फर्स्ट क्लासचा प्रवासी होता तो. मागच्याच स्टेशनवर भरपेट खाऊन, – पिऊन सुध्दा – केबिनमधल्या बर्थच्या मऊ मुलायम कव्हर घातलेल्या गादीवर, सर्व गात्रे सैल सोडून डुलकी घेत, शांत निद्रेची वाट बघत पडला होता. पण डुलकी पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळाची नव्हती. जडावलेल्या पण उघडलेल्या डोळ्यांनी त्यानं समोरच्या बर्थवर पहुडलेल्या सहप्रवाशाकडं पाहिलं आणि म्हणाला:
“नमस्कार साहेब. जेवण झालं का? गुड गुड ! बरं का, माझ्या वडिलांना एक सवय होती. रात्री जेवण झाल्यानंतर आडवे पडलेले असतांना त्यांचे पाय कुणीतरी चेपावे लागायचे. त्याशिवाय त्यांना झोपच यायची नाही. माझं थोडसं तसंच आहे. पाय चेपायला नको असतं, पण रात्रीच्या जेवणानंतर माझा मेंदू आणि माझी जीभ दोन्ही थोडेसे उत्तेजित होतात. आणि काय आहे, तसे उत्तेजित झाल्यानंतर दोघांनाही काही तरी वायफळ गप्पा मारायची उर्मी होते. मग? मारू या का थोड्या गप्पा?”
“हो ! चालेल की. आनंदानं,” सहप्रवासी म्हणाला.
“पण आजच्या मस्त जेवणानंतर माझ्या मेंदूला वायफळ नाही पण थोड्या गंभीर अशा विषयानं डिवचायला सुरुवात केली आहे. आता बघा, मागल्या स्टेशनवर कँटीनच्या काउंटरपाशी दोन तरणी माणसे गप्पा मारत उभी होती ती तुमच्या लक्षात आली असतीलच ना? त्यातला एकजण दुसऱ्याला म्हणाला होता, ‘मी तुमचं अभिनंदन करतो. तसे तुम्ही आधीच प्रसिध्द व्यक्ति आहात. पण या भूमिकेमुळं तुमची लोकप्रियता शिगेला पोचेल बघा.’ म्हणजे तो दुसरा कुणीतरी नाटकातला किंवा सिनेमातला कलाकार असावा. पण मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की माझ्या मेंदूला यावेळी प्रश्न पडला आहे, प्रसिद्धी किंवा लोकप्रियता म्हणजे नक्की काय? तुम्हाला काय वाटतं हो? कुणी तरी म्हटलं आहे की प्रसिद्धी म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा असतो. असेलही, पण आजवर कुणी प्रसिद्धी या शब्दाची स्पष्ट, तर्कशुध्द, बुद्धीला पटेल अशी व्याख्या सांगितलेली नाही. बरोबर आहे ना?”
“हो पण तुम्हाला तश्या व्याख्येची आवश्यकता का वाटते?”
“असं आहे, प्रसिद्धी म्हणजे नक्की काय असते ते समजलं की ती मिळवायसाठी काय करायला पाहिजे तेही आपल्याला समजेल ना,” क्षणभर विचार करून पहिला प्रवासी म्हणाला, “त्याचं काय आहे, साहेब, मी तरुण होतो तेव्हा प्रसिध्द व्हायचं म्हणून मी जिवाचं रान केलं. मी लोकप्रिय व्हावं हे माझं ध्येय होतं, वेडच होतं म्हणा नं. त्या हव्यासापायी मी कसून अभ्यास केला, रात्र रात्र जागून मेहनत घेतली, स्वत:च्या तब्येतीकडं दुर्लक्ष केलं. जेवणाखाण्याची पर्वा केली नाही. आणि आत्मप्रौढी म्हणून सांगत नाही, माझ्या धारणेप्रमाणं प्रसिध्द होण्यासाठी जे जे आवश्यक होतं ते ते सगळं माझ्यात होतं. तुम्हाला सांगतो, मी पेशानं इंजिनीअर आहे. माझ्या करियरमध्ये मी महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यांतही डझनावारी मोठमोठे पूल, धरणं, पाटबंधारे, कालवे बांधलेत. निरनिराळ्या चर्चासत्रांमध्ये माझ्या संशोधनाचे लेख वाचले गेले आहेत. रशिया, इंग्लंड आणि बेल्जियममध्ये माझी व्याख्यानं झाली आहेत. आणखी एक, विद्यार्थी असतानापासून मला रसायनशास्त्राची आवड होती. त्याही क्षेत्रात संशोधन करून मी काही सेंद्रीय आम्ले तयार करण्याच्या पद्धती शोधून विकसित केल्या आहेत. त्यामुळं रसायनशास्त्रावरील कितीतरी विदेशी ग्रंथांत माझ्या नावाचा उल्लेख आहे. आणखी काय बोलू? माझ्या सगळ्याच कामांबद्दल आणि मिळवलेल्या यशाबद्दल सांगून तुम्हाला बोअर करायचं नाही मला. पण एव्हढंच सांगायचंय की इतकं सगळं साध्य करून, किती तरी प्रसिध्द लोकांपेक्षा जास्त यश मिळवूनसुध्दा, या देशात आज मला मात्र प्रसिद्धी या ट्रेनशी स्पर्धा करत धावणाऱ्या त्या काळ्या कुत्र्याइतकी देखील मिळालेली नाही.”
“काहीतरीच काय? असं कसं म्हणू शकता तुम्ही? कदाचित तुम्ही इतरांसारखेच, किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त प्रसिध्द असाल.”
“छे हो. तसं नाही हे हवं तर मी आत्ता सिद्ध करून दाखवतो. तुम्ही करकुंभकर हे नाव ऐकलंय?”
सहप्रवाश्यानं थोडा विचार केलं आणि म्हणाला, “नाही बुवा. कोण आहेत हे करकुंभकर?”
“मीच ! माझंच नाव आहे ते. बघितलंत? तुमच्यासारख्या सुशिक्षित, माझ्याच पिढीतल्या, कदाचित माझ्यापेक्षा वयान मोठ्या असलेल्या व्यक्तीनंही माझ्याबद्दल ऐकलेलं नाही. आहे ना हा पुरावा मी काय म्हणतोय त्याचा? म्हणजे, मी जे काही प्रयत्न आजतागायत केले प्रसिद्धी मिळेल म्हणून ते सगळे व्यर्थ होते. चुकीचे होते. त्यासाठी खरं काय करायला पाहिजे असावं ते मला करताच आलेलं नाही. प्रसिध्दीचं शेपूटही पकडता आलेलं नाही मला.”
“मग तुमच्या मते काय करायला पाहिजे होतं तुम्ही?”
“तेच तर म्हणतोय. काय ते देवालाच माहीत. काय म्हणता? कुशलता असायला हवी? कल्पकता? बुद्धिमत्ता? अजिबात नाही. हे सगळं तर माझ्यात होतंच. पण तरीही कित्येकांच्या करिअर्स माझ्याबरोबरच सुरु झाल्या होत्या, माझ्या यशापेक्षा अगदी क्षुल्लक, फालतु, नगण्य असं यश त्यांना मिळालेलं होतं, माझ्या एक दशांशही काम त्यांनी केलेलं नव्हतं, ना कधी परदेशात कामं केली होती, ना काही अलौकिक असे शोध लावले होते त्यांनी. पण तरी आज बघाल तर त्यांना प्रयत्न न करताही आयती प्रसिद्धी मिळालेली आहे. रोज काही ना काही कारणानी त्यांची नावं छापून येतायत वर्तमानपत्रात. लोकांच्या तोंडात बसली आहेत ती नावं जशी काही. आणि मी? कुठं आहे? जाऊ द्या. कंटाळलात ना ऐकून?”
“नाही हो. तसं काही नाही. बोला तुम्ही. मोकळं करा मन. बरं वाटेल तुम्हाला.” सहप्रवासी म्हणाला.
“एक उदाहरण देतो. तीनएक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोल्हार गावात एक पूल बांधला मी, प्रवरा नदीवर. बरेच दिवस काम चालू होतं. त्या काळात हे कोल्हार गाव इतकं मरगळलेलं, मागासलेलं होतं म्हणून सांगू. कामामधून विरंगुळ्यासाठी काही साधनच नव्हतं. मान्य आहे, मला थोडा रमा आणि रमीचा नाद होता त्या दिवसात. पण त्यामुळं तर माझे तिथले दिवस जरासे सुसह्य झाले. अशाच एका बैठकीत तिथल्या एका गायिकेशी लफडं जुळलं. तशी ती काही खास नव्हती. अगदी सामान्य. अनेक असतील तिच्यासारख्या. पण तरी लोकांना ती आवडायची. खरं तर होती अगदी चिल्लर, रेम्याडोक्याची, लोभी, उथळ आणि मूर्खही. प्यायचीदेखील कचकून. दुपारी चार-पाच वाजता सकाळ व्ह्यायची तिची. काम काही करायची नाही. गावभवानी होती. पण गावच्या लोकांच्या लेखी मात्र ती हिरॉईन, कोकीळकंठी गायिका होती. मी नाटकवेडा आहे. अभिनयकलेतला जाणकारही त्यामुळं कुणी लायकी नसतानाही हिरो, हिरॉईन म्हणवून घेत असेल तर माझं डोकं फिरतं. माझ्या या प्रियपात्राला ना अभिनय येत होता ना सुरांचं ज्ञान होतं. गाणी, माझ्या मते ती केवळ रेकायची. तीसुध्दा अभिरुचीहीन, इंग्लिश ट्युन्स चोरून केलेली. ज्यात तिला स्टेजवर लचकून, मुरडून, कमी कपड्यात देहाचं प्रदर्शन करत फिरत म्हणता येतील अशी. पण आता सूत जुळलं तर जुळलंच ना ! ”
“असं ?” सहप्रवाशानं निर्हेतुक उद्गार काढला.
“हो ना ! आणि ऐका तर पुढं. त्या पुलाचं उद्घाटन होतं त्या दिवशीची गोष्ट. पूजा होती, भाषणं होती, मुख्य उद्घाटक पाहुण्यांना हार तुरे, फोटो सारं काही होतं. मी तर अगदी हरखून गेलो होतो. तो पूल म्हणजे – अतिशयोक्ति नाही करत मी – माझ्या बुध्दिमत्तेतून, कौशल्यातून, श्रमातून निर्माण झालेली एक महान कलाकृती होती. आणि समारंभाला आख्खं गाव लोटलं होता. माझी छाती फुलून आली होती म्हणा नं. मनात येत होतं, ‘या सगळ्या लोकांची नजर आता माझ्यावर खिळणार आहे. अभिनंदनाचा वर्षाव होणार आहे माझ्यावर.’ पण कसचं काय? दोन चार सरकारी अधिकाऱ्यांनी माझी दाखल घेतली इतकंच. बाकी सगळे उपस्थित नदीकाठावर उभे राहून मेंढरांसारखे पुलाकडं बघत होते. कुणी आरेखन केलंय आणि बांधलाय तो पूल याच्याशी त्यांना सोयरसुतक नव्हतं ! पुढं सांगायचं तर अचानक लोकांमध्ये एकदम चैतन्य आल्यासारखं दिसलं. मला वाटलं एकदाची माझ्याकडं नजर गेली वाटतं सगळ्यांची. पण कुठलं काय, दुभंगलेल्या नदीतून कृष्णाला घेऊन वासुदेव येत असावा अशी जनसमुदायातून वाट काढत येत होती आमची ‘हिरॉईन-कम-गायिका’ तिच्या चमच्यांबरोबर. हजारो तोंडातून कुजबुज सुरु झाली, ‘आली हो आली बघा, सुरवंती चास्कर आली. काय मस्त दिसते न?…. आय, हाSSय !’….. आणि एकदोघांचं माझ्याकडं ध्यान गेलं. कोवळी पोरं होती. बहुतेक नाटकातली चिल्लर भूमिका करणारी पात्रं असावीत. एक जण माझ्याकडं नजर टाकून आजूबाजूच्यांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला, ‘तो बघा, तो…. तिचा यार !’ मी हळूच तिथून पाय काढता घेतला. थोडा दूर सरकलो तर तिथं एक हरवला असल्यासारखा वाटणारा, कलती टोपी घातलेला आणि दाढीचे खुंट अस्ताव्यस्त वाढलेला माणूस माझ्याजवळ आला आणि सांगायला लागला, ‘ती तिकडून येतेय ती बाई कोण आहे माहिती आहे का? एकदम भारी, नंबर एक गायिका आहे. काय गाते ! काय गाते ! एकदम टॉप !!’ मी त्याला विचारलं, ‘का हो हा पूल कुणी बांधला माहित आहे का तुम्हाला?’ तो उत्तरला, ‘काय की ! कुणीतरी इंजिनीअर असावा. नाव नाही ठाऊक.’ मग मी आणखी एकदोन प्रश्न विचारले त्याला, गावातली मोठी शाळा कुणी बांधली?, कितवीपर्यंत शिकवतात शाळेत? शाळेच्या मुख्याध्यापकाचं नाव काय? पण सगळ्याना त्याचं एकच उत्तर होतं, ‘माहित नाही हो.’ मग अखेरचा प्रश्न विचारला, ‘का हो, ही जी तुमची टॉपची गायिका आहे ती सध्या कुणाबरोबर राहते?’ याला त्यानं लगेच उत्तर दिलं, ‘आहे एक इंजिनीअर, करकंभा की अशाच कायतरी नावाचा.’
“बोला आता. कसं वाटतय हे सारं? पण पुढं अजून आहे. ऐका. समारंभाच्या दुसऱ्या दिवशी मी दैनिक सकाळचा अंक उघडला. आधाशीपणानं सगळ्या पानांवरून नजर फिरवली. बातमी होतीच. कशी? ‘प्रवरा नदीवर कोल्हार येथे बांधलेल्या नवीन पुलाचे उद्घाटन आणि जनतेला समर्पण मोठ्या थाटामाटाने झाले. समारंभाचे मुख्य पाहुणे होते अहमदनगरचे जिल्हाधिकारी निळकंठराव बोराटे. लाखो लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला…..’ बातमीतला शेवटचा परिच्छेद होता ‘समारंभाला प्रसिध्द अभिनेत्री आणि गायिका कु. सुरवंती चास्कर यांच्या उपस्थितीने शोभा आली होती. अत्यंत आकर्षक वेशभूषेत कमनीय देहाच्या कु. सुरवंतीनी उपस्थित लाखो लोकांच्या नजरा तृप्त केल्या. ‘….. माझा उल्लेख? बिलकुल नव्हता. अरे एखादा.. अर्धा तरी शब्द लिहायचा होता रे पुलाच्या निर्मात्याबद्दल ! पण नाही. अगदी निराश झालो मी, जळफळलो मनातल्या मनात.”
“साहजिक आहे हो.” सहप्रवासी.
“आणि ऐका, त्याच सुमाराला पुणे जिल्ह्यात नीरा नदीवर व्हायच्या पुलासाठी डिझाईन देण्याच्या स्पर्धेत मी भाग घेतला होता त्या स्पर्धेचा निर्णय जाहीर व्हायचा होता. तारीख दोन दिवसांवर आली होती. त्यासाठी पुण्याला जाणं आवश्यक होतं. मी कोल्हार सोडलं आणि पुण्याला जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस पकडण्यासाठी अहमदनगरला गेलो. सुरवंतीही पुण्याला यायचं म्हणाली म्हणून अर्थातच मी माझ्याबरोबर तिचंही तिकीट काढलं. प्रवास होता ४ तासांचाच पण रात्रीचा होता. कारण सकाळी आठ वाजता मला पुण्याला बांधकाम विभागाच्या कचेरीत पोचायचं होतं. ट्रेन पहाटे पाच वाजता पुण्याला पोचली. सुरवंतीच्या सहवासात प्रवास सुखाचा झाला हे सांगायला नकोच ! आणि साहेब, माझ्या या धावपळीचं चीज झालं कारण अहो माझ्या डिझाईनला पहिलं बक्षिस मिळालं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तब्बल वीस रुपये खर्चून मी स्टॉलवर मिळतील ती सगळी वर्तमानपत्रं खरेदी करून हॉटेलवर आलो आणि आधाशासारखा स्पर्धेची बातमी आली आहे का ते पहायला लागलो. पहिल्यात काही नव्हतं, दुसऱ्यातही बातमी कुठं दिसेना. चौथ्यामध्ये मला बातमी दिसली. पण कशी?
‘काल सकाळी पाच वाजता अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिध्द गायिका आणि सौंदर्यवती नाट्यअभिनेत्री कु. सुरवंती चासकर अचानक महाराष्ट्र एक्स्प्रेसने पुण्यात आल्या. त्यांना सर्वप्रथम आमचे वार्ताहर श्री लंकेश खोटे यांनी गाडीतून उतरताना पाहिले. आमच्या वार्ताहरांनी त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याबरोबर प्रवास करत आलेल्या त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्याने मनाई करत कु. सुरवंती याना स्टेशनजवळच असलेल्या हॉटेल अमीरमध्ये नेले. त्याच हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे असे कळते. पुण्यात सध्या असलेल्या थंड आणि उत्साहवर्धक हवेमुळे कु. सुरवंती याच्या सौंदर्यात आणखीच टवटवीतपणा आला आहे असे आमचे वार्ताहर कळवतात……..’
पुढं आणखी किती आणि काय लिहिलं होतं ते मला आठवत नाही. पण त्याच बातमीच्या खाली नीरा पुलाबद्दल अगदी बारीक टाईपात छापलेला मजकूर दिसला, ‘नीरा नदीवरील प्रायोजित पुलाच्या डिझाईन स्पर्धेत इंजिनीअर कुंभकरन् यांच्या डिझाइनला प्रथम क्रमांक देण्यात आल्याचे समजते.’ बस्स, इतकंच ! माझं नावही सरळ छापता आलं नव्हतं त्याना. कुठं करकुंभकर आणि कुठं कुंभकरन् ? आता या दैनिकाच्या वृत्तसंपादकाच्या दिवाळखोर बुद्धीला काय म्हणायचं? जितके दिवस आम्ही पुण्यात राहिलो तितके दिवस सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये जशी काही चढाओढच लागली होती ‘स्वर्गीय सौंदर्यवती आणि अभिजात महान अभिनेत्री कुमारी सुरवंती चासकर’ हिच्या स्तुतीचे पूल बांधायची. मी कुणाच्याही खिजगणतीतच नव्हतो.
त्यानंतर गेल्या वर्षीची कोल्हापूरची गोष्ट. तिथले महापौर होते वसंतराव वसगडेकर. मित्र होते माझे. त्यांनी एक व्याख्यानमाला ठेवली होती, रस्ते आणि पाटबंधारे या विषयावर. चार व्याख्यानं ठेवली होती माझी. तिथल्या छत्रपती राजाराम मेमोरियल हॉलमध्ये. रोज एक व्याख्यान. मला वाटलं चार दिवसात लोक मला ओळखायला लागतील. पण कसचं काय ! स्थानिक वर्तमानपत्रातदेखील काहीही छापून आलं नाही माझ्या बदल. आणि मग एक दिवस तिथल्या शिवाजी चौकातल्या कोल्ड्रिंक हाउसमध्ये बसून आईस्क्रीम खाता खाता शेजारच्या टेबलावर बसलेल्या सुखवस्तु सुशिक्षित दिसणाऱ्या माणसांच्या ग्रुपला मी प्रश्न केला,
“कायहो, काल परवा इथं एक व्याखानमाला झाली असं ऐकलं, रस्ते आणि बंधाऱ्यांवर. कुणीतरी कोल्हापूरबाहेरचा इंजिनियर बोलावला होता म्हणे व्याख्यानं द्यायला. नाव माहित आहे का हो तुम्हाला त्याचं?”
दोघांनी माझ्याकडं बघत माना हलवल्या, म्हणाले, “नाही हो. काय माईत नाई.”
तिसरा म्हणाला, “व्याख्यानं? म्हणजे लेक्चरं? कुटं हुती ती?”
पहिला म्हणाला, “अवो न्हाई का ते राजाराम हॉलमदे चाललं होतं चार दिवस ते.”
“राजाराम हॉल? कुटं आला तो? शाहू मार्केट यार्डात काय?”
इतक्यात कोल्ड्रिंक हाऊसच्या समोर एक रिक्षा थांबली, रिक्षातून एक भरभक्कम दिसणारा माणूस उतरला आणि रस्ता ओलांडून पलीकडल्या बाजूला जायला लागला. त्याच्याकडं बघत पहिला म्हणाला, “ अरे तो बघ कृष्णा नागराळे. गेल्या वर्षीचा हिंदकेसरी.”
आणि मग ग्रुपमधल्या चौघांनीही हिंदकेसरी आणि त्याची खादीम पंजाबीशी झालेली लढत यावर चर्चा करायला सुरुवात केली. माझ्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करून. “
करकुंभकरानी थोडा दम घेतला. बरोबरच्या बाटलीतल्या पाण्याचे दोन घोट घेतले आणि पुन्हा सहप्रवाशाला सांगायला सुरुवात केली.
“एक ना दोन, डझनानी उदाहरणं देऊ शकेन मी तुम्हाला असली. पण जाऊ द्या. असं म्हणूया की मीच एक नंबरचा गर्विष्ठ आणि आपलीच महती गाणारा, आत्मकेंद्रित माणूस आहे. पण बघा, इतरही आणखी किती तरी माणसं असतील जी माझ्यापेक्षाही जास्त यशस्वी, जास्त कुशल, जास्त हुशार असतील आणि तरीही त्याना आम जनता ओळखत नसेल. कुणाला माहीतही नसतील ती. आम जनतेचं सोडून द्या, पण तथाकथित सुबुध्द माणसांनाही त्यांची दाखल घ्यावीशी वाटत नाही. एका बाजूला हे असं, आणि दुसऱ्या बाजूला? नाटक सिनेमातले कलाकार, राजकारणातले अगदी सोमेगोमेदेखील सगळ्यांना माहीत असतात. त्यांच्या जन्मतारखा, त्यांचे वाढदिवस, त्यांचे आईबाप, बायका, मुलं सगळ्या सगळ्यांची माहिती असते त्याना. पण विश्वेश्वरय्या, सी व्ही रमण, नारळीकर, वर्गीस कुरियन, बाबा आमटे यांच्याबद्दल विचारा. फार म्हणजे फार थोड्या लोकांना माहिती असते. का? या लोकांनी त्यांच्या आयुष्यात जे काही केलं ते सुरवंती चासकर, नागराळे यासारख्यांच्या कर्तृत्वापेक्षा कमी प्रतीचं होतं? हताश व्हायला होतं हे सगळं बघून. आणि मग वाटतं या विद्वान लोकांनाही उमगलं नाही प्रसिध्द कसं व्हायचं ते.”
इंजिनीअर करकुंभकर बोलायचे थांबले. तीन मिनिटं अशीच शांततेत गेली. मग त्याना जाणवलं गप्पा मारायच्या म्हटलं पण सारा वेळ आपणच एकटे बोलत राहिलो. सहप्रवाशाला संधीच दिली नाही बोलायला. हे ध्यानात येताच ते म्हणाले, “अहो इतका वेळ फक्त मीच बोलतोय. तुम्हीही सांगा न काहीतरी.” सहप्रवाशानं बोलायला तोंड उघडलं,
“करकुंभकर, एक विचारतो. तुम्हाला लाभसेटवार माहित आहेत? वसंत विठ्ठल लाभसेटवार?”
“नाही बुवा. नाही ऐकलं हे नाव कधी.”
“नाही ऐकलं? माझंच नाव आहे हे. वसंत विठ्ठल लाभसेटवार. प्राध्यापक डॉक्टर लाभसेटवार. पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ. आइन्स्टाईनच्या e=mc2 या समीकरणाचा प्रतिवाद करणारा आणि याच वर्षी राष्ट्रपतींकडून पद्मभूषण पदकाने गौरवला गेलेला.”
इंजिनीअर करकुंभकर आणि प्रा. डॉ. लाभसेटवार या दोघांनी क्षणदोन क्षण एकमेकांकडं पाहिलं आणि दोघंही गडगडून हसले.
— मुकुंद कर्णिक
Mastach. Ending superb. Eye opener.
Thank you Siddharth.
अगदी वेगळ्या विषयाची आणि तरीही खिळवून ठेवणारी लघुकथा. शीर्षक ‘सहप्रवासी’ असूनही कथेच्या शेवटा आधीपर्यंत सहप्रवाशाची भूमिका उलगडत नाही आणि उत्कंठा वाढत जाते.अप्रतिम.
आभारी आहे अनिल.
झकास. खरंच सध्या अशीच परिस्थिती आहे. जो प्रसिद्ध असायला हवा तो नसतो. शेवट खुप भारी.
धन्यवाद माधुरीबेन.