नवीन लेखन...

साहित्य अकादमी पुरस्काराच्या निमित्ताने !

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या ‘चार नगरांतील माझे विश्व’ या पुस्तकासाठी यंदाचा, ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ गेल्याच आठवड्यात जाहीर झाला.

डॉ.जयंत नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. तसेच वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृतच्या अभ्यासक. डॉ. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त करून परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला.  त्यानंतर उच्च शिक्षण ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठातून पूर्ण केले. त्यांनी बीए. एमए. व पीएचडीच्या पदव्या मिळविल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळविली.

डॉ.नारळीकर म्हणतात, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य वेळी, योग्य व्यक्ती, सहकारी आणि मार्गदर्शक म्हणून मिळत गेल्यामुळेच आयुष्य सुखावह आणि यशस्वी झालं. प्रसरणशील विश्वाचा सिध्दांत मांडणारे आणि खगोलविज्ञानाच्या संशोधनात अग्रेसर असणारे डॉ.नारळीकर नेहमी सांगतात की माझा छंद हाच माझा व्यवसाय आहे, म्हणूनच मी समाधानी आणि यशस्वी आहे.

आई वडिलांनी अभ्यासासाठी मार्गदर्शन तर केलंचं, पण अनेक जीवनोपयोगी ज्ञानाचे धडे दिले, असं ते प्रत्येक मुलाखतीत नेहमी सांगतात. जवळ जरा जास्त पैसे असतील तर पुस्तकं विकत घ्यावीत, हा वडिलांचा संस्कार डॉ.नारळीकर आजही पाळतात. त्यांच्या मामानी घातलेली गणितं, खूप काही शिकवून गेल्याचा उल्लेख त्यांच्या बोलण्यान नेहमी येतो. त्यांचे मामा, घरातल्या फळ्यावर गणितातले कूट प्रश्न लिहून, ते सोडवण्याचं आव्हान, त्यांना करत असत. कधी ते प्रश्न सुटत, तर कधी नाही, पण त्यातून बऱ्याच गोष्टी डॉक्टर साहेबांना शिकायला मिळाल्या. मामांनी डॉक्टरांना विज्ञानाबद्दल लोकांना कुतूहल आहे तेव्हा भाषण देताना त्याचा स्तर लोकांना कळेल असा ठेव, असा सल्ला दिला तो त्यांनी तंतोतंत पाळला. इतका की विश्वोत्पत्तीचं गूढ अगदी सामन्यातील सामान्य माणसाला सोपं वाटेल अशी वक्तृत्व आणि लेखनशैली त्यांनी प्रयत्नपूर्वक आत्मसात केली. रँग्लर ही गणितातील जगन्मान्य विशेष पदवीही मिळवली. केंब्रिजमध्ये असताना प्रसिध्द वैज्ञानिक सर फ्रेड हॉईल यांचा डॉक्टरांनवर विषेश प्रभाव पडला. सर फ्रेड हॉईल आणि डॉ. नारळीकर यांनी केलेलं संशोधन खगोलविज्ञानात अतिशय महत्त्वाचं ठरलं. विश्वातल्या घडामोडींचा सूर्यमालेवर काही परिणाम होत नाही. सूर्यमाला वगळून बाकीच्या ब्रम्हांडातल अवघं अस्तित्व जरी लयाला गेलं तरी, त्याचा सूर्यमालेवर काहीही परिणाम होणार नाही, असं न्यूटन आणि आइनस्टाइन यांचं मत होत. परंतु हे संशोधन परिपूर्ण नाही, असं प्रतिपादन करत सर हॉईल आणि डॉक्टरांनी नवा विचार विश्वापुढे ठेवला.

सूर्यमाला सोडून अनंत योजने दूर असलेलं, अफाट ब्रम्हांड नष्ट व्हायचं तर सोडाच, पण दृष्य विश्वापैकी अर्धं विश्व जरी नष्ट झालं तरी पृथ्वीला तडे पडतील, पृथ्वी दुभंगून जाईल आणि हे सगळं विश्वब्रह्मांडातल्या गुरुत्वाकर्षणाच्या व्यवस्थेला जबरदस्त हादरा बसल्यामुळे घडून येईल, अशा प्रकारचा सिध्दांत, डॉ. नारळीकर यांनी, ११  जून १९६४ रोजी, लंडनमधल्या रॉयल सोसायटीपुढे मांडला. तेव्हा, जगभरातल्या वैज्ञानिकांची नजर, या तरुण प्रगल्भ भारतीय वैज्ञानिकाच्या कार्याकडे वळली. त्यानंतर डॉ. नारळीकरांनी, खगोलविज्ञानाचा अभ्यास आणि संशोधनाचे अनेक महत्त्वपूर्ण टप्पे पार केले. कार्डीफचे वैज्ञानिक आणि इस्त्रोचे काही संशोधक यांनी मांडलेला, पृथ्वीवर जीवजंतू बाहेरून येत असावेत आणि त्यातून आपण पृथ्वीवासीय उत्पन्न झालो हा सिध्दांत तपासून पाहण्याच्या दृष्टीनेही, त्यांनी विशेष संशोधन केलं. शिक्षण आणि संशोधनाचा पाया परदेशात घडला तरी १९७२ साली, डॉ. नारळीकर भारतात परत आले आणि संशोधन व अध्यापन या दोन्हीतही रस असल्याचा फायदा घेऊन, टाटा मूलभूत संशोधन संस्थेत प्राध्यापक म्हणून काम पाहायला लागले.

१९८८ साली विद्यापीठ अनुदान मंडळाचे तत्कालिन अध्यक्ष, प्रा. यशपाल यांच्या प्रोत्साहनाने, पुण्यामध्ये इंटर युनिव्हर्सिटी फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स, आयुका, या संस्थेची स्थापना करून, त्याचं संचालकपदही त्यांनी भूषवलं. आयुका ही महाराष्ट्रातली संस्था, संपूर्ण जगामध्ये खगोल विज्ञानात काम करणारी, आंतरराष्ट्रीय स्तराची संस्था, मानली जाते. तो मान महाराष्ट्ला, केवळ डॉ. नारळीकरांच्या अपार मेहनतीमुळेच मिळाला. २००३ साली, आयुकाच्या संचालकपदावरून निवृत्त झाल्यानंतर, आजच्या घडीपर्यंतही त्यांचं संशोधन आणि वैज्ञानिक लिखाण हेही तितक्याचं जोमानं चालू आहे. गहन संशोधनाबरोबरच, सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दात वैज्ञानिक

लिखाण करणाऱ्या काही मोजक्या वैज्ञानिकांपैकी एक डॉ.नारळीकर आहेत.

परदेशी राहत असताना, त्यांच्या शेजारच्या खोलीत, पॅसेज टू इंडिया हे प्रसिध्द पुस्तकाचे लेखक ई. एम. फॉस्टर राहत होते. वयात बरच अंतर असूनही डॉक्टर नारळीकरांची त्यांच्याशी चांगलीच मैत्री झाली आणि त्यांच्याशी गप्पा मारताना साहित्याशीही गट्टी जमली. विज्ञानाच्या दृष्टीने उद्बोधक, पण मनोरंजक पध्दतीने वैज्ञानिक माहितीचं लिखाण डॉ.नारळीकर करायला लागले. पुढे तर त्यातून विज्ञान कथांचा जन्म झाला. डॉ. नारळीकर आपल्या पहिल्या विज्ञान कथेच्या जन्माविषयी गमतीजमती सांगताना म्हणतात कृष्णविवर नावाची विज्ञान-कथा लिहिली आणि मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक विज्ञान रंजक कथा स्पर्धेसाठी, नारायण विनायक जगताप या नावाने पाठवली. कथेला पहिला क्रमांक मिळाल्यानंतर लेखकाच्या खऱ्या नावाचा खुलासा, लेखकानेच केला. स्पर्धेत मिळालेल्या त्या फ्रोत्साहनामुळेच मी विज्ञान कथा लेखक झालो, असं डॉ.नारळीकर आवर्जून सांगतात. नंतरच्या काळात डॉ.नारळीकर मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष झाले. परिषदेला अजूनही मार्गदर्शन करत असतात.

१९६५ साली पुणे विद्यापीठातल्या एका दुर्बिणीचं उद्घाटन डॉ.नारळीकरांच्या हस्ते झालं. सर हॉईल यांच्याबरोबर संशोधन करून त्यांनी मांडलेला सिध्दांत, तेव्हा नुकताच प्रसिद्ध झाला होता. त्या वेळी, नारळीकरांनी उद्घाटनासारख्या कार्यक्रमांपेक्षा अधिक वेळ संशोधनात घालवावा अशी टीका झाली होती. त्यांनाही ते मनोमन पटलं. त्यामुळे आपल्या आयुष्यातले दहा हजार तास वाचले, असं ते त्यांच्या गणिती भाषेत सांगतात. मराठीतून व्याख्यान देताना, त्यांच्या बोलण्यात एकही इंग्रजी शब्द कधी येत नसे. त्यांना गम्य नसलेल्या किंवा अभ्यासाच्या नसेलल्या विषयावर ते मतप्रदर्शन करीत नसत. त्यांना प्रसिध्दीचा हव्यास कधीच आवडला नाही. विनोद हा तर डॉ. नारळीकरांचा अत्यंत आवडीचा विषय. पी.जी. वुडहाऊस, मराठीतले चि. विं. जोशी, प्र. के अत्रे, पु.लं. देशपांडे, अशा लेखकांच्या पुस्तकांची पारायणं त्यांनी केली आहेत. अजूनही प्रवासात, त्यांच्य हातात पुस्तक असतंच. आयुष्यातल्या सर्व स्थित्यंतरांत मोलाची साथ करणाऱ्या आपल्या सुविद्य पत्नीचे ऋणही ते नेहमी मान्य करतात.

सर्व आयुष्याच्या यशस्वी वाटचालीत, केंब्रिज इथलं खगोलविज्ञानातलं टायसन पदक, भारत सरकारतर्फे पद्मभूषण आणि पद्मविभूषण ही सन्मानचिन्हं, शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक, विज्ञान प्रसाराच्या कार्यासाठी युनेस्कोचा कलिंग पुरस्कार, असे आणि यासारखे अनेक मानाचे तुरे, डॉक्टर साहेबांच्या शिरपेचात रोवले गेले असूनही, अत्यंत साधेपणे ते आजही आपल्या आवडत्या संशोधन आणि लिखाणाच्या कामात गर्क असतात. खगोलविज्ञानच्या संशोधनक्षेत्रात मोलाची कामगिरी आणि आजपर्यंत एकूण शंभराहून जास्त पुस्तकं, तसंच अगणित लेख त्यांच्या नावावर आहेत.

कुशाग्र बुद्धिमत्ता, अत्यंत साधी राहणी आणि विचारसरणी, त्याचबरोबर सतत हळुवारपणे बोलताना नर्मविनोदाचा वापर करताना ते आपल्याला दिसतात. पुरस्कार मिळाल्या नंतरच्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हंटले की “साहित्य अकादमीचा पुरस्कार मला अनपेक्षित होता. मी माझ्या समाधानाकरिता ते पुस्तक लिहिले. चार शहरांमधील माझे अनुभव मला इतरांना सांगायचे होते. या पुस्तकाला पुरस्कार मिळाल्याने मला आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला”.

जगदीश पटवर्धन, दादर

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..