जीवन विद्येचे शिल्पकार सदगुरू वामनराव पै यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९२३ मुंबई येथे झाला.
‘तूच आहेस, तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे तत्वज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोहचवून वामनराव पै यांनी लाखो अनुयायांना सुखाचा मार्ग दाखवला.. लाखो जणांच्या धावपळीच्या आयुष्यात शांती, समाधान प्राप्त व्हावं यासाठी वामनराव पैंनी त्यांचं आयुष्य वेचलं.. आणि अखेरच्या क्षणापर्यंत याच ध्यासानं ते कार्यरत राहिले.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले वामनराव पै मुंबई विद्यापीठाचे पदवीधर होते.वामनराव पै हे सेवानिवृत्त उपसचिव, फायनान्स डिपार्टमेंट, मंत्रालय, होते. वामनराव पै यांना पूर्वीपासूनच अध्यात्म व समाजकार्याची आवड होती आणि म्हणूनच निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला पूर्णपणे ह्या कार्याला वाहून घेतले. वयाच्या २५ व्या वर्षी पै यांना त्याच्या गुरुंनी म्हणजे नाना महाराज शिरगावकर यांनी त्यांना अध्यात्माची प्रेरणा दिली. त्यांनी अध्यात्मसाधनेत प्रगती केली आणि त्यानंतर १९५२ पासून त्यांनी नोकरी संभाळून अध्यात्मावर प्रवचने द्यायला सुरुवात केली. त्यांची शिकवण अत्यंत साधी व सोपी असल्यामुळे त्यांचे अनुयायी हळूहळू वाढत गेले. त्यातूनच ‘नादसंप्रदाय ट्रस्ट’ उभारला गेला.
१९५५ मध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ह्या मंडळाच्या कार्याला सुरुवात झाली आणि ‘जीवनविद्या मिशन’ ने त्यातूनच आकार घेतला. ‘जीवनविद्या मिशन’ चे समाजशिक्षणाचे कार्य गेली अनेक वर्षे त्यांच्या प्रेरणेतून अविरत सुरु आहे. जीवनविद्येची शिकवण देणारी २५ हून अधिक पुस्तके वामनराव पै यांनी सोप्या भाषेत लिहिली. जगभर प्रवास करुन त्यांनी याच विषयावर व्याख्यानेही दिली. कर्जत येथे ‘जीवनविद्या ज्ञानपीठ’ ही संस्था त्यांच्या प्रेरणेतूनच स्थापन करण्यात आली आहे.
वामनराव पै यांचे निधन २९ मे २०१२ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply