राघवला जेम तेम तीन तासाची झोप मिळाली होती. तो सकाळी आठच्या सुमारास तयार झाला होता. आज बरीच कामे होती. त्याने मोबाईल ऑन केला. जाधवकाकाचे दोन मिस्ड कॉल दिसत होते. तसाही तो त्यांना फोन करणारच होता.
“हॅलो,जाधवकाका तुमचे दोन मिस्ड कॉल दिसतायत!”
“सर, सकाळीच शकीलशी बोलणे झाले. काल रात्री तुम्ही धम्माल केलीत म्हणे. ”
“धम्माल कसली काका? नुसतीच धावपळ झाली. दोन्ही पक्षी भुर्र उडाले. हाती कोणीच आलं नाही! त्यात तो मनोहराचा अपघात!”
“हो, सांगितलं शकीलने.”
“बर, तुम्ही ताबडतोब व्हॅन आणि फोर्स घेऊन जसवंतच्या घरी जा. तो ‘नक्षत्र’च्या आऊट हाऊस मध्ये राहतो हे तुम्हाला ठाऊक आहे. मी पाच मिनिटात तिकडेच येतोय. त्याला ताब्यात घ्यायचंय. आपल्याला आज बरीच काम आहेत. तो सापडला तर त्याला कोर्टात हजर करून रिमांड घ्यावा लागेल. आणि नाही सापडला तर हुडकून काढावा लागेल. तेव्हा तयारीने या. ” राघवने फोन कट केला. आणि गिल साहेबांना फोन केला. कालचे रिपोर्टींग केले. जसवंतला ताब्यात घेत असल्याचे कानावर घातले. दुसऱ्या मिनिटाला तो ‘नक्षत्र’च्या रोखाने निघाला.
०००
तो ‘नक्षत्र’वर पोहंचला तेव्हा गेट बाहेर पोलीस व्हॅन उभी होती. अपेक्षे प्रमाणे जाधवकाका त्याच्या पेक्ष्या लवकर पोहंचले होते. राघवच्या घरा पेक्षा पोलीस स्टेशन पासून ‘नक्षत्र’ जवळ होते. तो तडक जसवंतच्या आऊट हाऊस कडे निघाला. आऊट हाऊसचे दार ओढून घेतलेले होते. बाहेर जाधवकाका मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होते.
“काका, जसवंत?”
त्यांनी आपले फोनवरी बोलणे न थांबवता फक्त दाराकडे बोट दाखवले! राघवला हे थोडेसे विचित्रच वाटले. तो आधाश्या सारखा आऊट हाऊस मध्ये घुसला,आणि थिजल्या सारखा दारातच उभा राहिला. कारण समोरचे दृश्य तितकेच भयानक होते! समोर जसवंत जमिनीवर वेड -वाकडा पडलेला होता! त्याचा चेहरा आणि शरीर काळे निळे पडले होते! तो जिवंत नाही या साठी नाडी तपासण्याची गरज नव्हती!
जाधवकाका फोन आटोपून राघव जवळ आले.
“जाधवकाका, हे असं व्हायला नको होत! मनोहर पाठोपाठ हा हि गेला! खुन्या पर्यंत पोहंचण्याच्या पायऱ्या एक एक करून निखळत आहेत! बरे आपल्या टीमला बोलावून घ्या!”
“सर, तुम्ही आलात तेव्हा मी तोच फोन करत होतो!”
मनोहरच्या गांज्याच्या पुड्यातील जहाल विषाने आपला प्रताप दाखवला होता!
पुढील चार तास राघव जसवंतचे आऊट हाऊस इंच-न-इंच आपल्या पोलिसी नजरेने चाळून काढले. ‘जसवंतला गांजाचे प्रचंड व्यसन होते’ या खेरीज त्याच्या हाती काहीच लागले नव्हते!
०००
राघव खोल विचारात गढून गेला होता. संतुकरावांच्या खुनाचे रहस्य वरचेवर गूढ होत चालले होते. जसवंतवर विषप्रयोग झाला होता. हे त्याच्या पोस्टमोर्टम रिपोर्ट मध्ये सिद्ध होणार होते. संतुकरावांना शेवटचा जिवंत पहाणारी एकमेवा व्यक्ती जसवंत होती. तो हि आता मेला होता. जसवंतशी सम्पर्कात असणारा मनोहर, तोही अपघातात मेला होता! संतुकरावच्या संदर्भातील या खूनामुळे प्रकरणातील गुंता वाढलाच होता. त्यात हि ‘मनोहर’ हे प्रकरण ज्यास्त गूढ होते. तो खुनी असेल असे, हाती आलेले पुरावे निर्देश करत नव्हते. संतुकरावांचा आणि त्याचा काहीतरी सबंध होता. तो काय? हे अजून उलगडले नव्हते. संतुकराव-जसवंत- मनोहर -संतुकराव अशी साखळी स्पष्ट होती! फक्त एक लिंक मिसिंग होती. तो बेनामी खुनी आणि मनोहर यांच्यातली! या खूना मागे कोण असेल?
जसवंत आणि मनोहरच्या पोस्टमोर्टमचे रिपोर्ट आले होते. जसवंतच्या पोटात आणि रक्तात गांज्या आणि अर्सेनिकचे रेसिडूय सापडले होते. मृत्यूचे कारण ‘विषप्रयोग’ हेच होते. मनोहरच्या रिपोर्टमध्ये पहाण्या सारखे फारसे नव्हते. त्याचे बरेचसे अवयव हायवे वरून खरडून काढावे लागले होते! तो अपघात भयानकच होता! या रिपोर्ट सोबत एक अजून छोटासा रिपोर्ट होता. जसवंतच्या मोबाईल मधील कॉल हिस्टरीचा! गेल्या दोन महिन्यात जसवंतने गावाकडच्या बायको पेक्षा अधिक फोन मनोहरला केले होते!
पुन्हा मनोहर!
— सुरेश कुलकर्णी
Leave a Reply