अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मध्ये नितीन निगडे यांनी लिहिलेला हा लेख
खरेच छान दिवस होते बालपणीचे, पोषक वातावरणही त्या जोडीला मला लाभले. मौजमस्ती, गमती जमती याला मिळालेली भरभक्कम अशी चांगल्या संस्कारांची मजबूत पायरी. अशा सर्व जमेच्या बाजू असणाऱ्या बऱ्याच आठवणी या लिखाणाच्या निमित्ताने एकेक करून समोर दिसू लागल्या.
दुसरीच्या वर्गात असताना मला वाल्या कोळ्याची गोष्ट दुसऱ्यांना सांगायला खूप आवडायचे. त्यामुळे घरी कोणी पाहुणे आले की त्यांच्यासमोर हातवारे करून ती गोष्ट सांगितली की कौतुकही होत असे. असेच कुणीतरी घरच्यांना गणेशोत्सवात गोष्ट सांगायच्या स्पर्धेत भाग घ्यायला याला पाठवा म्हणून सुचवले. लगेच दुपारी ऑडिशनसाठी मला नेले. गोष्टीचा एकच परिच्छेद सरुवातीला आवेशात सादर केला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्पर्धेसाठी नाव नोंदवून घेतले.
दुपारी शाळेतून आल्यावर जेवून दुपारी झोप घेण्याचा एक नित्यक्रम असे. संध्याकाळी साडेचार-पाचच्या सुमारास कुणीतरी झोपेतून उठवले आणि तुला गणपतीसमोर गोष्ट सांगायची आहे हे सांगितले. डोळे चोळत, तोंडावर पाणी मारून बऱ्यापैकी कपडे घालून मी मोठ्या भावंडांसोबत मैदानावर गणपतीच्या बाजूच्या स्टेजजवळ पोहोचलो. माझा नंबर आल्यावर माझे नाव पुकारले गेले.
पहिल्यांदा स्टेजच्या मध्यावर मी माईकसमोर उभा राहून समोरच्या मोठ्या गर्दीकडे पाहात थोडा घाबरलो. तेवढ्यात ‘हं सुरू कर!’ असा मागून कुणाचा तरी आवाज आला. आणि… नेहमीच्या आवेशात मी गोष्ट सांगायला सुरूवात केली. मला नीटसं नाही आठवत की मी नक्की गोष्ट सांगितली कशी? पण समोरच्या लोकांच्या टाळ्या, हंशा, वाहवा या मात्र ठराविक वाक्याला मिळत होत्या आणि माईकवरून येणारा माझा आवाज मलाच काहीतरी वेगळा भासू लागला. त्यामळे एकदम जोशात मी कथा सांगून खाली उतरलो. कुणीतरी मला उचलून अलगद बाजूला वाट करत घरी पण आणून सोडले. नंतरचे दोन तीन दिवस चाळीच्या परिसरात माझे कौतुकही झाले. पण…
गणेशोत्सवाच्या त्या स्पर्धेत मला बक्षीस काही मिळाले नाही. असे काही केल्यावर आपल्याला बक्षितरूपात काही मिळते याची जाणीव मला पहिल्यांदा त्यावेळेस झाली. तरी बक्षीस तुला नाही मिळाले तरी तुझे सादरीकरण सर्व प्रेक्षकांना खूप आवडले आहे असे मला पालकांनी सांगितले आणि त्याबद्दल एक छानसा टी-शर्ट मला घेऊन दिला.
नंतरच्या प्रवासात खूप पारितोषिके प्राप्त झाली परंतु या टी-शर्टच्या बक्षिसाची बरोबरी कशासोबतही नाही होऊ शकली.
संध्याकाळी साधारणत: शाळेतून आल्यावर सोसायटीच्या आवारात आम्ही लहान मुले काही खेळ खेळायचो. खूप मजा यायची. ठाण्यातील आमच्या सदिच्छा सोसायटीच्या आसपास
त्यावेळी खूप मोकळी जागा होती. एक मातीचा लहानसा रस्ता मिठागराकडे आणि दुसरा डांबरी रस्ता कस्टमच्या खाडीलगतच्या मैदानाकडे जात असे. बरेचदा सोसायटीमधील दलाल काका त्यांच्या ऑफिसच्या जीपमधून आमच्या खेळायच्या वेळेच्या दरम्यान यायचे.
सोसायटीच्या गेटजवळ गाडी यू टर्न करायला अपुरी जागा असल्याने जीपचे ड्रायव्हर मोरे काका जीप कस्टमच्या मैदानावर नेऊन परत येत असत. त्या यू टर्न घेऊन येणाऱ्या रिटर्न फेरीसाठी आम्ही सर्व मुले त्या दलालकाकांच्या महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या त्या हिरव्या पांढऱ्या जीपमधून तीन ते चार मिनिटांची फेरी मारून येत असू. कमीत कमी पंधरा एकजण असे आम्ही त्या बंद जीपमध्ये कोंबून घेत असू. पण आरडाओरडा करत मोठ्या उत्साहात चंद्रावर जाऊन आल्याच्या जोशात परत सोसायटीच्या कंपाऊंडजवळ मोरेकाका आम्हाला सोडत असत. स्वतः दलालकाका ड्राईव्ह करायला कधीतरी बसायचे. खूप अविस्मरणीय आणि खूप आनंददायी असा तो तीन ते चार मिनिटांचा प्रवास असायचा…
काळाच्या ओघात सगळे बदलत गेले. आम्ही मुले मोठी झालो. खऱ्या अर्थाने सोसायटीबाहेरच्या जगात पंख विस्तारायला निघालो. दुसऱ्या शहरात स्थायिक झालो. स्वतःची दुचाकी, चारचाकी वाहने वापरू लागलो. खूप लांबवरचे प्रवास कामानिमित्ताने जगाच्या पाठीवर झाले.
पण आज स्वत:कडे कितीही चांगले वाहन असले तरी काकांच्या त्या जीपमधून अवघ्या तीन ते चार मिनिटांचा फुल ऑन धमाल आणि हसत खेळत केलेला प्रवास तिथल्या मातीत राहिलेल्या चाकांच्या खुणांसारखा कायम मनात राहिला आहे.
––नितीन निगडे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)
Leave a Reply