संपूर्ण पुरावे आणि प्रत्यक्ष खून करतानाच व्हिडीओ असून सुद्धा रुद्रा फाशीवर जाईल याची खात्री दीक्षितांना वाटेना! विशेषतः डॉ. रेड्डीच्या साक्षीने त्यांना काळजीत टाकले होते. तरी ते आज शेवटचा प्रयत्न करणार होते.
कोर्ट स्थानापन्न झाल्यावर दीक्षितांनी रुद्राची फेर तपासणी करण्याची परवानगी कोर्टास मागितली. ‘आता अजून कसली तपासणी?’अशा आशयाच्या आठ्यापाडत नाराजीनेच कोर्टानी परवानगी दिली.
“आरोपी रुद्रा, आपण काय प्रताप केलात हे जग जाहीर झालाय! माझा फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या. रात्री आकाराच्या ऑड वेळेला, तुम्ही त्या बंगल्याच्या मागील आडबाजूच्या आऊट हाऊस मध्ये कशाला गेला होतात?”
रुद्राच्या कपाळावर आठ्या पसरल्या. हा प्रश्न त्याला अनपेक्षित होता. खून करतानाच व्हिडीओ हाती असताना ‘तेथे का गेलात?’ हा प्रश्न डोक्यात येणे या साठी जबर लॉजिकचा मेंदू असावा लागतो. तो दीक्षितांकडे असल्याचे रुद्राने मनातल्या मनात मान्य केले.
कोर्टात पिनड्रॉप सायलेन्स होता.
“मी संतुकरावांच्या आऊट हाऊस मध्ये का गेलो याचे अत्यंत साधे उत्तर आहे. मी रोज डिनर नन्तर बाईकवर एक रपेट मारत असतो. कोठेतरी बाईक पार्ककरून चालत शतपावली करतो. माझा रोजचा मार्ग वेगळा असतो. त्या दिवशी मी असाच शतपावली साठी निघालो होतो. हमरस्त्यापासून एक लहानशी सडक जात होती. मी एका झाडाजवळ माझी बाईक पार्क केली. आणि त्या सडकेवर चालू लागलो. सडकेच्या दोन्ही बाजूना दाट झाडी होती. सडकेवर म्हणावा तसा अंधार नव्हता पण भक्क उजेडही नव्हता. मी व्हाट्स अप स्टेट्स पाहण्यात गुंतलो होतो, तेव्हड्यात कोठुनसा एक इसम आला आणि त्याने माझे हिप पॉकेट मधले पैशाचे पाकीट खसकन ओढून पळ काढला. मी त्याचा पाठलाग करत असताना त्याने माझे पाकीट एका बंगल्याच्या कम्पाऊंडवालच्या पलीकडे भिरकावून दिले आणि तो अंधारात नाहीसा झाला. मला पाकीट हस्तगत करणे गरजेचं होत. त्यात माझे महत्वाचा कागदपत्रे,क्रेडिट कार्ड्स,ड्राइव्हिंग लायसेन्स, घराची कि व इतर गोष्टी होत्या. मी बंगल्याच्या मुख्य गेटवर आलो आणि तेथील उंच्यापुऱ्या वॉचमनला पॉकेट कम्पाऊंड मध्ये पडल्याचे सांगू पहात होता. पण त्याने काहीही न ऐकून घेता मला हाकलून दिले. मी नाईलाजाने पुन्हा त्या बंगल्याच्या मागील बाजूस आलो. जवळच्या झाडाच्या आधाराने आत उडी घेतली. आता एका आऊट हाऊस मधल्या उघड्या खिडकीतून मंद प्रकाश येत होता. त्या प्रकाशात काही तरी चमकत होते. ते माझे पाकीट असावे असे मला वाटले. मी खिडकी पर्यंत पोहंचलो. ती चमकणारी वस्तू एक कागद निघाली. पण मला माझे पाकीट त्या आऊट हाऊस मधल्या खुर्चीच्या पायाशी पडलेले दिसले! खिडकीस गज,किंवा जाळी नव्हती. मी सरळ आत गेलो. पाकिटाला हात घालणार तोच त्या औटहाऊसचे दार वाजले. कोणीतरी पांढऱ्या केसाचा म्हातारा आत आला. मी घाबरून शेजारच्या अंधाराऱ्या खोलीत सरकलो. वेळ जात होता. तो म्हातारा खुर्चीवर बसून लॅपटॉपवर काहीतरी पहात होता आणि माझे पाकीट त्याच्या खुर्चीच्या पायापाशी पडलेले होते. तो लवकर उठेल अशी चिन्हे दिसेनात, शेवटी मी मनाचा हिय्या करून त्याच्या खुर्चीकडे सरकलो. माझे दुर्दैव आड आले. त्याला माझी चाहूल लागली. मी पटकन माझे पाकीट खिशात सारले आणि ओरडण्याचा बेतात असलेल्या म्हाताऱ्याच्या तोंडावर माझा पंजा दाबला! पुढचे मला माहित नाही. पण आता ते सर्वानाच व्हिडिओत दिसतंय. ”
“आरोपी रुद्रा, मला तुमची हि ‘कहाणी’ फारशी विश्वासाहार्य वाटत नाही! तुम्ही संतुकरावांचा खून त्या ‘इच्छापत्रातील’ पैशा साठी केलात! आणि त्या साठीच खुनाचे पुरावेही तुम्हीच तयार केलेत! आणि ‘पश्चातापाचे’ नाटक करत पोलिसांना सरेंडर झालात! तुम्हाला या कोर्टाकडून ‘खुनी’ असल्याचे प्रमाणपत्र हवे आहे! बोला हे खरे आहे कि नाही?” अडोव्हकेट दीक्षितांनी आवाज चढवून रुद्राला विचारले.
काही क्षण रुद्रा शांत राहिला.
“वकील साहेब, हा खून होईपर्यंत मलाच काय कोणालाही त्या ‘इच्छापत्राची’ माहिती नव्हती! मग मी कसा पैशा साठी खून करणार? आणि तो व्हिडीओ कोणी, का केलाय मला माहित नाही! आणि तुम्ही तो कोठून पैदा केला ते तुम्हालाच ठाऊक! पैशा साठी मी खून कसा करू शकतो हे तुम्हीच कोर्टास सांगा!”
दीक्षित थोडेसे खजील झाले.
“न्यायमूर्ती महोदय, आरोपी रुद्रप्रसाद रानडे, यांनी कोर्टाचा अमूल्य वेळ वाया घालवला आहे. अनेक मनघडन गोष्टी सांगून, कोर्टाची वेळोवेळी दिशाभूल करण्याचे निंद्य कृत्य केले आहे. मृत संतुकरावांच्या देहावर याच्या बोटांचे ठसे आहेत. त्या व्हिडिओत, तो प्रत्यक्ष खुन करतानाचे चित्रीकरण आहे. सर्व साक्षी आणि पुरावे फक्त एकाच सत्याकडे निर्देश करताहेत, आणि ते म्हणजे आरोपी रुद्रप्रसाद रानडे यांनी हा खून अतिशय शांत मनाने, थंड डोक्याने, जाणीवपूर्वक खून केला आही. एका आदरणीय वयोवृद्धांचा समाधानाने जगण्याचा अधिकार मारून टाकलाय! अश्या क्रूरकर्म्या, समाजघातकास कठोर शासन झालेच पाहिजे! याला ‘मरे पर्यंत फाशी’ची शिक्षा देण्यात यावी अशी मी माननीय कोर्टास विनंती करतो. जेणे करून गुन्हेगारांना जरब बसेल आणि समाजाची सुरक्षितता अश्वासित होईल. लोक निर्भयपणे जगू शकतील. कायद्याचा सर्वत्र आदर राहील.” दीक्षितांनी आपले छोटेसे भाषण प्रभावीपणे करून, आपल्या जागी बसले. आता त्यांचे काम संपले होते. रुद्राचे म्हणणे एकूण कोर्ट निकाल देणार होते.
“आरोपी रुद्रप्रसाद रानडे, सर्व साक्षी पुरावे आटोपले आहेत. आपणास या उप्पर काही सांगावयाचे आहे का ?”
“होय महोदय, मला माझी बाजू मांडण्याची संधी द्यावी!” रुद्रा नम्रपणे म्हणाला.
“आरोपी रुद्रप्रसाद रानडे यांची बाजू ऐकून घेण्यासाठी उद्याची तारीख देण्यात येत आहे. आणि तोवर कोर्टाचे कामकाज स्थगित होत आहे.”
कोर्टाने आदेश दिले आणि उठून आपल्या चेम्बर मध्ये निघून गेले.
०००
(क्रमशः)
— सुरेश कुलकर्णी
Leave a Reply