्यामुळे की काय मला अगदी लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची आवड होती. क्रिकेट हा एक पाश्चिमात्य खेळ सोडला तर आपले इथले खेळ म्हणजे, पकडापकडी, चोर शिपाई, लगोरी, विटी-दांडू, लंगडी, गोट्या वगैरे जोरात चालायच्या. आजच्यासारखे टी.व्ही. किंवा कॉम्प्यूटर गेम्ससारखे एका जागेवर बसून खेळायचे खेळ नव्हते. आलेही नव्हते. म्हणून आमची तब्येत धडधाकट असायची.
त्या काळी सर्व रस्त्यांवर गॅसचे दिवे असायचे. संध्याकाळ झाली की एक माणूस लांब उंच काठी घेऊन दिवे पेटवायचा. आमच्या घरी देखील गॅस (बॉम्बे गॅस वर्कस्) च्या चुली व पाण्याचा गीझर होता. त्या वेळी शिवाजी पार्कवर थोडी घरं बांधलेली होती. बाकीचे प्लॉट रिकामे होते व जी घरे बांधलेली होती त्यातली अर्धी रिकामी होती. जागोजागी ‘जागा भाड्याने देणे आहे’ अशा पाट्या असायच्या. आता हे आठवले की गंमत वाटते.
आमचे घर दोन मजली. मात्र घर पूर्ण भरलेले. त्यात दोन भाडेकरू, वडिलांचे भाऊ म्हणजे आमचे काका, त्यांचे कुटुंब व आमचे कुटुंब असे सर्व राहत असू.
त्या काळात संध्याकाळ झाली की एकदम शांत आणि तिथे चालायला भीती वाटायची असा निर्मनुष्य रस्ता असायचा. आजुबाजूला वाड्या, विहिरी, त्या वाड्यांमधून गँग्ज असायच्या. त्यांच्यात सतत भांडणे होत असत. अशा वातावरणात मी लहानाचा मोठा झालो.
मी लहान म्हणजे तीन वर्षांचा असताना, एका शाळेचे मास्तर श्री. दादासाहेब रेगे माझ्या वडिलांकडे येत असत. त्यांच्यात चर्चा चाले, अशी की या भागात एक लहान मुलामुलींची शाळा बांधावी. त्या चर्चेतून पुढे आमच्या बाजूच्या घरात तळमजल्यावर शाळा सुरू झाली. तीच प्रसिद्ध पावलेली आजची ‘बालमोहन विद्यामंदिर’ ही शाळा.
श्री. दादा रेगे यांचा माझ्या वयाचा श्रीपाद नावाचा मुलगा होता. तो माझा मित्र होता. आज तो हयात नाही. तो बाळ नावाने ओळखला जायचा. आम्ही दोघे त्या नवीन शाळेचे पहिले विद्यार्थी. आणि म्हणूनच शाळेचे नाव ‘बालमोहन’ असे देण्यात आले.
अशा वातावरणात मला मात्र खेळाची खूप आवड निर्माण झाली. आम्ही सर्व प्रकारचे खेळ खेळत असू. काही वर्षे शिवाजी पार्कमध्ये ‘राष्ट्रसेवा दल’ भरत असे तिथेही मी बरीच वर्षे जात असे.
माझ्या सर्वांत मोठ्या भावाने म्हणजे भाईने मला स्वत:च्या मुलासारखे वाढवले. वहिनीनेही खूप लाड केले. माझ्या सर्वांत मोठ्या बहिणीने माझ्या अभ्यासाची खूप जबाबदारी घेतली. खूप काळजी घेतली. मी उनाडक्या करायचो त्यामुळे अभ्यासात असा तसाच होतो व जे काही पुढच्या आयुष्यात घडून कमर्शियली सक्सेसफुल’ झालो त्याचे श्रेय त्या माझ्या मोठ्या बहिणीला व वडिलांना. त्यांनी मला खूप शिकवले. मुख्यत्वे इंग्लिश बोलायला व लिहायला. कारण मी मराठी माध्यमातून शिकलो होतो. कालांतराने माझ्या सासऱ्यांनी माझी उद्योगपती बिर्लांशी ओळख करून दिली. त्यांची सर्व बिर्ला कुटुंबियांची खूप जवळची मैत्री होती. बिर्ला कुटुंबीय माझ्या सासऱ्यांना पुष्कळ मानत असत. तेथून पुढे मी बिर्ला कंपनीत लागलो व हळूहळू माझी प्रगती झाली. मी यशाच्या पायऱ्या चढू लागलो. माझे वडील आणि सासरे या माझ्या आयुष्यातल्या वडिलधाऱ्या व्यक्तींनी मला खूप काही शिकवले माझ्या नकळत मी त्यांच्यापासून जीवनाचे धडे घेतले. समोरच्या माणसाला, मग तो लहान असो की मोठा, त्याला कसा मान द्यावा, विनम्रतेने कसे वागावे एवढेच नाही तर प्रांजळपणा आणि साधेपणा कसा बाळगावा हे शिकवले.
माझ्या लहानपणची आणखी एक आठवण म्हणजे जेव्हा १९४२ ची स्वातंत्र्य चळवळ सुरू होती तेव्हा इंग्रजांच्या हाताखालचे पोलीस व स्वतः गोरे इंग्लिश पोलीस रस्त्यावरून गस्त घालायचे.
आम्हा मुलांना त्यांची भीती वाटायची.
असे करता करता १९४७ साली १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळचा जल्लोष अजून आठवतो. माझ्या मोठ्या भावाने मला व घरातल्या सर्वांना मुंबईत फिरवून रोषणाई दाखवली होती.
असे काही रोमहर्षक व भावपूर्ण प्रसंग मी माझ्या लहानपणी अनुभवले. माझी जीवनविषयक जाणीव समृद्ध झाली.
–मोहन वर्दे
सिनीअर व्हाइस प्रेसिडेंट – रिलायन्स (निवृत्त)
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)
Leave a Reply