अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मध्ये रविंद्र मांडे यांनी लिहिलेला हा लेख
पप्पा नाही म्हणायला मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे म्हणून यशस्वी माघार घेतात. हा गमतीचा भाग सोडला तरी श्रावण सर्वांना वेड लावतो. तसेच अध्यात्मिक रेसिपी अलगच… २४ X ७ सोमवार ते रविवार अखंड व्रतवैकल्ये, देवी देवता, त्यांची वाहने यांचे यथासांग भजन पूजन याचीही रेलचेल.
माझे लहानपण तालुका, पण खेडेवजा ठिकाणी गेले. गावात नगरपालिकेच्या पहिले ते सातवी मराठी शाळा. तो काळ साधारण १९५५-५६ चा होता. पावसाळ्यात शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. त्यात एक नाटिका अशी होती की, जंगलातील सर्व पशुपक्ष्यांना असे वाटते की आपणच इतरांपेक्षा श्रेष्ठ. मला मोर पिसारा फुगवून काळे मेघ आकाशात दिसायला लागल्यावर तल्लीन होऊन नाचत आहे अशी भूमिका रंगमंचावर करायची होती. रंगीत तालमी झाल्या. सगळ्यांकडून त्या त्या भूमिकांची कसून तयारी करून घेतली होती. तो दिवस उगवला. मला नाडीच्या चड्डीला मोराचा पिसारा बांधून दिला होता. मी माझ्या भूमिकेची वाट बघत तयारीत बसलो होतो. पण अगोदरच्या मुलीने छान नाच केल्याने तिला वन्समोअर मिळाला. असा बराच वेळ गेल्याने मी बालसुलभ कंटाळून गेलो. मात्र एकदाचा माझ्या नावाचा पुकारा झाला. प्रथमच रंगमंचावर जायची वेळ असल्याने छातीत धडधडायला लागले. विंगेत बराच वेळ बसायला लागल्याने बांधलेला पिसारा ढिला झाला होता. मी थरथरत कसातरी नाच सुरू केला पण काही मिनिटात पिसारा चड्डीसह खाली घसरला, याचे मला भानच नव्हते. पण प्रेक्षकांची हसून हसून मुरकुंडी वळली होती. मात्र लगेच शिक्षकांनी मला विंगेत नेले. जामानिमा नीट करून देऊन धीर दिला. मी पुन्हा रंगमंचावर जाऊन छान नाच केला. नंतर उत्तेजनार्थ बक्षीसही मिळाले. ही श्रावणातील आठवण मी कधीच विसरणार नाही.
आणखी कितीतरी करामती हा श्रावण करत असतो. यात मांसाहार वर्ज्य, अपेयपान तोबा तोबा. यामुळे कितीतरी प्राण्यांचे प्राण वाचतात. अपेयपानापायी काही घरात चूल पेटत नाही. मुलाबाळांना धड अन्न, वस्त्र, निवारा मिळत नाही, त्यांना थोडा का होईना दिलासा मिळतो घरच्या माऊलीची मारहाण थांबते असा हा श्रावण गरीबांना पावतो. रईसाला वैभवाचे प्रदर्शन व श्रीमंतीचे औदार्य दाखविण्यासाठी पुरेपूर वाव दान/वाण देणे या माध्यमातून संधी देत असतो.
या श्रावणाचा लँड स्केप विस्तीर्ण. त्याने या चराचराचे कौतुक आपल्या कवेत सहज सामावून घेतले आहे. तो सामाजिक, आर्थिक, नैतिक, आध्यात्मिक क्षेत्रांत लीलया संचार करतो. तसेच चतुर्थाश्रमाच्या अवकाशालाही व्यापून. श्री विष्णुसारखा दशांगुळे उरतो. मात्र त्यांनी या तत्सम भितीने जे केले त्यामुळे जगाचे कल्याणच झाले आहे. उदा. प्रल्हादाने पित्याचा बिभीषणाने बंधूचा. गोपींनी भ्रतार त्याग केला ते मंगलमय ठरले.
बरं या श्रावणाने किती जणांच्या प्रतिभेला धुमारे फोडले आहेत. ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’, ‘सांग सांग भोलानाथ’ ही बालगोपाळांसाठी सहज गेयता असलेली अप्रतिम रचना, ‘रिमझीम रिमझीम पडे सारखा’ ‘गेला मोहन कुणीकडे’ यात मोहन आणि पाऊस दोघेही खट्याळ वात्रट. ‘रीम झिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात’, प्रियावीण उदास वाटे रात ही विरहिणीची व्यथा, ‘नभ मेघांनी आक्रमिले तारांगण सर्वही झाकून गेले’ संगीत सौभद्र, ‘पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच मज जाग आली’ कवी ग्रेस, असे हे कौतुक सांगायला शब्द व कागद पुरणार नाहीत. मात्र जाता एका अनामिक कवीने पावसाचा केला शृंगार ही अफलातून कल्पना शब्दबद्ध केली आहे ती येणे प्रमाणे:
‘सहज सुचले म्हणून’ कोणीतरी तावातावाने बोलताना अगदी पटकन ठेवणीतले वाक्य फेकतो “मी खूप पावसाळे बघितले आहेत, तू माझ्यापुढे अगदी बच्चा आहेस. जास्त हुषारी करू नकोस.’ मग मनात विचार येतो किती पावसाळे म्हणजे नेमके काय ही? मग त्याची अर्थसंगती लावता लावता असे लक्षात येते की पावसाळ्याचे खरे वैभव म्हणजे ‘श्रावणात घन निळा बरसल्या, बरसती रेशीम धारा’ यात सामावलेले आहे. आणखी कल्पनाशक्तीला ताण दिला की या नटखट श्रावणाचे रहस्य उलगडत जाते. तथापि, खरे असे आहे की, आपल्याला आतापर्यंत हिमनगाचे टोकच गवसले. इतका अथांग आशयाचा आहे तो हा श्रावण म्हणजे विलक्षण खेळिया, त्याच्याकडे मोहिनी अशीच आहे. त्याने तो आबालवृद्धांना या सृष्टीतील पंचमहाभूतांना सहज भुरळ घालतो. याने आपले कोडकौतुक अनेक दिग्गजांकडून करून घेतले आहे. अहो श्रीमाऊलींना सोडले नाही. बालगोपाळांसाठी कधी हा ‘ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा’ असे म्हणायला लावतो. बरं चलाखी ही की तो पैसाही आपणच खोटा ठरवतो. बालगोपाळांचा सर्वांत आवडता गोपाळकाला, दहीहंडी यातील धुमशान, बाल तारुण्य सुलभ दंगा. थरावर थर याचा थरथराट. हे श्रावणातच.
शैशवातील राजकुमार/राजकुमारींना ‘बघा हा या विश्वाचे कौतुक न्यारे’ या थाटात तारुण्याची चाहूल, वाट अलगद नकळत दाखवतो. नवपरिणीतांना तारूण्याचे रहस्य ‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले.’ त्यातच या विषयाचे रहस्य कळले तुझिया मिठीत असे सांगायला कचरत नाही. मंगळागौरीची तर गंमत न्यारी. माहेरवाशिणींची हक्काची. हा तर लाजतमुरडत मनाला मोहित करणारा सोहळा की ज्यात जिवलग सख्या, त्यांच्या समवेतच्या गोड आठवणी, थोडासा वात्रट/खट्याळपणा आणखी काय काय याची गणतीच नाही. मग लाजून लाजून चूर व्हायलाही आवडते. याही पुढे एखाद्या पहिलटकरणीचे झोपाळ्यावरील डोहाळेजेवण. ज्यात आई होण्याची अनिवार ओढ जी शब्दातीत. सांगता येत नाही. ती फक्त जाणीवेत नेणीवेत असते. त्याचबरोबर सर्वकाही व्यवस्थित होईल ना याची एक अनामिक भीती तिच्या मनात दाटून येते. त्याचवेळी आपली माणसे, त्यातही जिवलग सखा की विश्वासाने ज्याच्या खांद्यावर मान टाकावी असा साताजन्माचा सोबती समवेत असताना मी एकटी नाही याची खात्री पटते व मनाला नवीनच उभारी मिळते.
बरं हे झालं नव्या नव्हाळीचे. मग प्रौढांनी काय करायचे हो! ‘मौसम है आशिकाना’ असं म्हणत ही मंडळी वर्षासहल या गोंडस नावाखाली तुरू तुरू सेकंड हनिमून साजरा करायला पसार होतात.
म्हातारानू इतका या साठीच्या पुढच्या जमाती अजूनही यौवनात मी असे म्हणून श्रावण सोहळ्यात शड्डू ठोकून उतरतात खरे पण जाऊ द्या झाले. जो तो त्याचे बघून घेईल.
-–रविंद्र मांडे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)
Leave a Reply