बाबुराव अर्नाळकर यांचा जन्म ९ जून १९०९ ( काहीजण १९०७ असेही म्हणतात ) रोजी झाला. अर्थात ही तारीख ज्योतिषाच्या मदतीने काढलेली आहे. अर्नाळ्याच्या या जबरदस्त लेखकाचं मूळ नाव आहे ‘चंद्रकांत सखाराम चव्हाण. ‘ आईबापाचं छत्र अगदी लहानपणीच हरवल्यामुळं त्यांना मुंबईच्या यावे लागले. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. मुंबईत आल्यावर एका कुटुंबात ते व्हरांड्यात रहात होते. त्या कुटुंबात इंदिरा नावाची मुलगी होती पुढे तिच्याशी त्यांनी विवाह केला. त्याचे शिक्षण आर्यन शाळेत झाले . ते एका ब्रिटिश कंपनीमध्ये कामाला होते. परंतु त्यांना नोकरीत रस नव्हता. मुंबईत एका चष्म्याच्या दुकानातला अनुभव होता. बाबूरावांचे मुंबईतील गिरगावात चष्म्याचे दुकान होते. सुरुवातीला तेथे बसून बाबूराव रहस्यकथा लिहीत. दुकानात चष्मा खरेदी करण्याऐवजी लोक रहस्यकथा लेखक बाबूरावांना पहायला येत. बाबूराव जेपी (जस्टिस ऑफ पीस) होते , ते स्वातंत्र्य सैनिकांच्या संघटनेचेही काम करीत. त्यामुळे त्यांना खूप फोन येत, याचा आणि बाहेरील वर्दळीचा त्रास होऊ लागल्याने ते अनेकदा एखाद्या गुप्त ठिकाणी जाऊन लेखन करीत. वयाच्या ५५ व्या वर्षी बाबूरावांनी चष्म्याचे दुकान बंद केले.
मला आठवतंय गिरगावातल्या त्या दुकानाजवळ कुतूहलाने मी जायचो , कारण तेथे माझे एक नातेवाईक रहात होते , अगदी लहानपणी जायचो त्या छोट्या चष्म्याच्या दुकानाजवळ . तेथे एक व्यक्ती लिहीत बसलेली असे , किंवा त्या दुकानात दिसे. ते लेखक आहेत अशी घरात चर्चा व्हायची परंतु ते बाबुराव अर्नाळकर होते हे मला मागाहून कळले .
गुन्हेगारीची आणि गुन्हेगाराच्या तपासणीची आधुनिक तंत्रंही तिकडेच विकसित झाली आहेत. इतर लेखकही त्याचा उपयोग आपल्या लेखनात करतात. मग एकटय़ा अर्नाळकरना दोष देऊन काय उपयोग? बाबूराव अर्नाळकरांनी आपल्या रहस्यकथांचे स्वरूप अखेपर्यंत निर्भेळ ठेवले. त्यांत कधी जादूटोणा, मंत्रतंत्र, भूतपिशाच्च, परग्रहावरील जीव अशा गोष्टी येऊ दिल्या नाहीत. बाबूरावांचे कथा नायक-नायिका अर्नाळकरांनी त्या वेळी धनंजयमाला, झुंजारमाला, जयहिंदमाला, प्रफुल्लमाला, यौवनमाला अशा माला सुरू करून त्यातून दरमहा पाच-सहा कथा लिहिल्या. धनंजयमालेत डिटेक्टिव्ह धनंजय व त्यांचा मदतनीस छोटू असायचा. झुंजारमालेत झुंजार हा रंगेल उठावगीर असा होता, त्याच्याबरोबर विजया होती. नेताजी हा नोकर पण सहायक होता. काळापहाड आणि पत्नी सुहासिनी असायची. दिवसा उजेडी तोच चंद्रवदन व्हायचा. सामान्य जनतेचे शत्रू असलेल्या बदमाशाला अद्दल घडवून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करायचं. याशिवाय गोलंदाज, कोदंडराव अशी पात्रंही होती. धर्मसिंग हा त्यातील बदमाश, तसेच शेरखान , सुंदरा ही झुंजार विजयाप्रमाणेच एक जोडी, दर्यासागर एक चाचा. आबा दरेकर हे एक बेरकी पात्र. अशा अनेक पात्रे त्यांनी निर्माण केली. त्यांनी पहिली रहस्य कादंबरी वयाच्या ३७ व्या वर्षी १९४६ मध्ये लिहिली. तिचं नाव होतं ‘चौकटची राणी.’ या कादंबरीनं वाचकांना अक्षरश: वेड लावले. त्याच्या काळा पहाड आणि झुंझारने तर माझ्यासारख्या अनेकांचे तरुणपण व्यापून टाकले होते. अर्थात त्या वयाची गरजच होती म्हणण्यापेक्षा त्यांच्या कादंबऱ्यामधील ओघवती भाषा आणि एकापाठोपाठ घडणारे प्रसंग हातातून पुस्तक सोडू देत नव्हते. काही ‘ विचारवंतांनी ‘ नाके मुरडली , अर्थात ह्या मध्ये ‘ समीक्षक ‘ हा वर्गही होता आणि असणारच . बाबुरावांनी १९३६ ते १९८४ या कालखंडात १०९२ रहस्यकथा लिहिल्या. गिनीज बुक मध्ये नोंद झालेले बाबुराव अर्नाळकर हे मराठीमधील पहिले लेखक म्हणावे लागतील. मला आठवतंय जेव्हा बाबुरावांचे नाव ‘ गिनिज बुक ‘ मध्ये आले तेव्हा मी शोधत शोधत त्याच्या पांडुरंगवाडीतील गोरेगावच्या घरी गेलो होतो. तेव्हा आदल्याच दिवशी त्यांचे अभिनंदन करायला सुप्रसिद्ध लेखक जयवंत दळवी येऊन गेले होते. बाबुरावांचे लेखन सगळ्यांनी मान्य केले होते जे उत्तम लेखक आणि उत्तम माणूस होते . बाबुराव हे साडेशहान्नव टक्क्यांचे लेखक होते , साडेतीन टक्क्यांचे लेखक नव्हते आणि त्यांना त्याची पर्वा नव्हती . १४८० च्या वर कादंबऱ्या लिहिणे हा काही जोक नाही . आमची अनेक लेखक मंडळी आत्मचरित्र आणि एकदोन पुस्तकातच जेव्हा संपतात तेव्हा त्याच्या मागे ‘ कसदार साहित्य ‘ याचे बिरुद लागते. बाबुराव मला सांगत होते की, “मी लिहिताना अक्षरशः ‘ परकाया प्रवेश ‘ करायचो.” हा परकाया प्रवेश किती लेखकांना जमतो. फारच कमी लेखकांना जमतो कारण तिथे लेखक संपूर्णपणे त्या कथानकात , व्यक्तिचित्रात एखाद्या कसलेल्या नटाप्रमाणे घुसलेला असतो. बाबुरावांचे वाचक हे १२ वर्षांपासून ते ८०-८५ वर्षापर्यंतचे होते. जर बाबुराव परदेशात जन्माला आले असते तर तिथल्या लोकांनी त्यांना डोकयावर घेतले असते आणि मग आमच्या लोकांनी. बाबुराव म्हणाले, “अनके कादंबऱ्यातून मी मुंबईचे वर्णन करत असे त्यात वाळकेश्वर पासून नेपियन सी पर्यंत अनेक विभागांची नावे असत त्यावेळी गावातून आलेले वाचक त्या विभागात रात्रीच्या वेळी फिरून कुठे काळापहाड , झुंझार दिसतो का ते बघायचे.” अशा अनेक बाबुरावांनी निर्माण केलेल्यांना नायकांना मी काय शेकडो, हजरो , लाखो वाचक भेटले असतील ते त्यांच्या पुस्तकातूनच. अशी पुस्तके म्हणजे खरे तर त्यावेळी वाचनसंस्कृतीचा पाया होता असंच म्हणावे लागेल. ‘ काळा पहाड ‘ हाही झुंजारप्रमाणेच गुप्तहेरगिरीत प्रवीण आहे. तो रबरी तळवे असलेले बूट घालतो. मुखवटा घेऊन वावरतो. धनंजय आणि छोटू हे मारामारी न करता रहस्य उलगडणारे. आश्चर्य म्हणजे, यातील केवळ ‘धनंजय’ च रुपेरी पडद्यावर आला. संगीतकार सी. रामचंद्र यांनी तो सिनेमा बनवला होता. त्या सिनेमात त्यांनीच ‘ धनंजय ‘ चे काम केले होते.
मी जेव्हा बाबुराव अर्नाळकर यांच्याकडे गेलो होतो त्यावेळी त्यांची दृष्टी अधू झालेली होती . जवळजवळ काहीच त्यांना दिसत नव्हते. मी एका मासिकासाठी त्यांची मुलखात घ्यायला गेलो होतो त्यावेळी त्यांचा मुलगा शेखर हा होता . बाबुरावाना मी माझ्या स्वाक्षरीच्या छंदाबद्दल सांगेतले तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाच्या मदतीने एक अभिप्राय लिहून दिला होता आणि त्याखाली त्यांनी स्वाक्षरी केली होती. त्यांना माझा आवाज त्याच्या मानलेल्या मुलासारखा वाटत होता. काही महिन्यांनी मी त्या मासिकात लेख आल्यावर त्याच्या गोरेगावच्या निवासस्थानी गेलो , मी त्याच्याशी बोलू लागलो तेव्हा ते मोठमोठयाने रडू लागले आणि रडता रडता म्हणाले अरे शेखर गेला रे . जवळजवळ पाऊण तास ते माझा हात हातात घेऊन रडत होते. काळापहाड आणि झुंझारचा निर्माता माझ्यासमोर रडत होता मला खूप वाईट वाटत होते , मी त्यांची समजूत घालत होतो. माझ्यामनात विचार आला शेवटी ते माणूसच होते. त्यानंतर का कुणास ठाऊक त्याच्या घरी जाण्याचे मला कधीच धाडस झाले नाही. पूढे ते गेल्यावर मी काही वर्षांनी कल्याणच्या श्री. विभाकर कर्वे यांना भेटलो, त्याच्याकडे बाबुरावांच्या १८०० पुस्तकांचा संग्रह होता. त्यांनी त्यांच्या खूप आठवणी सांगितल्या . मी अनेक पुस्तकांच्या कव्हर्सचे फोटो काढले. विभाकर कर्वे म्हणजे त्यांचे खरे मानसपुत्रच म्हणावे लागतील. त्याचे खरे भक्तच आहेत ते अगदी गिरगावात असल्यापासून त्यांच्याशी त्यांची मैत्री होती. सतीश भावसार यांनी बाबुरावांवर जे पुस्तक काढले आहे त्यासाठी लता मंगेशकर यांनी त्यांना एक पत्र दिले . त्यात त्यांनी लिहिले आहे “रहस्यकथा लेखक बाबूराव अर्नाळकरांबरोबर आम्हा मंगेशकरांचा, खास करून आमची आई ” माई ” हिचा परिचय होता. तिच्यामुळे आम्हा भावंडांना बाबूरावांच्या रहस्यकथा वाचण्याची आवड निर्माण झाली. धनंजय, छोटू, झुंझार, काळा पहाड या रहस्यकथा आम्ही वाचलेल्या आहेत. आपण निर्माण करीत आहात त्या ग्रंथाला आम्हा मंगेशकर भावंडांच्या मनापासून शुभेच्छा!’
बालगंधर्व आजारी असताना बाबूराव अर्नाळकर त्यांना भेटायला माहीमला गेले होते. तेव्हा बालगंधर्व म्हणाले, “माझी सेवा करणारी दोनच माणसे उरली आहेत, एक गोहर आणि दुसरे तुम्ही. मी तुमची पुस्तके वाचतो आणि सगळी दुःखे विसरतो.”
आज बाबुराव आपल्यात नाही परंतु त्यांनी जे निर्माण केले त्याला तोड नाही. बाबुरावांबद्दल एक मोठे पुस्तक बाबुरावांच्या कार्याबद्दल , कादंबऱ्याबद्दल आले आहे. त्यात त्यांचे हस्ताक्षर असते तर बरे वाटले असते. मला वाटते आजचा तरुण वर्ग आणि कालचा, परवाचा तरुणवर्ग त्याचे निश्चित स्वागत करेल. निदान कळेल ‘ बाबुराव अर्नाळकर’ नावाची एक जिवंत दंतकथा होती.
अशा ह्या विख्यात लेखकाचे ५ जुलै १९९६ रोजी निधन झाले.
सतीश चाफेकर.
Leave a Reply