‘आनंद टी सेंटर’ सारखा चहा, जगाच्या पाठीवर कोठेच मिळत नाही असे जसवंतचे व्यक्तिगत मत होते. पुडी लावून झाली ली तो हळूच येथे यायचा. आणि एक ‘कडक मिठ्ठी’ चहा ढोसायचा! गंजावर गोड खाल्लेकि माणूस लवकर हवेत तरंगतो, हे त्या मागचे छुपे तत्व होते. इतरांच्या चहात दीड चमच्या साखर टाकणारा भट्टिवाल कार्ट जसवंतच्या चहात तीन चमचे टाकत असे. नेहमीच्या गिऱ्हाईकाच्या खोड्या अश्या लहान सहान ‘हाटेली’त जपल्या जातात. जसवंत येऊन बसल्या बरोबर त्याने ‘कडक मिठ्ठी’ची ऑर्डर दिली. आज तो बेचैन झाला होता. आता संतुकराव मेले होते. कीतीही नाही म्हणले तरी मनोहरचा या खुनात हात नक्की होता! त्याला चिंता होती ती फुकट मिळणार गांजा बंद होणार याची. मनोहर खुनाच्या रात्री संतुकराव येण्या पूर्वी त्या आऊट हाऊस मध्ये काही काळ होता! जसवंतने याचेच भांडवल करण्याचे नक्की केले. इतके दिवस मनोहर आपल्या जवळच्या माहिती साठी ‘माल’ देत होता, आता हि तो देतच रहाणार होता! आत्तापर्यंत माहित सांगण्यासाठी द्यायचा आता, असलेली ‘माहिती’ न सांगण्याबद्दल ‘माल’ देणार होता! त्याने मनोहरला फोन लावला .
” महत्वाचे काम आहे! तुला खूप महत्वाची माहिती सांगायची आहे! तू आज रात्री आठ वाजता ‘पंजाब ढाबा’,तिथ ये! नाही आलास तर तुझेच नुकसान होऊ शकते! येताना आपला तो ‘माल ‘ आण!”
“जसवंत, मीच तुला फोन करणार होतो! माझे पण तुझ्या कडे एक काम आहे! बरे झाले तू फोन केलास! पोलिसांना तुझाच संशय आला आहे! राघव तुझ्या मागावर आहे! तेव्हा जपून रहा!” मनोहरने जसवंतला घाबरवण्यासाठी एक फुसका बार टाकला!
“ते आपण भेटीत बोलू! संशय कुणाचा आहे?”जसवंत तुसडेपणाने म्हणाला.
आपले बोलणे त्याचा पाठीला टेकून बसलेल्या चौकटी घराची लुंगी लावलेल्या हमालाने ऐकल्याचे त्याला कळण्याचे कारण नव्हते. खरे तर तो इतक्या मोठ्याने फोनवर बोलत होता कि अर्ध्या हॉटेलला ते ऐकू गेले असते. पण त्याच्या बोलण्याकडे कोण लक्ष देणार?
मनोहरने जसवंतचा फोन कट केला. जसवंतची लिंक कट करणे भाग होते. तो त्या आऊट हाऊस मध्ये गेला होता हे जसवंतला ठाऊक होते. राघवच्या तावडीत जसवंत कितपत टिकाव धरू शकेल शंकाच होती! दोन रट्ट्यात पोपटा सारखा बोलणार होता. जसवंतची रिस्क फारकाळ घेता येणार नव्हती! आज त्यानेच बोलावले आहे. पाहू काय करायचे ते !
हाय वेच्या डाव्या बाजूला तो ‘पंजाब ढाबा ‘ होता. रात्रीचे आठ वाजून गेले होते. ढाब्याच्या समोरच्या बाजूला दिवाळी सारखी चकाचक रोषणाई केलेली होती. विस्तीर्ण पटांगणात मोठाले हॅलोजन लॅम्प्स लावले होते. पटांगणातील चार-सहा झाडांवर लाल निळ्या लाईटच्या माळा सोडलेल्या होत्या. पन्नासच्या आसपास बाजावर, आडव्या लाकडी फळ्या टाकून जेवणाची ताट ठेवण्याची सोय केली होती, जेणेकरून बाजेवर मांडी घालून बसून जेवता येईल. जेवण वेळ झालीच होती. ढाबा चांगलाच गजबजला होता. हवेतला गारवा अन भाज्यांच्या मसाल्याचा वास पोटातली भूक वाढवू जात होता! रुचकर सामिष डिशेस साठी हे ठिकाण प्रसिद्ध होते. पार्किंग लॉट मध्ये राघवची ‘डस्टर’ डौलात उभी होती!
ढाब्याच्या मागच्या बाजूस मंद उजेडाचे लॉन होते. खास दर्दी लोकांसाठी हि जागा होती. सावकाश बियरचा बाटल्या रित्या करून चिकन भाकरीवर ताव मारणारे, अजिबात घाई नसलेले लोक येथे बसत. तेथेच जसवंत एक टेबल पकडून कोणाची तरी वाट पाहत होता. तो खूप अधीर झाला असावा, कारण सारखा घड्याळाकडे त्याची नजर जात होती.
शकील चौकटी घराची लुंगी, वर पांढरा झब्बा,अन डोक्याला जाळीची टाळूला घट्ट चिकटलेली गोल टोपी घालून जसवंतच्या मागे चार टेबल सोडून बसला होता. तो जेथे बसला होता तेथून जसवंतच्या हालचाली स्पष्ट दिसत होत्या,पण तो जसवंतला दिसत नव्हता. नॉक आऊट बाटली शेजारच्या रोस्टेड काजूचा एक एक दाणा तो मनलावून तोंडात फेकत बियरची चव घेतोय असेच पाहणाऱ्याला वाटले असते. पण त्याचे सगळे लक्ष जसवंतवर केंद्रित होते.
“क्या शकीलभाय! अकेलीच बैठे है! आपुन को भूल गये क्या?” एका पांढऱ्या दाढीच्या माणसाने त्याच्या पाठीवर सलगीची थाप मारत विचारले. क्षणभर शकील चकित होऊन त्या माणसाकडे पहातच राहिला. हा बाबा कोण मधेच उपटला? जान न पहिचान मै तेरा मेहमान! पण दुसऱ्या क्षणी ओळख पटली. तो राघव होता! जसवंत भलेही शकीलला ओळखत नसेल पण राघवला लाखात त्याने ओळखले असते. म्हणून हे वेषांतर करावे लागले होते!
“कोन?रहीम चाचा! आयी ये! तशरीफ राखिये! क्या लेंगे?” शकीलने दिलखुलास स्वागत केले.
” अब तो हम आपके मेहमान है! जो आप खिदमद करेंगे सो हमे मंजूर है!” शकील शेजारी राघव बसत म्हणाला.
“सर, क्या लाजवाब मेकअप किया है ?घडीभर मै भी चक्कर खा गया! ” शकील हळू आवाजात पुटपुटला.
” जसवंत कुठाय?”
“तो समोरच बसलाय!” नजरेनंच निर्देश करत शकील म्हणाला.
जसवंत चांगलाच अधीर झाल्या सारखा वाटत होता. तो सारखा चुळबुळ करत होता. क्षणा -क्षणाला घड्याळात नजर टाकत होता.
आणि जसवंत तटकन उभा राहिला.! शकील आणि राघव एकदम सावध झाले. बहुदा तो ज्याची आतुरतेने वाट पहात होता ती व्यक्ती त्याच्या दृष्टीपथात आली होती. जसवंत ज्या दिशेला पाहत होता, त्या दिशेला राघवन नजर टाकली. राघव आश्चार्यचकित झाला. कारण समोरून येणारी व्यक्ती ‘मनोहर’ होती!
मनोहर आणि जसवंत! काय कनेक्शन असावे?
हि संतुकरावच्या खुनाची केस दिवसेन दिवस क्लिष्ट होत चालली होती! हे मात्र खरे होते.
(क्रमशः)
— सुरेश कुलकर्णी
Leave a Reply