राघवच्या डोळ्या समोरून म्हाताऱ्या संतुकरावांचा चेहरा हालत नव्हता. कारण पंधरा दिवसापूर्वीच ते राघवला भेटून गेले होते! राघव ऑफिस मध्ये सकाळी डेली केसेस पहात होता. जाधव काकाही त्यांच्या रुटीन मध्ये गाढले होते.
“सर, कोणी तरी एक म्हातारा तुम्हाला भेटायचं म्हणुन आलाय. अर्जंट काम आहे असं म्हणतोय.” शिपाई निरोप घेऊन आला. राघवच्या कपाळावर आठ्या पडल्या. हे लोक नको त्या वेळेला येतात. कामात डिस्टरब झालेलं राघवला चालत नसे. पण एका वृद्धाला टाळणे त्याच्या जीवावर आले.
“ठीक आहे. पाठव त्यांना. ” राघवन उघड्या फाईल्स बंद करून ठेवल्या.
पांढऱ्याशुभ्र रेशमी केसांचा स्लिम म्हातारा ताडताड पावले टाकत ताठ मानेने आत आला. तजेलदार चेहरा, साठीच्या आसपासचे परिपकव वय, ‘मना सारखे करीन! ‘ हा चेहऱ्यावरचा भाव!
“मला त्या राघवला भेटायचंय! कोठय तो ?” त्याने राघवलाच विचारले.
“मीच इन्स्पे. राघव! बोला !” त्याने एकेरी केलेला उल्लेख राघवला खटकला. उर्मट दिसतोय. पण त्यांचे वय पाहून तो ताड्कन काही बोलला नाही.
“माझ्या जीवाला धोका आहे!” तो म्हातारा म्हणाला. त्याच्या आवाजात ‘भीती ‘चा लवलेशहि नव्हता.
“कशावरून ? काही धमकीचा फोन , पत्र ,मेल वगैरे आलंय का ?”
“नाही! अजून नाही. पण त्याची कशाला वाट पहायची ?”
“आधी समोरच्या खुर्चीत बसा. तुमच नाव ,गाव, पत्ता आणि फोन नम्बर सांगा !”
“आधार कार्ड दाखवू का ?” म्हातारा खुर्चीत बसत म्हणाला. म्हातारा आगाऊ पण होता.
“सध्या नको तूर्तास नाव, काय उद्योग करता ते आणि फोन नम्बर सांगा !” राघव स्वतःला संयमित राखण्याचा प्रयत्न करत म्हणाला.
तेव्हड्यात जाधवकाकानी चहा आणि पाणी आणून ठेवले.
“अरे वा ! अजून पोलिसात माणुसकी शिल्लक आहे तर! माझं नाव संतुक. चहाची दोन दुकान आहेत. आणि माझा फोन नम्बर १२३४५६७८९० आहे.” तो सांगत होता आणि जाधवकाका त्याच्या खुर्चीच्या मागे उभाराहून लिहून घेत होते.
“आतां सांगा संतुकराव, कोण तुमच्या जीवावर उठलाय ?”
” मला काय माहित? माझ्या सारखा श्रीमंत माणूस असला कि त्याचा जीव नेहमीच धोक्यात असतो! मी पुस्तकात वाचलंय आणि सिनेमात सुद्धा बघितलय!”
“दोन चहाची दुकान ! अन श्रीमंत? अन तुमच्या जीव धोक्यात ?” राघव उपहासाने म्हणाला.
“त्या दोन दुकानाच्या स्टोक साठी, सतरा गोडावून्स आहेत! आणि सतरा गोडावून्स साठी आठ,प्रत्येकी वीस एकरच्या चहाचे प्लांटेशन्स आहेत! मग इतके गोडावून्स लागणारच कि !”
“बापरे ! हे सगळं तुमचं ?” म्हातारा पक्का फेकू दिसत होता.
“हो तर! आहेतच!”
” संतुकशेठ, तुमचा पत्ता सांगा. उद्या पासून दोन पोलीस बंदोबस्तासाठी येतील!”
“नको!”
“नको? तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन नको ? मग कशासाठी सकाळी-सकाळी माझ्या कडे आलात?”
आता मात्र राघवचा आवाज वाढला.
“एक सेल्फी तुझ्या सोबत काढावा म्हणून आलो होतो!” संतुकराव शांतपणे म्हणाले.
” वॉट? शुद्धीवर आहेत का? आल्या पासून बघतोय, तुम्ही तोंडाला येईल ते बरळताय! तुमच्या वयाकडे पाहून गप्प बसलोय! तुमचा पोरकटपणा वाढतच चाललंय!” शेवटी राघव भडकलाच.
“अरे बाबा, भडकतोस कशाला? आपण सेल्फी काढला कि त्याची एन्लार्गड कॉपी घरात लावीन! तुझी माझी ओळख आहे म्हणल्यावर तो ‘खुनी’ घाबरून पाळूनच जाईल कि! तुला गुन्हेगार खूप घाबरतात असे ऐकलेय. तुझा चांगलाच दरारा आहे म्हणे! म्हणून सेल्फी साठी आलो होतो. तुला त्यात पोरकटपणा वाटत असेल तर राहू दे. पण मी मेलो तर मात्र तूच जिम्मेदार!” असे बडबडत म्हातारा हातवारे करत निघून गेला.
राघवने जाधवकाकांना इशारा केला. ते संतुकराव पाठोपाठ बाहेर गेले.
तासाभराने जाधवकाका परत आले.
“जाधव काका कोण होता तो म्हातारा?”
“सर! ते —-“
“हा, बोला.”
“ते अब्जाधीश संतुकराव सहदेव होते! चहाचे दुकाने नाहीत तर ‘चहाचे साम्राज ‘ आहे त्यांचे!”
या गृहस्थाच्या विक्षिप्तपणाचे किस्से राघवने ऐकले होते. आज अनुभवही घेतला !
०००
आणि पंधराच दिवसात त्यांना वाटले ते खरे झाले होते. त्यांना शंका असावी पण खात्री नसावी. का बोला फुलाला गाठ पडली? राघव विचारात गढून गेला होता.
“सर, स्केचिंग साठी आर्टिस्ट आलाय.” जाधव काकाच्या आवाजाने राघव भानावर आला.
राघवने ‘नक्षत्र’ बंगल्यात जाताना आणि येताना मिरर मध्ये दिसलेल्या माणसाचे वर्णन करायला सुरवात केली. त्या आधारे तो आर्टिस्ट चित्र साकारत होता.
(क्रमशः)
— सुरेश कुलकर्णी
Leave a Reply