कालच्या ‘राजयोग’ डिनरच्या वेळची राधाने दिलेली माहिती राघव पुन्हा पुन्हा आठवत होता.आणि त्या बरोबर खळखळून हसणारी सुंदर राधा पण नजरे समोरून हालत नव्हती! तरी त्याने आपले मन केस वर फोकस केले. तो मनोहर नेमका कोण होता? तो संतुकरावांना कशासाठी भेटायला गेला होता? त्या दोघात कसलेही साम्य नव्हते.
संतुकराव अति श्रीमंत, तर तो त्या मानाने दरिद्री! काही नाते असेल का? हा भेटायला आल्या पासून संतुकराव आऊट हाऊस मध्ये का झोपू लागले? का तो फक्त त्यांचा विक्षिप्त पणा होता? नाही तो विक्षिप्तपणा खचितच नसावा. कारण विक्षिप्तपणा चार-दोन दिवस टिकेल, महिनाभर नाही! मनोहर पासून काहीतरी धोका आहे हे संतुकरावांना जाणवले होते! मनोहर आणि खून्याचे सापडलेले पुरावे, हे मनोहर खुनी नसल्याचे स्पष्ट संकेत देत होते. बुटाच्या ठश्याचा आकारातून तो सहा फुटाच्या आसपास उंचीची व्यक्ती होती! पण एक मात्र नक्की होते कि मनोहर आणि संतुकरावांचा खून यांच्यात संबंध होता! पण काय? बरे हा मनोहर अचानक कुठून उगवलंय? याची पाळंमुळं खणून काढावी लागणार होती! या चारदोन दिवसात त्यांनी सर्कुलेट केलेल्या स्केचचा रिस्पॉन्स अपेक्षित होता.
राघवने फोन उचलला.
“राकेश, त्या स्केच संबंधी काही माग लागतोय का? काही क्रिमिनल रेफरन्स?”
” आम्ही शोधत आहोत. अजून काही हाती आलेलं नाही. काही वाटले तर लगेच कळवतो.”
” ठीक. बर त्या जसवंतच्या प्रिंट मॅच करून पाहिल्यात का?”
“अरे हा, मी त्या साठीच फोन करणार होतो! तेव्हड्यात तुमचाच फोन आला.”
” जमतात!”
” नाही सर! अजिबात जमत नाहीत. जसवंत खुनी नाही! कुणीतरी वेगळीच व्यक्ती आहे! ”
राघवाची एक आशा मावळी. जसवंत नाही तर मग कोण?
त्याने जाधवकाकाला आवाज दिला.
“जाधवकाका, तो जसवंत कॅनवास शूज का घालतो ते विचारलंत?”
” हो. त्याचा एक कातडी बूट कुत्र्याने पळवलाय !”
यावर राघव बिचारा काय बोलणार? फक्त त्याने असहाय्य्यपणे जाधवकाका कडे पहिले.
राकेशच्या फोन वाजला.
“सर, मी जॉन बोलतोय!”
“बोल!”
” तुमचा तो ‘स्केचवला’ माणूस माझ्या समोर चालतोय! त्याला अटक करू का ?”
“नको! त्याच्यावर लक्ष ठेव! तो कोठे रहातो ते कळले तर पहा!”
” तो भोसेकर चाळीत भाड्याने खोली घेऊन राहतोय आणि त्याचे नाव—–”
“मनोहर आहे!”राघवने त्याचे वाक्य पूर्ण केले!
जॉन वेड्या सारखा फोनकडे पहात राहिला. या राघव साहेबाला भूत-बीत वश आहे का? मी साल चार दिवसा पासून आडून आडून चौकशी करतोय आणि याना आधीच कस कळत?
जॉनचा फोन चालू होता तेव्हा एक इनकमिंग कॉल येत होता. जॉनशी बोलून झाल्यावर राघवने मोबाईल स्क्रीनवर पहिले, तोच पुन्हा फोन वाजला.
“सर, शकील हियर!” कोण शकील? मग राघवला जाधवकाकानी सांगितलेले आठवले शकील जसवंतला फालो करत होता.
“बोल शकील!”
“सर आज जसवंत किसीको मिलने हाय वे के ‘पंजाब ढाबे’ पे जाने वाला है!”
” किसको?”
“पता नही!”
“कब?”
“रात आठ बजे!”
“शकील, तू उसको फालो कर. मै भी आ रहा हु!”
“जी, मै रस्ता देखुंगा!” राघवने फोन कट केला.
०००
रुद्राचा आजचा दिवस भयानक बिझी जाणार होता, हे त्याला कोणी सांगितले असते तर त्याने सांगणाऱ्याला वेड्यात काढले असते. सिगारेट संपली म्हणून तो फ्ल्याट खालच्या टपरीवर आला ,तर ती आज बंद होती. तो तसाच दोन गल्ल्या पलीकडे असलेल्या ‘बियर शॉपी’ कडे निघाला. एखादी चिल्ड बियर आणि तेथल्याच टपरीवरून सिगारेटचं पाकीट घ्यावे असा विचार त्याने केला. बियर बाटली घेऊन तो टपरीकडे वळला.
” कतरी सुपारी, खिमाम पट्टी, तिनसो बीस, एक्सोबीस उप्परसे बाबा रत्ना, गिला कत्ता! दो बनाव एक पार्सल, एक यहींच खाऊंगा! ” टपरी वरील एकुलतं एक गिऱ्हाईक ऑर्डर देत होत.
हातातल्या पानाला चुना लावत गादीवरल्या चाचानी आपली टकळी चालू केली.
“बम्बईके नाही लागते! कहा से आये हो जनाब?”
” हम सोलापूर से आया हय !”
मधेच शंभराची नोट रुद्राने चाच्याकडे सरकवली. रुद्रा, चाचाचे नेहमीचे गिऱ्हाईक. न बोलता त्यांनी रुद्राचे सिगारेट पाकीट दिले. रुद्राला पाहून ते गिऱ्हाईक सटपटल्याचे रुद्राच्या नजरेतून सुटले नाही. त्याचा बोलण्यातला सोलापुरी हेल ओळखीचा वाटला. रुद्राने चार पावले लांब सरकून पाकिटातली सिगारेट काढून ओठात धरली. ती पेटवताना त्याने त्या माणसाचे बारकाईने निरक्षण केले. सुपारी देणारा साधारण याच उंचीचा होता. याचे गाल आणि नाक सामान्य होते पण पॅडिंग केले तर तो तसाच दिसणार होता! फक्त पांढऱ्या केसांचा टोप आणि गॉगल कमी होता! तो गृहस्थ रुद्राला पास करून पुढे गेला. अन रुद्राची खात्रीच पटली! त्याचाही चाल किंचित फेंगडी होती! हाच तो,ज्याने त्याला खुनाची सुपारी दिली होती !
०००
पानाची ऑर्डर देऊन मनोहर गादीवरल्या चाचाच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना, अचानक रुद्रा समोर दिसला. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. पण क्षणभरच. एक तर रुद्राच्या डोळ्यात काही संशय किंवा ओळखीच्या खुणा दिसत नव्हत्या, दुसरे तो कसा ओळखणार? त्यावेळेस त्याने वेषांतर केले होते. चेहरा बदला होता,आणि मोठ्या गॉगलने चेहऱ्याचा खूप कमी भाग दिसत होता. अजिबात भिण्याचे कारण नव्हते! मनोहरने मनाची समजूत घातली. चाचाने दिलेले पान दांढे खाली कचकावून धरले. पार्सल पान अलगद खिशात टाकले. दोनचार मिनिटे तेथेच उभारून पानाचं चांगलं चर्वण केले, तोंडातील पान मस्त जमून आलं होत. तंबाखूचा नशील रस तोंडभर धडका मारत होता. वा! झकास!. चार झुरके मारून रुद्रा निघून गेला होता. मनोहर मग ऐटीत तीनशे वीस, एकशेवीसच्या तंद्रीत, आपण महागड्या मर्सिडिसच्या मागे रेलून बसलो आहोत आणि आपला ड्राइव्हर आपल्या साठी डझनभर पानाची ऑर्डर देऊन टपरीवर थांबला आहे, असे स्वप्न पहात तो भोसेकर चाळीकडे निघाला होता. त्याने चुकून जरी मागे नजर टाकली असती तर? तर त्याला पाठलाग करणारा रुद्रा दिसला असता!
(क्रमशः)
— सुरेश कुलकर्णी
Leave a Reply