रवी जाधव… आजचा आघाडीचा चित्रपट दिग्दर्शक… पण त्याच्या जडणघडणीत भक्कम असलेला त्याच्या कलेचा पाया महत्त्वाचा ठरतो…
न्यूड’ नावाचा सिनेमा घेऊन आलेल्या रवी जाधवला अनेक प्रसंगांना, विरोधाला सामोरं जावं लागलं होत. या सिनेमाला ४८ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी) वगळण्यात आल्यानंतर वादाला तोंड फुटलं आणि या मुद्यावरून सेंसॉर बोर्ड आणि सरकारवर जोरदार टीकाही झाली. यानंतर ‘न्यूड’ सिनेमाबद्दल कुतूहल निर्माण झालं असतानाच सेंसॉर बोर्डाने चित्रपटात कोणताही कट न सुचवता चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र दिलं आणि या सिनेमाच्या प्रसिद्धीचा मार्ग मोकळा झाला. सिनेमा गेल्या आठवडय़ात रिलीज झाला आणि वेगळा सेन्सेटिव्ह विषय जो बॉलीवूडमध्येही हाताळला गेला नाही असा विषय रवीने मराठीत हाताळला याबद्दल त्याचं सर्वच स्तरांतून कौतुक झालं. जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्चा विद्यार्थी असलेल्या रवीनं कलाकृतींमध्ये अश्लीलता नव्हे तर कलात्मकताच दाखवण्याचा आजवर प्रयत्न केल्याचं चित्र त्याच्या सर्वच सिनेमांकडे नजर टाकल्यास बघायला मिळेल. सहसा न हाताळले गेलेले सिनेमाचे विषय हाताळण्यात हातखंडा असलेल्या रवीचं आणि जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्, रंग, कला आणि कटिंग चहा यांचं एक वेगळंच अल्लड नातं असल्याचं त्याच्याशी बोलताना नेहमीच जाणवतं.
‘टाइमपास’, ‘बालक पालक’ या मराठी सिनेमांनी केवळ राज्यातच नव्हे तर देश-परदेशातल्या सिनेरसिकांवर आपली भुरळ घालत कोटय़वधी रुपयांचा गल्ला जमवला. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘टाइमपास’, ‘बालक पालक’, ‘बेंजो’ या तगडय़ा सिनेमांच्या अनुभवाच्या जोरावर रवीने मराठीत ‘न्यूड’ नावाचा सिनेमा तयार करण्याचं शिवधनुष्य पेलेललं. आपल्या दिग्दर्शनात सातत्य राखत विक्रमांचे अनेक थर रचून मराठी सिनेसृष्टीत नवी क्रांती घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणून रवीकडे पाहिलं जातं.
रवी जाधव हा मूळचा डोंबिवलीचा. मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेला गिरणी कामगाराचा मुलगा. घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी डोंबिवलीत घरोघरी जाऊन पेपर टाकण्याचं काम रवीने काही दिवस केलं. घरच्यांच्या इच्छेखातर रवीने बारावी विज्ञान शाखेचा अभ्यासही केला खरा, मात्र त्याची ओढ कलेकडे होती. कलेचं शिक्षण घ्यावं असं रवीला सारखं वाटत असतानाच त्याला मुंबापुरीतल्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्बद्दल समजलं आणि इथे शिकण्याचा ध्यासच त्याने घेतला. याच ध्यासापायी रवीने व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि ग्राफिक डिजाईन या पदवीवर आपलं नाव कोरलं. या पदवीच्या जोरावर एका टेक्स्टाइल कंपनीत नोकरीदेखील पटकावली आणि इथेच त्याची नाळ रंगाशी जोडली गेली. टेक्स्टाईल कंपनीतल्या रंगांनी रवीवर भुरळ पाडली. रंगवेडय़ा रवीने सुरुवातीला जाहिरात क्षेत्रात काही दिवस काम केलं. नंतर क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून काम करत असताना रवीने कॉपी एडिटर यासाठीचे अनेक पुरस्कार पटकावले. रवीच्या हातून तब्बल साठहून अधिक जाहिरातींची निर्मिती झाली. याच काळात रवीने एका नामांकित जाहीरात कंपनीचं ऑस्ट्रेलिया ते साऊथ आफ्रिका एवढय़ा अवाढव्य परिसराचं नेतृत्व केलं हे विशेष. परिस्थितीला बळी न पडता नेहमी काहीतरी शिकण्याची उमेद रवीमध्ये लहानपणापासून होती. हीच उमेद कायम राखत रवीने जाहिरात क्षेत्रात यशाच्या उच्च शिखरावर असूनही सिनेमा क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि मराठी इंडस्ट्रीला एक अभ्यासू दिग्दर्शक मिळाला.
सर जेजे महाविद्यालयात असताना रवीचं आणि कटिंग चहाचं एक अल्लड नातं असल्याचं तो नेहमी सांगतो. किंबहुना त्याही आधी डोंबिवलीत घरोघरी पेपर टाकणाऱया रवीसाठी टपरीवरचा कटिंग चहा हाच त्याच्यासाठी त्याचं एकवेळचं जेवण होतं आणि म्हणूनच रवीच्या भावनिक आयुष्यात या कटिंग चहाच एक वेगळं नातं आहे. रवीची हीच भावनिक बाजू हेरून त्याचं एक वेगळं फोटोशूट करण्याचं आम्ही निश्चित केलं.
चहाच्या टपरीवर फोटोशूट करण्याचं आम्ही निश्चित केल्यानंतर सकाळी लवकर आम्ही त्याच्या राहत्या घराजवळच्या चहाच्या टपरीवर गेलो. रवीच्या हातात अर्धा भरलेला चहाचा ग्लास घेऊन आम्ही शूटला सुरुवात केली. शूटच्यावेळी रवी हा माझा सब्जेक्ट होता तर चहाची टपरी ही बॅकग्राऊंड. या दोन गोष्टी मला मिळाल्या होत्या मात्र तिसऱया म्हणजेच फोरग्राऊंडच्या शोधात मी होतो. माझ्यात आणि रवीमध्ये साधारणपणे बारा-पंधरा फुटांचं- रस्त्याच्या लांबीचं- अंतर होतं. मला प्रतीक्षा होती ती या रस्त्यावरून येणाऱया एखाद्या गाडीची. ही गाडी माझ्यासाठी फोरग्राऊंड ठरणार होती. मी १८०-एमएमच्या मायक्रो लेन्सने रवीचं हे पोट्रेट टिपण्याचा प्रयत्न करत होतो. मायक्रो लेन्स ही शार्प फोकससाठी ओळखली जाते आणि म्हणूनच चांगले फोटोग्राफर्सही या लेन्सने पोट्रेट काढत नाहीत. जरा का फोकस चुकला की संपूर्ण चेहरा ब्लर होण्याची भीती या लेन्समुळे असते.
मी गाडीसाठी वाट बघतोय हे रवीनं हेरलं आणि माझा डोळा कॅमेऱयाला लागला असतानाच रवीने एक ट्रक येतोय याची खूण केली. हा मोठाला ट्रक हळूवारपणे जात असताना सुमारे १२-१५ सेकंद मला समोरचं काहीच दिसत नव्हतं, कारण रवी रस्त्याच्या दुसऱया बाजूला होता. हा ट्रक म्हणजे रंगमंचावर टाकलेला पडदाच जणू. कधी एकदा तो बाजूला होतोय आणि आपल्याला कलाकृती पाहता येईल असं रसिकांना वाटत असतं अगदी तसाच मला या काही क्षणांत वाटत होतं. जसजसा ट्रक पुढे गेला, तसतसं मला त्यामागचं दृश्य दिसू लागलं. माझी कॅमेऱयाची फ्रेम तयार होती, मी वाट बघत होतो की कधी एकदा ट्रक फ्रेमच्या एका बाजूला जातोय आणि मी त्याला फोरग्राऊंड म्हणून घेऊन पोट्रेट टिपतोय. अवघ्या दोन-तीन सेकंदांचा क्षण मला फ्रेमिंगसाठी मिळाला आणि मला रवीच हे सुंदर पोट्रेट त्याच्या सगळ्यात आवडत्या गोष्टीसोबत टिपता आलं.
रवीच्या मते टपरीवरचा अर्धा भरलेला चहाचा ग्लास मोठी शिकवण देणारा आहे. ‘मी या क्षेत्रात अजून फार काही केलेलं नाही. दिग्गजांसोबत माझं नाव जोडलं जाण्यासाठी अजून प्रचंड ताकदीनं काम करायचं आहे. अर्धा भरलेला चहाचा ग्लास हे याचंच प्रतीक आहे.’ चहाचा ग्लासच आणि त्याच नातं रवी उलगडून सांगत होता.
— धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
Leave a Reply