उतलो नाही मातलो नाही
कर्तव्याला चुकलो नाही ।
तरीही लढणं अटळ आहे
अटळ आहेत धक्के।
नियतीच्या खेळात
सब घोडे बारा टक्के।।ध्रु।।
नियतीची एकच चाल
दुनिया सगळी बेहाल
जमिनीवर आले सितारे
बंदी झाले देव-देव्हारे
कोण राहील कोण जाईल
कुणा न ठाऊक पक्के ।
नियतीच्या खेळात
सब घोडे बारा टक्के ।।१।।
नियतीला हवेत जसे
पडतील फासे तसे तसे
राजा, वजीर, त्यांचे मोहरे
लढत राहतील सारे
म्हणतील आहेत हातात
अजून सारे एक्के ।
नियतीच्या खेळात
सब घोडे बारा टक्के ।।२।।
खेळ संपता संपत नाही
जोवर नियती मानत नाही
तिची हर एक चाल अवघड
आपली? बचावाची धडपड
सुटलो आता म्हणता उरतो
होऊन हक्केबक्के ।।३।।
नियतीच्या खेळात
सब घोडे बारा टक्के ।।
….मी मानसी
Leave a Reply