‘मैत्री पेक्षा थोडं जास्त’…असं जुनं, हळवं नातं … पुन्हा एकदा आयुष्यात येणं ..तेही वयाच्या एका विशिष्ठ टप्प्यावर..आणि त्यामुळे वर्तमानातलं जगणं समृद्ध आणि सुखकर होत जाणं…असं हे ‘मैत्रीपेक्षा थोडं जास्त’ असलेलं खास नातं दाखवणारा चित्रपट ‘सहेला रे’ ….
प्लॅनेट मराठी वर १ ऑक्टोबर पासून मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट स्ट्रीम होतोय…
मृणाल कुलकर्णी, सुमीत राघवन आणि सुबोध भावे म्हटल्यावर जी सहजता अभिप्रेत आहे ती अर्थातच चित्रपटात दिसते. त्यामुळे अभिनय हा माझ्या परीक्षणासाठीचा विषय नाही. मुळात परीक्षण म्हणून मला लिहायचं नाही.
‘विवाहित स्त्री चा मित्र, किंवा विवाहित पुरुषाची मैत्रीण’ हे एक हळवं नातं आहे, त्याला कुठेही विवाहबाह्य संबंधाची दुर्गंधी नाही हे लक्षात घेऊन चित्रपट मांडलेला आहे..
विवाहित आयुष्य , हे घरामधे व कुटुंबामधे गुंतून राहिल्याने कालांतराने बंदिस्त, सीमित, थोडक्यात, फारसं happening राहत नाही. मग ते स्त्रीचं असो अथवा पुरुषाचं. मतभेद किंवा काही गंभीर समस्या असतीलच असं नाही पण बऱ्याच अंशी पती पत्नी एकमेकांना गृहीत धरू लागलेले असतात.
तेव्हाच यातून बाहेर काढण्याकरता , ध्यानी मनी नसताना एखादा मित्र किंवा मैत्रीण आयुष्यात अनपेक्षितपणे येतात आणि हे मळभ आपोआप दूर होतं ते त्याच्याशी मनमोकळेपणे बोलल्याने आणि त्याच्या सहवासाने.
शमा वर भरभरून प्रेम करणारा निरंजन असाच तिला शोधत अमेरिकेवरून येतो आणि राहून गेलेला मनातलं सगळं तिला सांगतो. शमा सुद्धा तिच्या मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवलेल्या सगळ्या भावना त्याच्यापाशी व्यक्त करते. एकमेकांवरचं एकेकाळी व्यक्त न होऊ शकलेलं प्रेम व्यक्त करतात. शमा मध्ये असेल्या ताकदीची निरंजन तिला जाणीव करून देतो, तू मला माझ्या आयुष्यात कायम हवा आहेस ‘मित्रापेक्षा थोडा जास्त’ म्हणून , हे शमा सुद्धा निरंजन ला सांगते. आणि विणलं जातं ते एक सुंदर नातं..एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मित्र मैत्रिणीचं .
अवघ्या तीन-चार दिवसांच्या काळात घडणारी ही कथा, योग्य व्यक्ती आणि त्याने आपल्या आयुष्यात योग्य क्षणी येणं याची गंमत सांगते. शमा मध्ये झालेल्या आत्मविश्वासपूर्ण बदलाचं स्वागत जेव्हा विक्रम, तिचा नवरा करतो तेव्हा शमाची ताकद, एक स्त्री व एक पत्नी म्हणून अजून वाढते. इथे चित्रपट टिपिकल केलेला नाही याचा आनंद होतो. निरंजन हा माझा जुना मित्र हे सुद्धा ती मोकळेपणाने विक्रम ला सांगते.
स्त्री ने स्वावलंबी, स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं असताना सुद्धा तिचा नवरा आज तिचा मित्र हे तिची ताकद बनू शकतात हा मोठा विचार चित्रपटातून अगदी सहज पोहोचवला जातो.
या सगळ्या कथानकाला उत्तम साथ देतात ती चित्रपटाची निसर्गरम्य दृश्य, उत्तम संवाद आणि डॉ .सलील कुलकर्णी यांचं संगीत.
मृणाल कुलकर्णी यांचं गड किल्ल्यांवरचं प्रेम जाणवतं ते त्यांच्या गरुडमाची वचारच्या सहज वावरामुळे. चित्रपटात त्यांनी त्याची अगदी उत्तम सांगड घातली आहे.
निरंजन आणि शमाच्या एकमेकांविषयीच्या प्रेमाचा उलगडा होतो तो गरुडमाची च्या एका उंच टोकावर. आजूबाजूला हिरवळ, पावसाळी वातावरण, ढग ..असं असताना दिली गेलेली प्रेमाची कबुली..हे दृश्य फारच परिणामकारक ठरलं आहे.
निरंजन आणि शमाची ट्रेक ची आवड, त्यातून बाहेर येणाऱ्या जुन्या आठवणी, आणि आठवणींबरोबर पुन्हा पुन्हा हळवे होणारे हे मित्र मैत्रीण आपल्याला आपल्याही एखाद्या खास मित्र किंवा मैत्रिणीची आठवण करून देतात.
स्त्री च्या आयुष्यात असा एक मित्र का हवा आणि पुरुषाला सुद्धा अशी एक मैत्रीण का असावी , याचं उत्तर शोधणारा हा सुंदर चित्रपट आहे.
मर्यादांची पूर्ण जाणीव ठेवून, ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ असं एकमेकांना बिनधास्त सांगू शकणारे मित्र मैत्रीण..त्यांची उलगडत जाणारी गोष्ट म्हणजे… सहेला रे..
— गौरी सचिन पावगी
Image source : google
Leave a Reply