गोव्यातील ‘दोना पावला’ बीच पासून पणजीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका टेकडीवर ते छोटेसे टुमदार घर होते. उंचावर असल्याने तिथून दोना पावला बीचचा निसर्गरम्य परिसर आणि दूरवर पसरलेल्या समुद्राचे मोहक दृश्य दिसत असे. प्रसिद्ध उद्योजक शामसुंदर मानकर यांचा तरुण अविवाहित मुलगा सुधीर याच्या मालकीचे हे घर. मानकर यांचा प्रशस्त बंगला पर्वरीम येथे होता पण त्यांनी तरुण सुधीरला त्याच्या मित्रांबरोबर वेळ घालवता यावा यासाठी शहरापासून दूर थोडेसे एकांतात असलेले ते घर खरेदी केले होते. या घरात सुधीर व त्याचा मित्र परिवार यांच्या पार्ट्या व इतर मौज मजा चालत. सुधीर आपला बराचसा वेळ याच घरी घालवत असे.
आज सकाळी या घराची देखभाल करणारा विश्वासू नोकर तुकाराम गावडे याने जेव्हा घराच्या फाटकातून आत प्रवेश केला तेव्हा सकाळचे आठ वाजून गेले होते. काल रात्रीपासून तुफानी कोसळणाऱ्या पावसाने आता जरा विश्रांती घेतली होती. कालच्या तुफानी पावसामुळे अजूनही रस्त्यावर विशेष रहदारी नव्हती. काल रात्रभर पावसाचे थैमान चालू होते त्यामुळे तुकारामला आज कामावर यायला त्याला थोडा उशीरच झाला होता.गेले दोन दिवस तो सुटीवर होता. त्याला सुधीर आणि त्याचा मित्र परिवार यांच्या पार्ट्या आणि त्यामुळे पडणारा कामाचा पसारा याची त्याला सवय होती.त्यामुळे किती कामाचा पसारा पडला असेल याचा विचार करत त्याने घराची बेल वाजवली. दोन तीन वेळा बेल वाजवून पण काहीच प्रतिसाद आला नाही तेव्हा त्याला वाटले की कदाचित काल रात्री उशिरा पार्टी संपली असेल म्हणून सुधीर आणि मित्र अजून झोपले असावेत. तुकाराम कडे दरवाज्याची एक लैच की होती तीच्या सहाय्याने तो दरवाजा उघडायचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले की घराचे दार थोडे उघडेच आहे ते पाहून त्याला थोडे आश्चर्य वाटले त्याने दरवाजा ढकलताच दार उघडले गेले. घरात जाताच त्याला थोडी शांतता जाणवली. तो जिना चढुन वर गेला आणि त्याला वरच्या मजल्यावरील दर्शनी रूम मधे एका कोचा जवळ जमिनीवरच सुधीर पालथा पडलेला दिसला. पहिल्यांदा त्याला वाटले की कदाचित त्याला काल ज्यास्त झाली असेल पण जवळ जाऊन पाहताच त्याला आढळले की आपले साहेब आता जिवंत नाही. ते पाहुन तो खूप घाबरला. दोना पावला पोलीस स्टेशन सुधीरच्या घरापासून साधारण एक मैलावर होते. त्याने लगेच ती घटना पोलिसांना आणि सुधीरच्या वडिलांना कळवली.
त्यानंतर तत्काळ इन्स्पेक्टर सुर्वे आपल्या टीम सह घटनास्थळी हजर झाले. सुधीरच्या मृत देहाची सुर्वे यांनी कसुन पाहणी सुरु केली. सुधीरचे डोळे विस्फारलेले दिसत होते. अंगावर कुठेही जखमा किंवा मारहाण यांच्या खुणा नव्हत्या. टीम मधील डॉक्टरनी त्याचा मृत्यु साधारण पणे आठ दहा तासापूर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज दिला होता. सुर्वेनी घराची नीट पाहणी केली. सुधीरचा मोबाईल बाजूला जमिनीवर पडलेला होता. ओपन टेरेसचा दरवाजा मात्र उघडा होता. रूम मधील टेबलवर दोन ग्लास, व्हिस्की आणि वोडका यांच्या बॉटल होत्या. दोन रिकाम्या खरकट्या डिश दिसत होत्या तसेच काही खाद्य पदार्थ पण भांड्यामध्ये दिसत होते. म्हणजे नक्कीच काल रात्री सुधीर कडे कोणीतरी आल असावं. तसच ड्रिंक पार्टी झाली असावी. विस्कीची बाटली बर्यापैकी रिकामी झालेली दिसत होती. सुर्वेनी सर्व वस्तू पंचनामा करून ताब्यात घेतल्या.तसेच ग्लास, बॉटल आदि गोष्टीवरील ठसे घेण्याचे काम सुरु झाले.
सर्वप्रथम सुर्वेनी तुकारामची जबानी घेतली. कारण त्याने पहिल्यांदा ही घटना पाहून पोलिसांना कळवले होते. त्याने सांगितले की आपल्याला कामानिमित्त दोन दिवस सुटी हवी होती आपल्या सोयीने द्या असे आपण काही दिवसापूर्वी मालकांना सांगितले होते आणि सुधीरने स्वतः त्याला सुटी दिली होती त्यामुळे आपण दोन दिवस सुटीवर होतो. सुधीर कडे त्याच्या मित्रांच्या नेहेमीच पार्ट्या चालू असतात. मात्र मालकांनी स्वतः होऊन सुटी दिल्यामुळे पार्टी नसावी असे आपणाला वाटले होते. तुकारामच्या म्हणण्यानुसार घरातून काही चोरी झाली नसावी कारण सर्व वस्तु जागच्या जागी होत्या, आता सुधीरच्या कपाटातील काही चोरीला गेले असेल तर ते त्याला माहित नव्हते. कपाटाची चावी कपाटाला दिसत होती. तुकारामच्या म्हणण्या प्रमाणे घराचा मुख्य दरवाजा उघडाच होता त्यामुळे सुधीरकडे आलेली व्यक्ती नक्कीच त्याच्या ओळखीची असावी आणि सुधीरने स्वतः दरवाजा उघडुन त्या व्यक्तीला आत घेतले असावे. तसेच सुधीरने जर त्याच्याकडे कोणी येणार होते तर तुकारामला सुटी का दिली. याचा अर्थ असा होता की सुधीरला त्याच्याकडे येणारी व्यक्ती तुकारामला माहिती व्हायला नको होती, या गुप्तता पाळण्याचा पण सुर्वेना अर्थ लागत नव्हता. सुर्वेनी तुकारामच्या हालचालीवर नजर ठेवली होती. त्याच्या जबानीची सत्यता पण ते पडताळून पाहणार होते.
थोड्याच वेळात सुधीरचे वडील हजर झाले. आपल्या मुलाचा मृत देह पाहून त्यांना शोक आवरत नव्हता. सुर्वेनी त्यांचा जबाब नोंदवला होता.मानकर म्हणाले की सुधीर च्या पार्ट्या चालतात पण त्याची ते कधीच चौकशी नाही करत. त्यामुळे काल त्याच्या कडे कोण आल असेल हे त्यांना सांगता येत नव्हते. त्याच्या मित्रांनाच कदाचित काही माहिती असण्याची शक्यता असावी असे त्यांनी सांगितले होते. सुधीरचे अलीकडे कोणाशी भांडण झालेले त्यांच्या ऐकिवात नव्हते. या बाबतीत त्यांचा कोणावर संशय नव्हता. सुधीरच्या हातातील सोन्याची अंगठी गळ्यातील चेन जशीच्या तशी होती म्हणजे सकृत दर्शनी तरी चोरी झाल्याची शक्यता नव्हती. सुर्वेनी त्यांचे सांत्वन करून सुधीरचा मृत देह पोस्ट मार्टेम साठी पाठवून दिला.
नंतर सुर्वेनी सुधीरचा मोबाईल चेक केला. त्यात शेवटचा call कोणी तरी समिधा नावाच्या मुलीचा होता. हा फोन साधारण ११ वाजता आला होता आणि सुधीरने तो रिसीव केला होता आणी तो साधारण पणे तीन मिनिटे बोलला होता. याचा अर्थ सुधीर निदान ११ वाजेपर्यंत जिवंत होता तसेच त्याच्याशी शेवटी बोलणारी व्यक्ती समिधा होती. त्यामुळे कदाचित सामिधाला या बाबतीत काही माहिती असू शकते. हा धागा मिळाल्यावर सुर्वेनी लगेच समिधाला फोन करून पोलीस स्टेशन वर बोलवून घेतले होते. निरोप मिळताच समिधा लगेच पोलीस स्टेशन वर हजर झाली.
समिधा विशीची एक सुस्वरूप तरुणी होती. निरोगी सतेज कांती, सुडौल बांधा, धार धार नाक, गोल चेहरा, नाजूक जिवणी, काळे टपोरे व अत्यंत बोलके डोळे आणि तीचे एकंदर व्यक्तिमत्व प्रसन्न आणि आकर्षक होते. निळ्या रंगाची जीन आणि वरती पिवळ्या कलरचा टौप मधे समिधा खूप आकर्षक दिसत होती. सुधीरच्या मृत्यु बद्दल सुर्वेनी सांगितल्यावर तिला धक्का बसल्याचे भाव तिच्या चेहऱ्यावर दिसले. सुर्वेनी हळू हळू आपल्या पद्धतीने तिला बोलते केले. तिच्याशी बोलताना त्यांना जाणवले की तिच्या बोलण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास आहे. तीने सुर्वेंच्या प्रत्येक प्रश्नांना अत्यंत शांतपणे आणि मुद्देसुद उत्तरे दिली होती. समिधाशी झालेल्या संभाषणातून सुर्वेना माहिती मिळाली ती अशी….
समिधा मुळची मुंबईची पण नोकरी साठी गोव्यात आली होती. ती कायद्याची पदवीधर होती आणि एका फार्मा कंपनीत नोकरी करायची. तिचे ऑफिस पणजीमधे होते. पणजी मधील एका ऑन्टी कडे ती पेइंग गेस्ट म्हणून रहायची. सुधीरशी तिची एका पार्टीत साधारण सहा महिन्या पूर्वी ओळख झाली होती. तिच्या कंपनीतील तिची कलीग रीमा हिच्या कडे सुधीर यायचा त्यामुळे आपली ओळख झाली. सुधीर बरोबर ती एक दोन वेळा हॉटेल मधे जेवायला गेली होती. सुधीर बरोबर तिची थोडी फार ओळख आणि मैत्री होती एवढेच. काल रात्री ती कुठे होती या प्रश्नाला तिने काल रात्री आपण घरीच होतो आणि टी व्ही वर चित्रपट बघत होतो असे उत्तर दिले होते. सुर्वेनी कोणता चित्रपट पहिला ह्याचे उत्तर सलमान खानचा “मैने प्यार किया” हा चित्रपट बघितला. सलमान आपला आवडता हिरो आहे हा चित्रपट सोनी वाहिनीवर होता साधरण ९ वाजता सुरु झाला आणि १२ च्या सुमारास संपला. समिधा जेव्हा हे सांगत होती तेव्हा सुर्वेनी आपल्या सहकाऱ्याला सांकेतिक खुण केली. समिधाच्या विधानाची सत्यता आता तो पडताळून पाहणार होता. समिधाला जेव्हा ‘काल तू सुधीरला call केला होतास का ? ‘ असे सुर्वेनी विचारले तेव्हा तिने सहज उत्तर दिले होते की काल रात्री सुधीरला तिने आपल्या कंपनीच्या कामा निमित्त फोन केला होता. मात्र तो गडबडीत असावा त्याने सांगितले की त्याच्याकडे कोणी गेस्ट आले आहेत तेव्हा आपण उद्या बोलूया असे म्हणून त्याने फोन ठेवला होता त्यामुळे त्याच्याशी काही बोलणे झाले नाही. फोन किती वाजता केला होता याला तिने उत्तर दिले होते की नक्की वेळ आठवतं नाही पण साधारण ११ ची वेळ असावी. आपल्या जबानीत तिने सुधीरच्या मृत्यु बाबत आपणाला काहीच माहिती नाही असे सांगितले होते.
समिधाचा जबाब घेऊन झाल्यावर सुर्वेनी तिला जायला सांगितले मात्र जरूर असेल तर आपण परत बोलवून घेऊ तसेच आपल्या परवानगी शिवाय शहर सोडू नये असेही सांगितले. समिधा त्यांचा निरोप घेऊन पोलीस स्टेशन मधून निघाली. समिधाशी बोलताना सुर्वेना जाणवले होते की ती काही तरी लपवत असावी तसेच सुधीरच्या मृत्यु संदर्भात तिला निश्चित काही माहिती असावी. त्यामुळे तिने दिलेली माहिती तपासुन बघणार होते.
समिधा पोलीस स्टेशन मधुन निघाल्यावर सुर्वेंचे विचारचक्र चालू झाले. त्यांनी आता मृत सुधीर बद्दल माहिती मिळवायला सुरवात केली.सुधीर आणि त्याचा मित्र परिवार यांच्याकडे ही चौकशी केली होती त्यातून धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे सुधीर हा एक चैनीला चटावलेला आणि श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा होता. वय पंचवीस वर्ष, दिसायला रुबाबदार, उंचापुरा, निमगोरा वर्ण, चेहऱ्यावर खानदानी श्रीमंतीचे तेज आणि वागण्यात एक प्रकारची बेफिकिरी आणि मस्ती. त्याच्या भोवती नेहमीच मित्र मैत्रिणीचा घोळका असे. सुधीर पण हॉटेल मध्ये पार्ट्या करणे, मौज मस्ती करणे, भटकणे यात मग्न असायचा. सुधीरचे वडील त्यांच्या व्यवसायात मग्न असत तर सुधीरची आई त्याच्या लहानपणीच गेली होती त्यामुळे सुधीरला काही कमी पडू नये याची त्याचे वडील काळजी घेत. आपल्या श्रीमंतीच्या, देखणे पणाचा त्याला खूप अभिमान वाटे. त्याच्या रुपाला आणि श्रीमंतीला भुलून अनेक मुली स्वतः होऊन सुधीरच्या गळ्यात पडत. सुधीर पण त्याचा फायदा घेई आणि थोडे दिवस मजा करून नवीन सावज शोधी. सुधीरचा हा पैलू समजल्यावर सुर्वेंचे विचारचक्र त्या दिशेने धाऊ लागले. त्यात धक्कादायक माहिती समोर आली ती अशी की गेले तीन चार महिन्यांपासून समिधाची आणि त्याची जवळीक वाढली होती.सुधीर समिधा साठी पागल झाला होता.पण समिधा मात्र त्याला विशेष प्रतिसाद देत नव्हती पण एक दोन वेळा त्याच्या दोना पावला येथील घरी गेली होती. ही माहिती मिळाल्यावर सुर्वेनी अंदाज केला की समिधा या प्रकरणात नक्कीच कुठे तरी आहे. त्यांनी मग त्या दृष्टीने तपासाला सुरवात केली. समिधाच्या हालचालीवर बारीक नजर ठेवण्यास सुरवात केली. त्यांनी प्रथम समिधाच्या मोबाईलचे call रेकॉर्ड चेक केले. काल रात्री ११ वाजता झालेला call पणजीतूनच झाला होता. समिधाच्या मोबाईल वरून सुधीरला केले गेलेले call तसे नॉर्मल होते. कारण प्रेमात पडलेले लोकं जसे सतत call करतात व ज्यास्त वेळ बोलत बसतात तसा काही प्रकार दिसत नव्हता. समिधा जो चित्रपट आपण बघितला असे सांगत होती तो सोनी या वाहिनीवर त्या रात्री ९ वाजता सुरु झाला होता आणि बारा वाजता संपला होता. ही माहिती सुर्वेंच्या सहकारयाने कन्फर्म केली होती. त्यामुळे सामिधाने दिलेली माहितीत काही तफावत आढळली नव्हती.
सुधीरचा मृत्यू ज्या रात्री झाला त्या रात्री पूर्ण गोव्यातच पावसाचे थैमान चालू होते. सुधीरच्या घराचे लोकेशन पण थोडे एकाकी होते.पावसामुळे रस्त्यावर रहदारी पण तुरळक होती. त्यामुळे सुधीरकडे काल रात्री आलेली व्यक्ती कोण ह्याचा शोध घेण कठीण पडत होत. सुर्वेंच्या मनात विचार चमकून गेला की काल सुधीर बरोबर समिधा तर नसेल. त्यातून सुधीरचा नोकर तुकाराम पण रजेवर होता त्यामुळे सुधीर कडे कोण आल हे समजू शकत नव्हतं. समिधाच्या म्हणण्या प्रमाणे ती काल रात्री तिच्या घरीच होती. साधारण ११ वाजता तिने तिच्या कामासाठी सुधीरला आपल्या घरातून call केला होता हे पण ती नाकारत नव्हती. सुर्वेनी समिधाला पोलीस स्टेशनला बोलवून परत तिची चौकशी केली होती. यावेळी त्यांनी समिधाचा जबाब घेताना मोठ्या युक्तीने तिचे फिंगर प्रिंट्स मिळवले होते. जर ते सुधीरच्या घरातील ग्लास, बॉटल इत्यादीवरील फिंगर प्रिंट्सशी जमले तर समिधा काल घटनास्थळी होती हे सिद्ध करता येण शक्य होणार होत. सुर्वेना समिधावर संशय येण्याचे कारण म्हणजे दोन वर्षा पूर्वी संगीता नावाच्या एका तरुणीचा अपघाती मृत्यु झाला होता. तिचे आणि सुधीरचे प्रेमसंबध असल्याची चर्चा होती. ज्यादिवशी सकाळी संगीताची डेड बॉडी दोना पावला बीच वर सापडली होती त्याच्या आदल्या दिवशी ती सुधीरच्या घरी गेली होती. पण चौकशीत सुधीरने ते नाकारले होते आणि त्या रात्री संगिता सुधीरकडे गेली होती असा कोणताही पुरावा सापडला नव्हता. अखेर संगीताचा मृत्यु अपघाती मृत्यु म्हणुन नोंदला गेला होता. संगीता ही समिधाची मोठी बहिण असल्याचे त्यांना चौकशीत समजले होते त्यामुळे आपल्या बहिणीच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी कदाचित समिधाने हे धाडस केलं असाव का असा संशय सुर्वेना येत होता. समिधा ही कायद्याची पदवीधर असल्याने तिने स्वतःची बाजु बळकट करून ठेवली असावी असा सुर्वेंचा अंदाज होता.
संगीताच्या मृत्यु संदर्भात सुधीरचे नाव गोवले गेले तरी तू त्याच्याशी मैत्री कशी केलीस या सुर्वेंच्या प्रश्नावर समिधा थोडी गांगरून गेली. पण ‘पोलीस आणि कायद्यावर आपला विश्वास आहे त्यांनी सुधीरला निर्दोष मानले तर मी का नाही मानायचे’ असे उत्तर देऊन सुर्व्याना निरुत्तर केले होते.
समिधा ज्या ऑन्टीकडे पेइंग गेस्ट म्हणून राहात होती तिचा पण जबाब घेतला होता. तो समिधाच्या बाजूने जाणारा होता कारण तिने त्या रात्री समिधा घरीच होती याला दुजोरा दिला होता. समिधा घरी होती आणि बाहेर गेली नव्हती हे तुम्ही कशावरून म्हणता यावर तिने सांगितले होते की समिधा रात्री तिच्या खोलीत टेलीविजन बघत बसते किंवा काम करत असते. त्या दिवशी ती आपल्या बरोबर जेवली आणि नंतर आज आपणाला सलमानचा चित्रपट बघायचा आहे असे सांगून तिच्या रूम मध्ये गेली. पाऊस खूप पडतोय उगाच जागत बसू नको असे आपण सांगितले आणि पावसाळी गारठ्यामुळे आपण नेहमी पेक्षा लवकर झोपलो. पण समिधा बराच वेळ जागी होती आणि तिच्या खोलीत टेलीविजन बघत बसली होती. ऑन्टीच्या जबानीत सुर्वेंच्या हाती काहीच लागले नाही. तिच्यावर विश्वास ठेवणे भाग होते कारण मृत सुधीरशी तिचा कोणताच संबध नव्हता आणि तिला खोटे सांगण्याचे काही कारण नव्हते. आता पोस्ट मार्टेम रिपोर्ट आणी ठसे तज्ञांचा रिपोर्ट आल्यावर या केस वर अधिक प्रकाश पडणार होता पण त्याला थोडा वेळ लागणार होता. तो पर्यंत थांबणे भाग होते. तो पर्यंत सुधीरचा मित्र परिवार यांना चाचपून काही माहिती मिळते का याची चाचपणी सुरु केली. मुख्य म्हणजे सुधीर कडे काल आलेली व्यक्ती कोण याचा शोध लागणे आवश्यक होते. सुर्वे आणि त्यांची टीम त्यासाठी अथक परिश्रम घेत होती. या बाबतीत पण जी थोडीफार माहिती मिळाली ती पण सामिधाच्या बाजूने जाणारी होती. कारण जॉनी डिसुझा या रिक्षा चालकाने त्या रात्री एका व्यक्तीला सुधीरच्या बंगल्याच्या दिशेने चालत जाताना साधारण नऊच्या सुमारास पाहिले होते. पण त्याने त्या व्यक्तीचा चेहरा पहिला नव्हता आणि त्या व्यक्तीने काळ्या रंगाचा जेन्ट्स रेनकोट आणि फेल्ट कॅप घातली होती. त्यामुळे सुधीरचा कोणी मित्र त्याच्या कडे आला असावा का या दृष्टीने पण तपास सुरु झाला. सुधीरच्या सर्व मित्र परिवाराची कसुन चौकशो झाली पण हाती काही लागले नाही. सुधीरकडे त्या रात्री आलेली व्यक्ती कोण हे कोडे उलगडले नव्हते. सुर्वे आणि त्यांची टीम निराश झाली होती….
*********
इन्स्पेक्टर सुर्वें त्यांच्या केबिन मधे बसले होते.त्यांच्या समोर सुधीरचा पोस्ट मार्टेम आणि ठसे तज्ञांचा रिपोर्ट होता.. सुधीरचा मृत्यू त्या रात्री अंदाजे ११.३० च्या सुमारास झाला होता. त्याच्या मृत्यूचे कारण अति प्रमाणात केलेले मद्यपान आणि त्याबरोबर घेतलेल्या झोपेच्या गोळ्यां हे होते. अल्कोहोल बरोबर घेतल्या गेलेल्या झोपेच्या गोळ्यांनी त्याचा मृत्यु झाला होता. या बाबतीत सुर्वेनी अधिक चौकशी केली तेव्हा त्याना धक्काच बसला. त्यांना अशी माहिती मिळाली की ज्या झोपेच्या गोळ्या त्याच्या मृत्यूचे कारण बनल्या होत्या त्या घेण्याची सुधीरला सवय होती. त्याचे फैमिली डॉक्टर यांनी सुधीरला जेव्हा निद्रानाशाचा त्रास जाणवत होता तेव्हा घ्यायला सांगितल्या होत्या. या माहिती मुळे अधिकच गुंता गुंत निर्माण झाली होती कारण ह्या गोळ्यांचा ओवर डोस सुधीरला कोणी दिला की त्याने चुकुन घेतला हे सांगता येत नव्हते. तसेच हे सर्व घडलं तेव्हा सुधीरच्या बरोबर असलेली व्यक्ती कोण हे गूढ अजून उलगडले नव्हते. फिंगर प्रिंट्स तज्ञांकडून आलेला रिपोर्ट समिधाची बाजु अजून भक्कम करीत होता कारण समिधाच्या हाताचे फिंगर प्रिंट्स सुधीरच्या घरातील वस्तूंवर सापडले नव्हते. सुधीरचा मृत्यु ११.३० च्या सुमारास झाला होता तर समिधाने त्याला पणजीतून ११ वाजता फोन केल्याचे ती स्वतः सांगत होती व call रेकॉर्ड मधे पण दिसत होते. तसेच त्या रात्री समिधा पणजीला तिच्या घरातच होती असे ऑन्टी सांगत होती. समिधाला सुधीरच्या घरात जाताना पहिल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नव्हता. त्यामुळे समिधाचा यात सहभाग असावा असे सुर्वेंच्या पोलिसी नजरेला वाटत असले तरी समिधाची चौकशी थांबवणे क्रमप्राप्त होते. सुर्वेनी समिधाला पोलीस स्टेशनला बोलावून तिने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
‘दोना पावला’ पोलीस स्टेशन मधून इन्स्पेक्टर सुर्वेंचे आभार मानून समिधा बाहेर पडली ते आणि तिने कॅब केली.कॅब पणजीच्या दिशेने धाऊ लागली. कारच्या वेगाबरोबर समिधाचे मन वेगाने भूतकाळात गेले आणि त्या रात्रीचा घटना तीच्या डोळयासमोर येवू लागल्या …..
**********
दोना पावला बीचच्या परिसरातील त्या छोट्या चहाच्या टपरी जवळ समिधा पोचली तेव्हा नउ वाजायला दहा मिनिटे कमी होती. टपरी केव्हाच बंद झाली होती. समिधाने स्कुटी एका बाजूला पार्क केली आणि ती रस्त्यावर आली.तिने काळ्या रंगाचा जेन्ट्स रेनकोट घातला होता आणि ती आता शांतपणे सुधीरच्या घराच्या दिशेने निघाली होती. दूरवर दोनापावला बीच दिसत होता. सर्व परिसराला पाऊस अगदी झोडपुन काढत होता. रस्त्यावर काहीच वर्दळ नव्हती. समिधा जेव्हा सुधीरच्या घराच्या दिशेने जाणऱ्या रस्त्याला वळली तेवढ्यात दुरून एक रिकामी ऑटो रिक्षा तिला येताना दिसली. आपण या रस्त्याला वळलो ते बरेच झाले नाहीतर कदाचित तो ऑटोरिक्षा वाला आपणाला पाहू शकला असता. तिने निश्वास सोडला आणि ती थोड्याच वेळात सुधीरच्या घरी पोचली. आता रात्रीचे नउ वाजले होते. पाऊस कोसळतच होता. समिधाने आपल्या अंगातला काळ्या रंगाचा जेन्ट्स रेनकोट दरवाजा बाहेर ठेवला आणि बेल वाजवली. सुधीरने दार उघडले. ‘वेल कम समिधा, चल सर्व तयारी झालीय आपण वर जाऊया ‘. दोघेही आतल्या गोलाकार जिन्यातून वरच्या मजल्यावरील दर्शनी रूम मधे गेले. तिथे सर्व तयारी दिसत होती. डाईनिंग टेबलावर जेवण तयार होते. काचेच्या टेबलवर ड्रिंक्सची तयारी दिसत होती. ते सर्व पाहुन समिधा खुश झाली आणि म्हणाली ‘अरे वा जोरदार तयारी केली आहेस’.
‘येस डीअर आपल्या सर्व आदेशांचे तंतो तंत पालन केलंय. पूर्ण गुप्तता पाळली आहे तुझ्या येण्याची. तुक्याला पण सुटीवर दिलीय दोन दिवस. तेव्हा तू आणि मी आणि हा धुंद एकांत. अग तु लग्नाला होकार दिलास याचा मला खूप आनंद झालाय. आता आपण अस चोरून का भेटायचं ? सुधीरने विचारले.
‘अरे चोरून भेटण्यात मोठी मजा असते, गोडी असते.’ समिधा म्हणाली.
“ठीक आहे तू मला एकांतात भेटते आहेस, रात्रीचा मुक्काम पण इथे करणार आहेस अजून काय हवंय मला.’ धुंद डोळ्यांनी समिधा कडे बघत म्हणाला.
त्यावर समिधा हसली आणी म्हणाली ‘अरे मी पण खूप एन्जॉय करणारे आज. म्हणून एवढ्या पावसात आले इथे’. सामिधाने अंगात लोकरीचा स्वेटर आणि हातात लोकरीचे हातमोजे घातले होते ते पाहुन सुधीर म्हणाला ‘अग ते हातमोजे तरी काढ एवढी थंडी वाजते का तुला ? आणि दोन पेग पोटात गेले की थंडी पळून जाईल’
“अरे मला जरा थंडीचा त्रास होतो मी म्हणून सर्व काळजी घेते आणि मला ड्रिंक्सची सवय नाहीये एवढी पण आज तुला देईन कंपनी. मी आज तुला ड्रिंक बनवून देईन. समिधा म्हणाली.
‘ ओ के चालेल हौऊ रोमांटिक कोणी नाही येणार आपल्याला डिस्टर्ब करायला आता खुश ना ? चल आता ड्रिंक एन्जॉय करू” . तिला हलकेच आपल्या जवळ ओढत सुधीर म्हणाला.
समिधाने उगाचच लाजल्याचा अभिनय करत त्याच्या पासून आपली सुटका करून घेतली. नंतर टेरेसचा दरवाजा उघडूला आणि बाहेरचा निसर्ग आणि कोसळणारा पाऊस पाहुन म्हणाली ‘अरे वा ! किती छान व्ह्यु दिसतोय ना इथून ? पाउस किती कोसळतोय ना ? आपण आता ड्रिंक एन्जॉय करू. पण मी बनवेन आपलं ड्रिंक’ असा म्हणत तिने सर्व चार्ज घेतला थोड्याच वेळात ती दोन ग्लास घेऊन सुधीर समोर आली आणि सुधीरला एक ग्लास देत दोघांनी चिअर्स केले. पहिला सिप घेताच सुधीर म्हणाला
“ वा समिधा क्या बात है ! जबाब नही तेरा ! बहुत बढीया बन गया है ये पेग ! मी अगदी हवेत आहे आज कारण तुझी कंपनी, मस्त क्लायमेट, ड्रिंक्सची नशा, खरच खूप मजा येतेय आज”
बाहेर पाऊस कोसळत होता तर सुधीर समिधा देत असलेले पेग रिचवत होता. सुरवातीला त्याला प्रतिसाद न देणाऱ्या समिधाच आजच रूप पाहून तो हरवून गेला होता. आता रात्रीचे अकरा वाजायला आले होते. सुधीर समिधाला म्हणाला आज ज्यास्त प्यालोय मी आता पुरे करूया. त्यावर समिधा लाडिक पणे म्हणाली ‘ हा लास्ट पेग मग आपण जेवण करू मी पण कंपनी देतेय ना तुला’ असे म्हणत तिने ग्लास सुधीरला दिला .
“ओ के डीअर आज तुला नाही म्हणता येत नाहीये पण शुअरली धिस इज लास्ट” असे म्हणून त्याने समिधाच्या हातातुन ग्लास घेतला आणि शांतपणे ड्रिंक्स सिप करत सामिधाला म्हणाला “ समिधा आज वेगळीच नशा चढलीय किती छान पेग बनवला आहेस. आपण आज आपली रात्र मेमोरेबल बनवूया तुझा काय विचार आहे ?”
त्यावर समिधा हसत म्हणाली “अरे आजची रात्र तर मेमोरेबल होणारच आहे ते समजेलच तुला पण मला एक सांग माझ्या आधी अस लग्नाचं वचन तू किती जणींना दिल होतस ?”
समिधाच्या त्या प्रश्नाने सुधीर थोडा गडबडला तो काही तरी उत्तर देणार तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला त्याने मोबाईल बघितला मात्र आणि Samidha calling बघून त्याला धक्काच बसला. समिधा जर call करतेय तर आपल्यासमोर कोण आहे ही तो बुचकळ्यात पडला आणि विस्फारित पणे समिधा कडे बघत राहिला . त्याला अशा विमनस्क अवस्थेत पाहून समिधा म्हणाली
‘अरे फोन घे” सुधीरने call घेतला आणि फोनवर त्याने समिधाच्या ऐवजी वेगळाच आवाज ऐकला “काय सुधीर ओळखलस का मी संगीता. माझं आयुष्य तर तू उध्वस्त केलासच आणि माझ्या बहिणीच आयुष्य पण बरबाद करायला निघाला आहेस का. पण या पुढे मी तुला अजून कोणाच आयुष्य नाही बरबाद करू देणार. तू जिला समिधा समजतोयस ती समिधा नाहीये. मी आता तिच्या शरीराचा ताबा घेतलाय. आणि तुझ्या ड्रिंक्स मधे जहाल अस विष मिसळलं आहे कराव तस भराव” असे बोलुन ती छद्मी पणे हसली सुधीर काही बोलायच्या आत फोन डीसकनेक्ट झाला. कुठल्या तरी धोक्याची जाणीव सुधीरला झाली. हातातील ग्लास संशयाने टेबलावर ठेवत त्याने समिधा ला विचारले
“ क… को.. कोण आहेस तू ? काय हवंय तुला संगीता ?’” आता त्याची नशा पूर्ण उतरली होती आणि त्याची जागा भीतीने घेतली होती.
“सुधीर अचानक काय झालेय तुला ? किती घाबरला आहेस तू आणि अस काय बघतो आहेस माझ्याकडे, ही संगीता कोण ? मी समिधा एवढ्यात विसरलास ? फोन कोणाचा होता ? बघू” समिधा म्हणाली आणि तिने त्याच्या हातातील मोबाईल जवळ जवळ हिसकावूनच घेतला.
आपल्या ड्रिंकमधे काहीतरी मिसळल गेलंय हे ऐकुन सुधीरला प्रचंड अस्वस्थ वाटू लागले. आपल्या डोळ्यावर झापड येतेय आपणाला खूप झोप का येतेय त्याला समजेना. त्याला आता सर्व अंधुक अंधुक दिसू लागलं पाय लट पटू लागले. समोर उभी असलेली समिधा तसेच खोलीतील सर्व वस्तू गोल गोल फिरता आहेत असे वाटू लागले त्याचा आता त्याला भीतीने ग्रासले. समोरील व्यक्ती समिधा नाही असे त्याच्या मनाने घेतले. आपल्या हातचा मोबाईल पण गेलेला पाहून तो वैतागला “हे बघ मला माहिती आहे तू समिधा नाहीयेस, खर सांग कोण आहेस तू ? काय दिलस तू मला ड्रिंक मधून ? माझा मोबाईल का घेतलास तू काय डाव खेळते आहेस माझ्याशी ?” एवढे बोलून लट पटत्या पायाने तो रूम मधील एका कोचाचा आधार घेत जमिनीवरच कोचला टेकुन बसला. त्याच्या पायात आता चालण्याचे त्राण नव्हते. त्याची झालेली ती अवस्था पाहुन समिधा त्याच्या जवळ गेली.
“ मिस्टर सुधीर मानकर घाबरू नका. मी समिधाच आहे भूत वगैरे कोणी नाहीये. आता तुला जो फोन आला तो माझ्याच सेल वरून माझ्या मैत्रिणीने केला होता केवळ तुला घाबरवण्यासाठी. तुझ्या मनातल गिल्ट संगीताच नाव ऐकताच बाहेर आल, संगीता आठवत असेल ना तुला का विसरलास ? मी तिची छोटी बहिण . अरे मी तुझ खर रूप केव्हाच ओळखल होत . मला माहित आहे की आपल्या पैशाच्या आणि श्रीमंतीच्या जोरावर मुलीना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायच लग्नाचं वचन द्यायचं आणि आपला कार्यभाग साधून सोडून द्यायचं. असच तू सांगितला तुझ्या जाळ्यात ओढलंस. भोळी होती बिचारी. माझी मोठी बहिण होती पण अगदी जिवलग मैत्रीणी सारख सर्व शेअर करायची माझ्याशी. अशाच एका पावसाळ्या रात्री संगीता इथे आली होती तू बोलावलस म्हणुन. तुझ्या मुलाची आई होणार होती ती. आधी तू लग्नाला तयार नव्हतास पण नंतर तयार झालास. तू लग्न करणार म्हणुन खूप आनंदात होती बिचारी. तुझ्याच या घरातुन त्या पावसाळी रात्री याच घरातुन तिने मला फोन केला होता आणि मला ही बातमी सांगितली होती. तो तिचा फोन शेवटचा ठरला.कारण सकाळी बिचारीच मृत देह सापडला समुद्राकाठी. माझे आई बाबानी पोलिस कम्प्लेंट पण केली होती पण तपास नीट झालाच नाही. उलट लग्ना आधी दिवस गेल्यामुळे आपली बदनामी टाळण्यासाठी तिने आत्महत्या केली असावी असा नित्कर्ष पोलिसांनी काढला आणि शेवटी केस फाइल केली गेली. त्या धक्याने आणि न्याय न मिळाल्याच्या नैराश्याने माझ्या आई बाबांनी पण या जगाचा निरोप घेतला. मी एकाकी झाले. मला माहित होते की ताईच्या मृत्यूला सर्वस्वी तुच जबाबदार आहेस. सुडाचे विचार स्वस्थ बसू देत नव्हते म्हणून गोव्यात आले. पार्टीत मुद्दाम तुझ्यासमोर आले. नित्य नवीन सावजाची शिकार शोधणारा तू माझ्यावर लट्टू होणार आणि मला तुझ्या जाळ्यात ओढणार हे मी समजून होते. मी मुद्दामच सुरवातीला तुला प्रतिसाद नाही दिला. पण आज माझ्या अटींवर मी तुला लग्नाला होकार दिला. मी इथे आलेय हे कोणाला माहित नाहीये. तुझ्याच घरच्या झोपेच्या गोळ्या मी आज तुला तुझ्या ड्रिंक्स मधून दिल्यात. आता झोप कायमचा कारण तुझ्या सारखा माणूस जगण्याच्या लायकीचा नाही. माझ्या संगीता ताईच्या खुनातून तू तेव्हा सुटलास पण आज मी सगळ्यांना न्याय मिळवून दिलाय. माझ्या सुसंस्कृत मनाला हे पटत नव्हत की मी एखाद्याची अशी हत्या करावी. वाटल कदाचित तू बदलला असशील पण मला दिसलं की तुझ्यातलं जनावर आता निर्ढावलय त्यामुळे माझ्यापुढे तू दुसरा काही मार्गच नव्हता ठेवलास. त्यामुळे तुझा असाच शेवट नियतीला मंजुर होता. तेव्हा गुड बाय !
समिधा एका आवेशात सर्व बोलली पण सुधीरचा काहीच प्रतिसाद नव्हता. तिने पाहिले की तो आता कोचाजवळ जमिनीवर पडला होता. आपले सगळे बोलणे त्याने ऐकले का नाही हेच तिला कळले नाही. त्याचे डोळे मिटले होते. बहुतेक त्याची चिरनिद्रा चालू झाली होती. समिधा दरवाजा उघडून बाहेर आली. तिने पाहिले पाऊस अजूनही कोसळतच होता. दरवाजा बाहेर ठेवलेला काळा जेन्ट्स रेनकोट तिने अंगात घातला, कॅपने चेहर्याचा बराच भाग झाकला आणि ती रस्त्यवर आली. रस्त्यावर चिटपाखरू देखील नव्हते. पाच मिनिटांताच तिने आपली स्कुटी ठेवलेले ठिकाण गाठले आणि तिची स्कुटी पणजीच्या दिशेने धाऊ लागली………….
आता हे सर्व आठवता आठवता तिला आरतीची आठवण आली. आरती नसती तर हे शक्यच झालं नसत. आरती तिच्या घरा जवळ रहायची. एकटीच होती बिचारी. कोणाशी विशेष बोलायची नाही. संगीता सुधीरच्या जीवनात येण्यापूर्वी आरती त्याच्या जीवनात होती. अनेक रात्री तिने सुधीर बरोबर त्याच्या घरी घालवल्या होत्या. पण हळू हळू त्याचा आरती मधला इंटरेस्ट संपला कारण त्याच्या जीवनात संगीता आली होती. आधी तिला संगीताचा राग आला पण जेव्हा तिचा मृत्यु झाला तेव्हा तेव्हा आरतीला सुधीरचा खूप राग आला होता. सुधीरच खर रूप आता तिला समजल होत आणि आपण हे थांबवलं पाहिजे सुधीरला अजून कोणाची शिकार करू द्यायची नाही या असा तिने निश्चय केला. मात्र जेव्हा सामिधाला तिने जेव्हा तिने सुधीर बरोबर पाहिले तेव्हा तिने सरळ समिधाला एकांतात गाठुन सुधीरच खर रूप तिच्या समोर आणल होत. तिचा आवेश आणि प्रामाणिक पणा पाहून सामिधाने आपण सुधीरच्या प्रेमात पडलो नसून आपला हेतू तिला सांगितला होता. ते ऐकल्यावर आरती खुश झाली. त्यानंतर दोघी एक झाल्या होत्या आणि आरतीने तिला सुधीरचा सूड घेण्यासाठी मदत करायची तयारी दाखवली. आरतीने एक प्लान बनवला. सुधीरची झोपेच्या गोळ्या घेण्याची सवय आरतीने समिधाला सांगितली होती. समिधा स्वतः कायद्याची पदवीधर असल्याने तिने सर्व विचार केला होता तसेच खूप काळजी घेतली. आपली एकमेकांशी ओळख नाही असच भासवत त्या दोघी गुप्तपणे भेटत होत्या. त्यामुळे आरती यामधे कुठे असेल असा संशय येणे शक्यच नव्हते. सामिधाने जो जेन्ट्स रेनकोट वापरला होता तो आरतीने दिला होता. प्लान मधे ऑन्टीच्या घराची रचना खुप उपयोगी ठरली होती. सामिधाच्या रूमला एक मोठी खिडकी होती त्यातून प्लाननुसार रात्री ऑन्टी तिच्या खोलीत गेल्यावर आरती आली होती आणि समिधा तिथून बाहेर पडली होती. आरती तिच्या खोलीत चित्रपट बघत बसली होती तसच सामिधाच्या मोबाईल वरून तिने सुधीरला फोन पण केला होता. आरती समिधाच्या मोबाईल वरून मेसेज पाठवत होती. त्यामुळे सामिधाचे बाहेर जाणे गुप्त राहिले होते. ऑन्टीच्या दृष्टीने त्यामुळे समिधा बाहेर गेलीच नव्हती आणि तसच तिने पोलिसांना सांगितलं होत. प्लान प्रमाणे आपली कामगिरी पार पाडून समिधा घरी आल्यावर आरती तिच्या घरी गेली होती तेव्हा ऑन्टी गाढ झोपेत होती. सुधीरच्या मृत्यु संदर्भात आरतीच नाव कुठेही येण्याचा प्रश्नच नव्हता. अखेर सावजानेच शिकारयाची शिकार केली होती.
(कथेतील पात्रे प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत)
— विलास गोरे
Leave a Reply