नवीन लेखन...

रुद्रा – कादंबरी – भाग ३

इन्स्पे. राघव नुकताच सी.बी.आय ला अटॅच झाला होता. सकाळचे एरोबिक्स संपवून तो घाम पुसत होता. तोच त्याचा मोबाईल वाजला. हवालदार जाधव फोनवर होता.

“हा. जाधव काका बोला. सकाळीच आठवण काढलीत. काही विशेष?”

हवालदार जाधव हा रिटायरमेंटला आलेला डिपार्टमेंट मधला आदरणीय सदस्य होता. अनुभवी आणि अत्यंत हुशार,पण तत्वनिष्ठ ! मागेच राहिला. त्यांच्या बरोबरीचे बरेच वर सरकले होते. राघव त्यांना आदराने वागवत असे व ते त्याच्याशी अदबीनेच वागत. एक लोभस बंध दोघात निर्माण झाला होता. आणि ‘कामाशी इमान’ हा त्यांच्यातील कॉमन दुवा होता!.

“सर , एक खून झालाय!”

“कोठे? आणि कोण ?”

” ‘नक्षत्र ‘बंगल्याच्या आउट हाऊस मध्ये. बंगल्याचे मालक संतुकराव सहदेव यांचा! मी  नाईटला होतो. सकाळी सहाला बंगल्याच्या सेक्युरिटी गार्डचा फोन आला. तुम्ही आल्यावर सविस्तर रिपोर्ट देतो. मी बाकी टीमला कळवले आहे. ते कुठलंही क्षणी येतील.” थोडक्यात जाधव काकांनी कल्पना दिली. जाधव काका स्पॉटवर जातीने हजर आहेत म्हणजे सर्व व्यवस्थित सोय होणार होती.

“आलोच!” राघवन फारशी चौकशी करण्यात वेळ घालवला नाही. ट्रॅकसूटच्या पॅन्टवर जॅकेट घालून त्याने आपल्या बाईकवर उडी मारली. स्टार्टच बटन दाबलं, तस ते साडे तीनशे सीसीच धूड गुरगुरल. क्षणात ती बाईक बुलेटच्या वेगाने झेपावली. ‘नक्षत्र ‘च्या दिशेने!

०००

संतुकराव हे सदुसष्ट वर्षाचे धडधाकटवृद्ध होते. त्यांचे पांढरे रेशमी मुलायम केस खिडकीतुन येणाऱ्या सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होते. त्यांचा मृत देह अजून त्याच खुर्चीत होता. डोळे खोबणी सोडून बाहेर आले होते, पण जीभ मात्र बंद तोंडातच होती. राघव बारकाईने निरीक्षण करत होता. नाक तोंड दाबून कोणीतरी त्यांचा खून केला असावा.असा कयास राघवने काढला. मृत संतुकरावच्या चेहऱ्यावर आश्चर्य चकित झाल्याचे भाव मात्र स्पष्ट दिसत होते. जे घडले ते त्यांना अपेक्षेत नसावे. त्यांच्या समोरच्या कॉम्पुटर टेबलवर लॅपटॉप, काही पुस्तके,होती.

जाधव काकांनी योग्य ती काळजी घेतली होती. एव्हाना फोटोग्राफर आणि इतर तज्ञ मंडळी आली होती. फिंगर प्रिंटवाले पावडर मारून ठशांचा शोध घेत होते. त्या बैठकीला लागून एक बेडरूम होती. त्यातील फ्रेंच विंडो अर्धवट उघडी होती. राघवने आपला मोर्च्या तिकडे वळवला. त्या खिडकीला गज किंवा जाळी नव्हती. त्याची गरजही नसावी. एक तर आऊट हाऊस, दुसरे भक्कम कंपाउंडच्या आतले, फारश्या सौरक्षणाची गरज भासली नसावी. बाहेरून कोणालाही त्या खिडकीतून बेडरूम मध्ये प्रवेश करता येऊ शकत होता! राघवने खिडकी बाहेर डोकावून पहिले. बाहेर ओल्या मातीत एक बुटाचा ठसा उमटला होता. तसेच खिडकीच्या चौकटीवरही काही ओली माती लागलेली होती! त्याने जाधव काकांना आवाज दिला.

“जाधव काका, हे बाहेरचे बुटाचे ठसे घेऊन ठेवा. तसेच चौकटीला लागलेली माती सुद्धा. आसपास अजूनही काही प्रिंट्स सापडतील.”

जाधव काकांनी होकारार्थी मान हलवली.

“ज्याने खुनाची बातमी कळवली त्या गार्डला बोलवा. ”

तो सेक्युरिटी गार्ड कम वॉचमन चांगलाच दणकट होता. साडेपाच -पावणेसहा फूट उंच असावा. दगडी चेहऱ्याचा. लालभडक डोळे. जागरणा मुळे हि असतील. पोलीस खात्यात किंवा सैन्यात असावा. पण त्याचे सुटलेले पोट ,तो खूप आळशी असल्याचे सांगत होते. त्याने निळ्या रंगाच्या अगम्य शेडचा ड्रेस घातला होता. आपल्या डाव्या हातातला काळा दंडुका तो सारखा हलकेच स्वतःच्या पोटरीवर मारत होता. एक तर ती त्याची सवय असावी, किंवा तो आतून बेचैन असावा. ज्या सहजतेने त्याने तो दंडुका डाव्या हातात धरला होता,त्यावरून तो डावखोरा असावा असे वाटत होते.  एका नजरेत या गोष्टींची नोंद राघवच्या मनाने घेतली.

“क्या नाम है?”

” जसवंत !” तो मग्रूरपणे गुरगुरला. साध्या बोलण्यातहि अशी मग्रुरी उत्तर भारतात पहावयास मिळते.

” पोलीस मे था?”

“नै. मिलटरी मे था !”

“पंजाब से हो ?”

“नै. बिलासपूर का. ”

“उमर?”

“पचास को दो कम.”

“कितने दिन से यहा हो ?”

“पंधरा साल से !”

म्हणजे या जसवंतने पूर्ण नौकरी केली नव्हती! सोडण्याचा प्रश्न नव्हता. कोर्टमार्शल झाले असावे.

“मराठी जनता है?”

“हो.”

“तुझ्या शिवाय या बंगल्यात अजून कोण कोण असत?”

“मी अन मालक दोघेच. कुक सकाळी आठ ला येतो, ब्रेक फास्ट आणि जेवण बनवून बाराच्या आसपास निघून जातो. मग कोणी येत नाही. ”

“मालक केव्हा जातात?”

“सकाळी साडे नऊला.”

“परत?”

“रात्री आठला.”

“काल कधी परतले?”

“आठलाच .”

“मुडदा कोणी पहिल्यांदा पहिला?”

“त्याच काय झालं मी सकाळी —”

“पाल्हाळ नको! विचारतो तेव्हडाच सांगायचं!” राघवने फटकारले.

“मीच!”

“कधी?”

“सकाळी पाचच्या राऊंडला.”

“कसा दिसला?”

“सकाळी पाचच्या राऊंडला मला ते खिडकीतून दिसले.”

” नेमके काय दिसले?”

” मालक वेडेवाकडे खुर्चीत पडले होते. ”

“आत्ता आहेत तसे?”

“हो.”

“मग? तू काय केलंस ?”

“मी खिडकीतून आत गेलो.”

“का?”

“कारण दार आतून बंद होते. ”

” हू , आत गेल्यावर तू काय केलंस?”

“सर्व आऊट हाऊस चेक केले. कोणी लपून बसलाय का? याचा शोध घेतला. ”

“मग?”

“मग काही चोरीस गेलंय का हे बघतील.”

“मग?”

“आत कोणी नव्हतं. सगळं सामानही व्ययस्थित होत.”

“मग?”

“मग पोलिसांना फोन केला.”

“आता शेवटचा प्रश्न मालक फक्त कालच येथे झोपायला आले होते का रोज येथेच झोपतात?”

“रोज नाही, पण गेल्या महिन्या पासून या आऊट हाऊस मधेच झोपत होते!”

” का? इतका राजमहाल सारखा बंगला सोडून येथे का ?”

“माहित नाही. ”

“ठीक तू जा. पण गाव सोडून जायचे नाही. तुझा फोन नम्बर जाधव काका कडे देऊन ठेव. आणि हो, तपासा संबंधी कोठे बोलायचे नाही. कोणी खोदून खोदून विचारले तर मात्र मला कळवायचे! ओके ?”

“हा ठीक. समझ गया. ”

जसवंत मागे वळून निघून गेला. राघव त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात असताना, त्याचा ती गोष्ट लक्षात आली. जसवंतने कॅनवास शूज घातले होते! लेदरचे अपेक्षित होते !

त्याने जाधव काकांना बोलावून घेतले.

“जाधव काका,खिडकी बाहेरजे बुटातचे ठसे आहेत,ते कापडी बुटाचे वाटतात. अश्या कामात आवाज न होवू देता हालचालीस चांगले असतात. जसवंतच्या बुटाचे पण ठसे घ्या. त्याने कॅनवास शूज का घातलेत विचारा. महत्वाची गोष्ट ते खिडकी बाहेरचे बुटाचे ठसे आणि जसवंतच्या बुटाचा आकार एकच आहे असे मला वाटते! जसवंत हाच शेवटचा इसम ज्याने संतुकरावांना जिवंत पहिले! आणि हाच पहिला ज्याने मृत पहिल्यांदा पहिले!” जाधव काका समजून गेले, जसवंतवर पाळत ठेवण्याची हि सूचना होती! राघवाची पाठ वळताच, जाधव काकांनी लगेच फोन काढला.

“शकील, जसवंत नजरे आड होता कामा नये !२४x ७.!”

०००

सर्व सोपस्कार आटोपून ऍम्ब्युलन्स मृत देह पोस्टमोर्टम साठी घेऊन गेली तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. राघवने फॉरेन्सिस लॅब इन्चार्जला फोन लावला.

“सर, राघव बोलतोय. संतुकरावची बॉडी पीएम साठी येतीयय. श्रीमंत माणूस होता. DNA प्रिझर्व करून ठेवा, कारण पैशासाठी मुडदे पडणारे कमी नसतात.”

राघव घराकडे निघाला. पोटात कावळे ओरडत होते. बंगल्या बाहेर राघवाची बुलेट बाहेर पडली. तो टकला माणूस हळूच झाडामागून पुढे आला आणि राघवच्या दूर जाणाऱ्या बाईकला एक टक पहात होता. खरे तर तो त्याचा गाढवपणाचं होता! कारण राघवलाही ‘तो’ मिरर मधून दिसत होता! सकाळी ‘नक्षत्र’च्या गेट मध्ये शिरताना हा टकलू त्याला असाच दिसला होता, बाईकच्या मिरर मध्ये!

(क्रमशः)

— सुरेश कुलकर्णी 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..