“सकाळ ” उघडला आणि आनंददायी वृत्त वाचले – ” अमेरिकन कवयित्रीला साहित्याचे नोबेल पारितोषिक ! “
चक्क काव्य या साहित्य प्रकाराला सर्वोच्च सन्मान !
मग मनात विचार आला काव्य/साहित्य /कला /नृत्य/ चित्रे/शिल्पे अशा सगळ्याच “निर्मिती ” मुळातूनच प्रतिनिर्मिती असतात. निर्मिती एकच असते- निसर्ग ! आणि निसर्गाचा निर्माता विविध नावा /रूपांनी ओळखला जातो. आख्खा निसर्ग आपण विविध माध्यमांमधून पुनर्निर्मित करीत असतो. लताचे स्वर्गीय सूर आपले रिऍलिटी शोज री क्रिएट करीत असतात. गुरुही आपल्या शिष्यांच्या माध्यमातून स्वतःला पुनर्निर्मित करीत असतो.
मूळ /अस्सल आणि त्याची प्रतिकृती यांच्यात फरक असणारच. प्रतिकृती कितपत मुळांच्या जवळ जाण्यात यशस्वी होतात यांवर आपली दाद किंवा नापसंती अवलंबून असते.
एका पिढीला मूळ घरंदाज ऐकायला / पाहायला / अनुभवायला मिळते आणि तिच्या पुढच्या पिढीला मात्र पुनर्निर्मित आविष्कारांवर तहान भागवावी लागते. अवशेषांवरून मूळ बांधकामांची कल्पना करावी लागते.
चिरंतनाकडे जाण्याची ओढ असावी म्हणजे अस्सल भेटत जातं.
काल वाचलं – ” चांदनी ” चित्रपट री क्रिएट करण्यात आलाय. त्यांत मूळची बबली ” श्रीदेवी “, पारंपरिक प्रियकराची अनुवंशिकता घेऊन आलेला ” ऋषी ” असेल का? ” शिव-हरी ” चं स्वर्गीय आणि नादमधुर संगीत ऐकायला मिळेल कां ? ” मुघले आझम ” आणि “नया दौर ” ची रंगीत रूपे ( काळाची गरज म्हणून तंत्रज्ञान वापरून) री क्रिएट जरूर करण्यात आली. पण मजा नहीं आया !
सकाळी सकाळी उठल्यावर नातीला बासरीवरील एका स्त्री कलावंताची एक पहाडी धून ऐकविली. ती पटकन म्हणाली –
” कृष्ण बाप्पाचीच बासरी जास्त गोड असते. “
सदर लेखन सुचण्याचं आणखी एक कारण – तिचे हे वाक्य !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply